Milind Joshi

Thriller

3.8  

Milind Joshi

Thriller

अपरात्रीची सहल

अपरात्रीची सहल

6 mins
180


काही दिवसांपूर्वी मी एक पोस्ट केली होती. रात्री अपरात्री फिरण्यावरून. काही लोकांनी त्याबद्दल सावधही केले होते. त्या सर्वांचे धन्यवाद. कारण आम्ही ज्या भागात फिरतो तो भागही काहीसा तसाच आहे. या भागात तरस आणि बिबटे यांचा वावर असतो. 

 

 आतापर्यंत हे प्राणी बघण्यासाठी आम्ही अनेकदा रात्रीच्या वेळी या भागातून फिरलो आहोत. अर्थात मोठी गाडी असेल तरच आम्ही भटकंतीला निघतो, आणि फिरताना गाडीच्या काचा व्यवस्थित बंद केलेल्या असतात. 

 

 चार पाच महिन्यांपूर्वीची गोष्ट. नाशिकरोडच्या साऊथ परिसरात बिबट्या दिसल्याची बातमी कानावर आली. मनात विचार आला, ही बातमी जयदीपच्या कानावर गेलेली नसू दे. त्या दिवशी रात्रीचे बारा सव्वाबारा वाजले असतील. बाहेर जबरदस्त पाऊस कोसळत होता. तेवढ्यात माझा फोन वाजला. जयदीपचा होता म्हणून उचलला.


“मिल्या, तुझ्या घराखाली आलोय. खाली ये.” त्याने हुकुम सोडला.


“जयद्या... वाजलेत किती ते तर बघ ना.”


“तू आधी खाली ये.”


“भावड्या. पाऊस चालू आहे.”


“मला माहिती आहे ते. माझी गाडी वॉटरप्रुफ आहे. एक दीड तासात परत येऊ.”


“उद्या ऑफिस आहे रे.” मी काहीसे वैतागून म्हटले.


“तू खाली ये!” त्याने म्हटले आणि मी जर्किन घातले. घरातले सगळे झोपलेले असल्याने कुणाला काही सांगायची गरजच नव्हती. दाराला बाहेरून कुलूप लावून मी पायऱ्या उतरलो आणि गाडीत जाऊन बसलो.


“कुठे जायचे आहे?” मी विचारले.


“आधी नाशिकरोड, तिथून देवळाली, मग मधल्या रस्त्याने पाथर्डी फाटा आणि मग तुला घरी सोडतो.”


“काय खास?”


“काल त्या भागात बिबट्या दिसलाय. आपल्यालाही दिसू शकतो.” त्याने म्हटले आणि मी डोक्यावर हात मारून घेतला. त्याने गाडी चालू केली आणि आम्ही प्रवासाला लागलो. दोन तीन दिवसांपासून सारखा पाऊस चालू असल्याने रस्त्यावर वाहतूक बरीच कमी होती. नाशिकरोड पर्यंत हायवे असल्याने गाड्या दिसत होत्या. देवळालीच्या दिशेने वळलो तशी गाड्यांची संख्या रोडावली. देवळाली गावात पूर्ण शुकशुकाट होता. थोडे पुढे जाऊन गाडी पाथर्डी रोडला वळवली आणि रस्त्यावरील लाईट बंद झाले. रस्त्यावर सगळीकडे अंधार. पावसाची रिपरिप चालू आणि सुनसान रस्त्यावर आमची गाडी ताशी तीसच्या वेगाने धावत होती. आमचे डोळे अंधारात चमकणारे डोळे शोधत होते. पण घरी येईस्तोवर असे डोळे काही दिसले नाहीत. मी घरी पोहोचलो त्यावेळी रात्रीचे अडीच वाजले होते.


त्यानंतर एकदा जयदीपच्या वेबसाईटचे काम चालू होते. त्यामुळे तो माझ्या घरीच राहायला आला होता. रात्रीचे तीन वाजले होते आणि मला झोप यायला लागली म्हणून चहा करायला उठलो.


“काय रे?” जयद्याने विचारले.


“आपल्याला चहा करतो मस्त.”


“त्यापेक्षा आपण बाहेरच चहा प्यायला जाऊ ना.”


“अबे या वेळी कोण चहा देणार तुला? आता बस स्थानकातील हॉटेलही साडेदहा पर्यंत बंद केले जातात.” मी म्हटले.


“हायवेची हॉटेल चालू असतात.” त्याने म्हटले.


“कोणत्या बाजूला जायचे?”


“सायखेड्याला जाऊ.” त्याने म्हटले आणि आठवले. दोन तीन दिवसांपूर्वीच त्या भागात तरसाने दर्शन दिल्याची बातमी आली होती.


“स्पष्ट सांग ना, तरस पहायचं आहे म्हणून.” मी म्हटले आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. मग काय? रात्री साडेतीन वाजता घरून निघालो. माडसांगवी सोडले आणि लोकवस्ती कमी झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती. हा भाग ही रात्रीच्या वेळी बराच निर्जन असतो. चेहडीपासून थोडे पुढे गेलो आणि एक प्राणी आम्हाला अडवा गेला.


“मिल्या... बघितलं तू?” जयद्याने गाडीचा वेळ बराच कमी केला.


“हो... मांजर होतं.”


“नाही रे... मांजर इतके मोठे नसते.”


“मग बोका असेल, खाऊन खाऊन फुगलेला.”


“गप रे..! आता तू डावीकडे बघत रहा.” त्याने हुकुम सोडला आणि गाडीचा वेग अगदी ताशी वीस पर्यंत खाली आणला. चेहडी ते सायखेडा या जवळपास २० किलोमीटर अंतरासाठी आम्ही जवळपास एक तास लावला. त्या दरम्यान या पठ्ठ्याने गाणेही लावले नाहीत हो. तुम्हीच विचार करा. किती बोर झालो असेल मी? पण करणार काय? सुकाणूचक्र ( म्हणजे स्टेअरिंग हो ) त्याच्या हाती होते ना. येताना एका ठिकाणी चहासाठी थांबलो. त्यावेळी पहाटेचे पाच वाजले होते.


“भावड्या, तुझ्या तरसाने माझे तीन तास खाल्लेत. आता म्हणू नकोस मी तुझी वेबसाईट वेळेवर अपलोड केली नाही म्हणून.”


“मिल्या... जिथे सहा महिने मी वाट बघितली तिथे अजून एक दिवसाने काय फरक पडतो?” असे म्हणत फिदीफिदी हसला हो तो. अस्सा राग आला मला. मग मी कसला करतोय त्याचे काम?


मागील आठवड्यातील गोष्ट. रात्रीचे साडे अकरा झालेले. मी नेहमीप्रमाणे काम करत बसलेलो. तेवढ्यात जयद्याचा फोन आला.


“मिल्या... काय करतोय?”


“गाढ झोपेत आहे मी.” मी उत्तर दिले.


“मग उठ आणि खाली ये! आपल्याला चक्कर मारायला जायचे आहे.” त्याने सांगितले.


“अबे मलाच चक्कर येताहेत सध्या.”


“नो टेन्शन. गाडीत पुढील सीटवर बसणाऱ्याला बेल्ट लावणे आवश्यक केले आहे शासनाने. आणि तसेही गाडी मीच चालवणार आहे. तू नुसता बसून राहणार आहेस. एकाच वेळी तुला दोन दोन चक्करची मजा अनुभवता येईल.” त्याने काहीसे हसत म्हटले. यार हे पत्रकार लोक ना, एक नंबरचे हजरजबाबी असतात. आपली बोलतीच बंद करतात. मग काय? काकांना सांगितले, ‘मित्राला सोडायला नाशिकरोड रेल्वेस्टेशनला जातोय.’ आणि घराला बाहेरून कुलूप लावून गाडीत जाऊन बसलो.


“आजचा दौरा कुठे आहे?”


“जास्त लांब जायचे नाहीये.”


“अरे पण कोणत्या बाजूला?”


“गाडी मी चालवतोय ना? मग तुला काय फरक पडतो?”


“घरी कधीपर्यंत येऊ तेवढे सांग.”


“दोन एक तासात येऊन जाऊ.”


“आधी या अरजितसिंगला गप कर, किशोरला सांग गायला.” मी म्हटले आणि त्याने किशोर कुमारची गाणी लावली. रात्रीच्या वेळी किशोरला ऐकण्याची मजाच काही और आहे.


काही वेळातच आमची गाडी मुंबई आग्रा महामार्गाला लागली. मनात म्हटले, घोटीपर्यंत जाऊन परत येऊ. पण कसले काय!, या इसमाने गाडी विल्होळीपासून अंजनेरी रोडला वळवली. हा रस्ता रात्रीच्या वेळी बराच सुनसान असतो. जातेगाव सोडल्यावर तर जंगलच. पावसाळ्यात दुपारी या रस्त्याने जाणे म्हणजे स्वर्गच. सगळीकडे हिरवळ दाटलेली असते. पण आम्ही रात्री फिरत होतो.


जातेगावपासून थोडे पुढे गेल्यावर एका वळणावर या माणसाने चक्क गाडी थांबवली. गाडीचे लाईट बंद केले.


“काय रे?”


“गाडीची काच एक इंच खाली कर.” त्याने हुकुम सोडला.


“का?”


“सांगतोय ते कर.” असे सांगत त्यानेही गाडीची काच एका इंचाने खाली केली.


“जयद्या... तुला माहिती आहे ना हा भाग कसा आहे ते? इथे बिबटे आणि तरस असा दोघांचाही वावर आहे.”


“हो... परवाच पिंपळद गावात एका लहान मुलीवर बिबट्याने हल्ला केला.” त्याने बातमी सांगावी तसे अगदी सहजतेने सांगितले.


“अबे येडे... ते गाव इथून जास्तीत जास्त १० किलोमीटर असेल. म्हणजे आपण बिबट्याच्या परिसरात थांबलो आहोत.”


“बरोबर...”


“आणि या काचा थोड्या खाली करण्याचे कारण?”


“त्यांना माणसाचा वास येतो.”


“बावळट! वेड लागलंय तुला!!” मी जवळजवळ ओरडलोच.


“आवाज नको करूस... जवळपास असणारे प्राणीही दूर जातात.” त्याने शांतपणे सांगितले.


“मला सांग... गाडीची काच भक्कम आहे ना?”


“कंपनीने तर सांगितले आहे. पण तो बिबट्या आहे. त्याच्यात जबरदस्त ताकद असते. काही वेळातच आपल्याला बिबट्याची ताकद आणि कंपनीने दिलेले वचन यात कोण प्रबळ आहे ते समजेलच की.” हेही त्याने इतक्या थंडपणे सांगितले की माझी पाचावर धारण बसली. मी लगेचच एक इंच खाली घेतलेली काच पुन्हा लाऊन घेतली.


“जयद्या... गाडी चालू कर. नाहीतर मी मावशींना फोन लावेन.”


“लाव... पण या भागात रेंज नाहीये.” त्याने सांगितले आणि मी मोबाईल हातात घेतला. खरच त्यावर रेंज नव्हती.


“मिल्या... १० मिनिटे वाट बघू आपण...” असे म्हणत त्याने कुठे काही दिसते का याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. मला मात्र घाम फुटला. या पठ्ठ्याने गाडीत चालू असलेली गाणीही बंद केली हो. का तर म्हणजे बाहेरचे आवाज येत नाहीत. मी देवाचे नामस्मरण चालू केले. यापेक्षा जास्त करूच काय शकत होतो मी. त्यादिवशी पहिल्यांदा मला ‘आपल्याला गाडी चालवता येत नाही’ या गोष्टीचा राग आला. तुम्हाला सांगतो, ते दहा मिनिटे मला तासभर वाटली.


१० मिनिटांनी कुठेच काही न दिसल्याने त्याने गाडी चालू केली आणि ताशी २०च्या वेगाने आम्ही मार्गक्रमण करू लागलो.


“मिल्या... बाहेर लक्ष ठेव...”


थोड्या वेळातच घाट चालू झाला. घाट संपल्यावर अंजनेरी गाव लागते आणि मग नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्ग. येताना मनात एकच विचार. या माणसाला जो पर्यंत एखादे तरस किंवा बिबट्या दिसत नाही तोपर्यंत हा माणूस अशा गोष्टी सोडणार नाही.


“जयद्या... वळणावर डोळे चमकले. तू बघितले का?” मी म्हटले.


“हो... मीही बघितले.” त्याने सांगितले.


“तरसच असणार. गाडी थांबव...”


“मिल्या... घाटात रात्रीच्या वेळी गाडी थांबवणे धोक्याचे आहे.” त्याने नकार दिला.


“अरे पण ते तरस आहे... तुझे डोळे तरसले आहेत ना तरस पाहायला?”


“हो पण...” त्याने गाडीचा वेगही कमी केला नव्हता.


त्यानंतर १० मिनिटातच आम्ही नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याला लागलो. त्यावेळी रात्रीचा सव्वा वाजला होता.


“आज आपले नशीब चांगले होते म्हणून आपल्याला तरसाचे दर्शन झाले.”


“बघ... मी यासाठीच रात्रीचे फिरायचे म्हणत असतो. हा थ्रिलच काही और आहे.”


“खरंय...” मी म्हटले. त्यानंतर आम्ही तरस कसे घातक असते, त्यांचा कळप अनेकदा वयस्कर झालेल्या वाघ सिंहावरही हल्ला करून त्यांचीही शिकार करतो, अशा गप्पा मारत होतो. रात्री पावणेदोन वाजता त्याने मला घरी सोडले.


तुम्ही जयदीपला सांगणार नसाल तर एक गुपित सांगतो. त्या दिवशी चमकलेले डोळे तरसाचे नाही तर एका मरतुकड्या कुत्र्याचे होते. आमच्या गाडीचा आवाज येताच ते रस्त्यातून बाजूला पळाले. पण आता जयदीप मात्र आपण तरस बघितले या खुशीतच अनेक दिवस रात्रीची सहल काढणार नाही आणि मला गाडीत बसून देवाचे नामस्मरण करावे लागणार नाही. पण हे त्याला सांगू नका हं कुणी. नाहीतर मी त्याची तुमच्याशी मैत्री करून देईन आणि मग तुम्ही फिरा त्याच्या सोबत रात्रीअपरात्री... हेहेहे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller