Milind Joshi

Comedy

3  

Milind Joshi

Comedy

बंदिशाला

बंदिशाला

5 mins
274


परवा माझा मित्र दिपक रस्त्यात भेटला. बऱ्याच दिवसांनी भेटत होता तो. त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही होता. आमच्या एकमेकांना प्रेमाच्या शिव्या देवून झाल्यावर तो त्याच्या मित्राकडे वळला. त्याच्या त्या मित्राचं मात्र आमच्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. सभोवतालची हिरवळ त्याच्या मनाला जास्त भुरळ घालत होती. 

“सुन्या... हा मिल्या...” त्याला आमच्या संभाषणात आणत त्याने माझी ओळख करून दिली. सुन्याने मंद स्मित करत माझ्याशी हस्तांदोलन केलं. माझ्या या मित्राची एक खोड आहे. त्याला सगळ्यां गोष्टींबद्दल भरभरून बोलायला आवडतं. ते म्हणतात ना... “दिल खोल के”... अगदी तस्सचं...

“अरे हा मिल्या म्हणजे फेसबुकवरचा सांड आहे... सगळीकडे मोकाट वावर असतो याचा... शरीराने नसला म्हणून काय झालं.” दिपकने माझ्याबद्दल बोलायला सुरुवात केली, अर्थात मला हेच समजत नव्हतं की तो मला सांड म्हणून आदर देत होता की अपमान करत होता?

“यार... डायरेक्ट सांड काय म्हणतोस?” मी ओशाळल्यासारखं हसत त्याला म्हटलं.

“बरं भो... सांड नाही... वळू...” सुन्याला मात्र मला मिळणाऱ्या उपमा आवडत असाव्यात. काय बोलणार यावर मी? बसलो गप्पं... काही म्हणायला गेलो असतो तर परत म्हणाला असता... बघ... मी म्हणालो नव्हतो हा सांड आहे म्हणून? बघ कसा हंबरतोय ते... 

“चल यार... चहा तरी घेऊ आपण. तेवढंच सावलीत उभं राहून बोलता येईल.” असं म्हणत तो चहाच्या टपरीकडे वळला. पुढच्या सातव्या मिनिटाला आम्ही हातात चहाचे कप घेवून झाडाच्या सावलीत उभे होतो.

“यार मिल्या... बसं झालं आता... तू उरकून टाक तुझं.” त्याचं नेहमीचं पालुपद चालू झालं. मला हल्ली या प्रश्नांचा भयंकर राग येतो. उगाचंच जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटतं. एकतर पोरींना मी पसंत पडत नाही, पोरींच्या आई बापांना माझ्या व्यवसाय पसंत पडत नाही आणि साला फेसबुकवरही ‘काही’ घडत नाही. मग आता तुम्हीच सांगा... यात माझा काय दोष? 

त्याच्या प्रश्नासरशी माझं टाळकं सरकलं.

“हो... तू म्हणतो ते अगदी खरं आहे पण... मला एका खूप ग्रेट माणसानं या लफड्यात पडू नको म्हणून बजावलं आहे. आता त्याचं ऐकावंच लागेल ना?” मी तो प्रश्न टाळण्याच्या उद्देशानं बोलून गेलो.

“आयला... कोणत्या मोठ्या माणसानं तुला काय सांगितलं?” त्यानं काहीशा आश्चर्यानं विचारलं.

“अरे... ते नाही का... आपले गीतकार.. काय बरं त्यांचं नाव?” पूर्ण आठवत असूनही मी विसरल्याचं नाटक करू लागलो. 

“गप... काहीतरी फेकू नको... असं तुला कुणीच सांगणार नाही.” 

“अरे खरंच सांगितलं आहे. मलाच काय सगळ्यांनाच त्यांनी हे सांगितलं पण इतरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मी ते पूर्णपणे आत्मसात केलं. पाहिजे तर मी तुला ते ऐकवेलसुद्धा.” 

“बरं मग... मलाही आवडेल ऐकायला.” दिप्या आता हट्टालाच पेटला. शेवटी आता काहीतरी दुसरा विषय काढल्याशिवाय तो शांत बसणार नाही हे मी समजून चुकलो.

“यार ते सोड... ट्रीपला येतोस का? कोकणात जाऊ मस्त १० दिवस...” खरं तर कोकणात काय पण त्र्यंबकेश्वरला जाण्याचेही पैसे खिशात नव्हते. पण ही मात्रा त्याच्यावर लागू पडली.

“नाही यार... १ दिवस असेल तर सांग. जास्त दिवस असेल तर बायको भडकते. म्हणते... इतक्या दिवसांसाठी जायचं तर आपण दोघांनीही जायचं. तुम्ही एकट्याने नाही.” काहीशा नाराजीच्या सुरात त्याने नकार दिला. अर्थात मलाही तेच पाहिजे होतं.

“यार... तुझे हे नेहमीचे नाटकं असतात. तो राजा पहा... कधीही तयार असतो यायला.” मी त्याला भडकवण्यासाठीच बोलत होतो.

“साला... त्याला न यायला काय झालं. तू काय किंवा तो राजा काय... तुमचं विश्वच वेगळं आहे.” 

मी तर टपूनच होतो, तो कधी हे बोलतो आणि मी माझा मुद्दा पुढे करतो. 

“दिप्या... आमचं विश्वचं वेगळं म्हणजे?”

“अरे लग्न झालेल्या लोकांचं आणि लग्न न झालेल्या लोकांचं जग हे वेगवेगळं असतं. काही गोष्टींचे निर्णय तुम्ही लगेच घेऊ शकतात तसं आमचं सहसा होत नाही.” त्यानं मला समजून सांगायचा प्रयत्न केला, पण मला मात्र फक्त माझा मुद्दा तेवढा दिसत होता.

“ओह... म्हणजे तुमचं जग वेगळं असतं असं तुला म्हणायचं आहे तर...”

“हो... आमचं जग वेगळंचं असतं.”

“हेहेहे... तर आता ऐक... मला कुणी यापासून सावध केलं ते... ते आहेत आपले गदिमा. म्हणजे माडगुळकर काका रे... त्यांनी मला सावध केलं आहे.”

“च्यायला... मिल्या झाला का परत सुरु? ते तुला कुठे भेटले होते?”

“अरे भेटायला कशाला पाहिजे? त्यांनी डायरेक्ट गाणंचं लिहिलं... जग हे बंदिशाला म्हणून.”

“जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला, 

कुणी न येथे भला चांगला, 

जो तो पथ चुकलेला... 


ह्या ओळी पहा... तुमचं हे विवाहितांचं जग म्हणजे एक तुरुंग आहे असे ते सांगताहेत. आणि एकदा या तुरुंगात आले की कुणीच भलाचांगला म्हणजे नॉर्मल रहात नाही. प्रत्येक जण हा रस्ता चुकलेलाच असतो. तो रस्ता चुकतो म्हणून तर तुरुंगात येतो...”

त्यानंतर ते पुढे म्हणतात... 

“ज्याची त्याला प्यार कोठडी, 

कोठडीतले सखे सवंगडी, 

हातकडी की अवजड बेडी,

प्रिय हो ज्याची त्याला.... 

म्हणजे एकदा लग्न झाले की माणूस त्यातच गुरफटून जातो. त्याच्या मनात सतत कुठेतरी एक विचार त्याच्या त्या कोठडीचाच असतो. त्या कोठडीतील त्याचे सवंगडी म्हणजे पुरुष असेल तर त्याची बायको आणि स्त्री असेल तर तिचा नवरा हेच एकमेकांना अगदी बांधले जातात. कुठेही जायचे म्हटले की लगेच त्यांचा पहिला विचार काय असतो तर... ती पण पाहिजे बरोबर... किंवा तो ही असावा सोबत... बरे इतर बेड्या काही वेळेस आपण उतरवतो तरी, पण ही बेडी? अंहं... नाहीच उतरत... तिचं ओझं तनावर नाही तर मनावर असतं... आणि विशेष म्हणजे ते सगळ्यांना आवडतंही... सांग आहे की नाही कमाल?”

“पुढे ते म्हणतात... 

जो तो आपल्या जागी जखडे, 

नजर ना धावे तटापलिकडे, 

उंबरातले किडे मकोडे, उंबरी करती लीला... 


म्हणजे त्या दोघातील प्रत्येक जण आपापल्या जागी जखडलेला असतो. काहीही करायचे तर थांब... तिला विचारतो... किंवा... त्याला विचारावे लागेल... हेच ऐकावे लागते आधी. बरे यांना यांच्या संसारापलिकडे काही दिसतच नाही. सतत माझं घर, माझे पोरं, माझा संसार... हेच... याचं सुखंही संसार, दुःख ही संसार, आनंद ही संसार, प्रगती ही संसार आणि वेदनाही संसारच... पतीला ऑफिसमध्ये प्रॉब्लेम, चिंता पत्नीच्या चेहऱ्यावर... शेजारची कुणी पत्नीला काही वेडवाकडं बोलली, राग पतीच्या चेहऱ्यावर... अरे हे काय? म्हणजे इतकंच त्याचं विश्व...”

“त्यानंतर पुढे ते काय म्हणतात पहा... 

कुणा न माहित सजा किती ते, 

कोठून आलो ते नच स्मरते, 

सुटकेलागी मन घाबरते, जो आला तो रमला... 


म्हणजे ह्या संसारात किती दिवस आपण राहणार ते त्यांना तरी कुठे माहित असते? बरे अविवाहित असताना किती मजा होती, किती स्वातंत्र्य होते हेही ते पार विसरून जातात. कधी कधी तर हा वैताग त्यांच्या बोलण्यातूनही प्रकट होतो. पण त्यांना तुम्ही फक्त एकदा सांगून पहा... ‘अरे इतका वैताग आहे तर कशाला या बंधनात आडकून राहिला आहेस? घे फारकत आणि हो मोकळा...’ तर म्हणतात... नाही यार... पुढे माझं कसं होईल? म्हणजे आपण त्यांची यातून सुटका करण्याचा प्रयत्न करतो पण हेच लोकं घाबरतात. खरं सांगायचं तर ते त्यांच्या या विश्वात इतके रमलेले असतात की त्यांना यातून बाहेर पडावे हेच मुळी वाटत नाही. आता तूच सांग... हे गदिमांनीच सांगितले आहे ना हे आपल्याला?”

आता मात्र दिप्याला काय बोलावे हेच समजत नव्हते. शेवटी तो फक्त इतकेच म्हणाला... 

“मिल्या... साल्या... तुला मी हा प्रश्न पुन्हा कधीच नाही विचारणार... एका सध्या प्रश्नांवर तू मला जितकं सुनावलं आहेस तितकं मला अजूनपर्यंत कुणीच सुनावलं नव्हतं... अगदी माझ्या बायकोनंही माझं इतकं डोकं खाल्लेलं नाही कधी.” आणि हे तो बोलत असताना मी आणि त्याचा मित्र सुन्या दोघंही हसत होतो.

“सुन्या... आटप पटकन... लवकर घरी जायचयं... उशीर झाला तर परत...” दिप्याने वाक्य अर्धवट सोडले आणि आमचे हसणे अजूनच वाढले. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy