Milind Joshi

Inspirational

3  

Milind Joshi

Inspirational

संस्कार

संस्कार

3 mins
138


आज माझ्या ऑफिसमधील एका मित्राने मला त्याच्या मित्रासोबत घडलेली घटना सांगितली. अनेकांना त्या घटनेत फारसे विशेष वाटणार नाही. माझा मित्रही ती घटना काहीशी हसून सांगत होता. आम्ही ऐकणारे लोकही ते हसून ऐकत होतो. पण ज्यावेळी त्यावर विचार केला त्यावेळी मी जे हसत ऐकत होतो त्याबद्दल मलाच अपराधी वाटू लागले. कधी कधी माणूस एखाद्या गोष्टीला इतक्या सहजतेने घेतो की त्याचे दूरगामी परिणाम काय होतील हे त्याच्या लक्षातही येत नाही. काही वेळेस त्याच्या लक्षात येऊनही तो त्याबद्दल काहीही करू शकत नाही. त्यावेळी मग कारण नसतानाही आपल्यालाच अपराधी वाटू लागते. कारण आपण अशा गोष्टी ऐकताना किती असंवेदनशील बनलो होतो याची बोच आपल्याच मनाला टोचते.

माझ्या मित्राचा एक मित्र आहे. त्या मित्राचे नाव आपण ‘क्ष’ असे समजू. कारण अशा ‘क्ष’ व्यक्ती तुम्हालाही तुमच्या आजूबाजूला भेटतील. असो. त्या ‘क्ष’ व्यक्तीला दोन अडीच वर्षाची मुलगी आहे. त्या मुलीला एक सवय लागली आहे. ती मुलगी राग आला की समोरच्या व्यक्तीला बहिणीवरून अर्वाच्य शिवी देते. काल त्या मुलीची आई तिची सवय मोडावी म्हणून तिच्यावर चिडली. त्यावर ती मुलगी आईला म्हणाली, “xxxx, माझ्यावर चिडती?”. त्या मुलीच्या या वाक्याने तिच्या आईचा पारा आणखीनच चढला आणि तिने त्या लहान मुलीला चक्क मारले. इतक्या लहान मुलांना मारणे मला व्यक्तीशः योग्य वाटत नाही. आईने मारल्यावर त्या मुलीने रडत म्हटले, ”xxxx, मला मारती?” त्यावर काय बोलावे हेच तिच्या आईला समजेना. तेवढ्यात त्या मुलीचे वडील (‘क्ष’) घरी आले. आईने सगळा प्रकार ‘क्ष’ व्यक्तीला सांगितला. ‘क्ष’ व्यक्तीने मुलीला रागाने असे न बोलण्याबद्दल सांगितले. थोडे ऐकून घेतल्यावर ती लहान मुलगी ‘क्ष’ व्यक्तीलाही म्हणाली, “xxxx, मला रागवतो?” त्यावर मात्र या मुलीचे काय करायचे असा प्रश्न ‘क्ष’ व्यक्तीला पडला. कारण ती मुलगी इतकी लहान आहे की तिला शिक्षा तरी काय आणि किती करणार? ही गोष्ट माझा मित्र हसून सांगत होता आणि आम्ही ती हसून ऐकत होतो. अर्थात त्याशिवाय करणार तरी काय? शेवटी मी माझ्या मित्राला फक्त इतकेच म्हटले. “हे आज त्यांना साधे वाटते आहे पण उद्या हा प्रश्न खूप मोठा होऊ शकतो.” त्यावर माझ्या मित्रानेही फारसे काही भाष्य केले नाही आणि विषय संपवला.

तिथे जरी विषय संपला तरी ही गोष्ट माझ्या मनातून अजूनही जात नाहीये. आज ती मुलगी अशी बोलते, उद्या त्यांना मुलगा झाल्यावर तोही असेच बोलणार कारण घरात आणि आजूबाजूला जसे वातावरण असते तसेच मुले वागतात. मुलं लहान आहेत तोपर्यंत फक्त शिव्या देतात, ज्याचा अर्थही त्यांना माहिती नसतो. आणि मोठे झाल्यावर? मग स्त्रीच्या मनात न्यूनगंड तयार होतो आणि पुरुष स्त्रीला दुय्यम समजू लागतो. स्वतःला श्रेष्ठ आणि स्त्रीला कनिष्ठ ठरविण्याचा सगळ्यात सोपा मार्ग त्याला दिसतो. स्त्रीवर लैंगिक अत्याचार करण्यात त्याला मोठेपणा वाटू लागतो. कारण अगदी लहान वयापासूनच आई बहिणीवरील शिव्यांच्या माध्यमातून ही गोष्ट त्याच्या मनावर ठसते. अगदी दोन पुरुषांमध्येही भांडण झाले तर तिथेही दिल्या जाणाऱ्या शिव्या स्त्रीवरूनच असतात.

आपल्याला समस्या कायम मोठी झाल्यावरच दिसते. मुलींवर अत्याचार होतो त्यावेळी आपण त्या मुलांना दोष देतो पण मुलांच्या मनात याची मुळे त्यांच्या लहानपणातच रुजली जात आहेत याचा विचार आपण कधी करणार? आपणही अशा गोष्टी एकमेकांना हसत सांगतो त्यावेळी आपणही असंवेदनशील बनलो आहोत हेच सिद्ध नाही का होत? मुलींनी छोटे कपडे घालू नयेत, रात्री घराबाहेर पडू नये असे अनेक जण म्हणताना दिसतात, पण मुलांनी स्त्रीकडे वासनेने बघू नये हे किती घरात सांगितले जाते? अनेक घरात तर मुलांमध्येही भेदभाव केला जातो.

याला पर्याय काय? गोष्ट खूप सोपी आहे पण कितपत पटेल आणि अमलात येईल हे सांगणे मात्र कठीण आहे. कारण जोपर्यंत ही समस्या आहे हे मानले जाणार नाही तोपर्यंत त्यावर उपायही केला जाणार नाही. दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. एकतर जितके शक्य होईल तितके शिव्या देणे टाळायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील मुलांमध्ये मुलगी / मुलगा असा भेद करायचा नाही. आपण प्रत्येकाने स्वतःपुरते जरी हे केले तरी समाजात हळूहळू बदल होऊ लागेल. कोणतीही गोष्ट लगेच होत नाही. समाजात बदल होण्यासाठी खूप काळ जावा लागतो. पण आपण किमान प्रयत्न करायला काय हरकत आहे? संस्कार तरी वेगळे काय असतात?


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational