Milind Joshi

Drama

3  

Milind Joshi

Drama

शल्य

शल्य

4 mins
213


खरं तर मला तसं कोणतंच शल्य नाही. कारण मी कोणत्याच गोष्टीचा फारसा विचारच करत नाही. माझे एकच मत आहे... माणूस नेहमी त्या त्या परिस्थिती आणि त्या वेळेसच्या माहिती नुसार योग्य तोच निर्णय घेत असतो. नंतर त्याचे परिणाम त्याच्या हातात असतीलच असे नाही. बरे घडून गेलेल्या गोष्टी बदलणे शक्यही नसते मग त्याबद्दल जास्त विचार करायचाच कशाला? त्यामुळेच मला कोणतेच शल्य नाही. अर्थात मीही माणूसच असल्याने काही चुकांबद्दल आज नक्कीच वाईट वाटते.


ज्या गोष्टीबद्दल मी आज बोलतोय ती इतरांच्या मानाने खूपच क्षुल्लक असू शकते पण तीच गोष्ट माझ्या स्मरणातून अजूनही जात नाही. १९९५ मधील ही गोष्ट. माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची. त्यावेळी मी खूपच चिडखोर/अहंकारी आणि अतिशहाणा होतो. अर्थात आताही तसाच असेल म्हणा, कारण आपण कसे आहोत हे आपल्याला थोडेच समजते? असो, एक गोष्ट मात्र त्यावेळेसही आज सारखीच होती. कोणत्याही मुलींशी जरा ओळख झाली की त्यांना ताई बनवायचो. अर्थात त्यांना ताई बनवण्यामागील माझा उद्देश वेगळा असायचा. कोणत्याही मुलीला ताई बनवलं की त्या आपल्याशी अगदी मोकळ्या मनाने बोलतात. मग मी इतर मुलांना सांगायचो, अमुकअमुक मुलगी आपली बहिण आहे. बरे इतर मुलंही आम्हाला मोकळेपणाने गप्पा मारताना बघायचे आणि माझे बोलणे त्यांना खरे वाटायचे. मग चालू व्हायची माझी मजा. त्या मुलीचा भाऊ म्हणून. त्यानंतर हॉटेलमध्ये / कॅन्टीनमध्ये गेलो तरी मला एका पैशाचाही खर्च नसायचा. कुणी ना कुणी माझे पैसे द्यायला पुढे यायचेच. समजा एखादा मुलगा जर जास्तच सिरिअस झाला तर सरळ बंडल मारायचो... ‘तिचे लग्न ठरले आहे’ म्हणून.

 

त्या वेळेस माझी एक वर्गताई होती. विजया नांव तिचं. दिसायला खूपच छान आणि तितकीच सोज्वळही. तिला सख्खा भाऊ नसल्याने तिने मला मनाने भाऊ म्हणून स्वीकारले होते. त्या काळात माझ्या एका मित्राचे विजयाच्या मैत्रिणीसोबत अफेअर चालू होते. तसे ते प्रेमीयुगुल एकमेकांना रोज भेटायचे, पण गेल्या काही दिवसांपासून विजयाच्या मैत्रिणीच्या घरी याची कुणकुण लागली आणि तिचे घराबाहेर पडणे बंद झाले. आता कसेही करून माझ्या मित्राला त्याच्या मैत्रिणीला निरोप पाठवायचा होता. इतर सगळे मार्गही बंद झाले होते. शेवटचा मार्ग म्हणजे विजया. माझ्या मित्राने विजयाच्या हाती चिठ्ठी पाठवायचा विचार केला. याबद्दल विजयाला राजी करण्याचे काम माझ्यावर आले पण मला माझी इमेज खराब करून घ्यायची नव्हती. मी नकार दिल्यामुळे ते काम माझ्या मित्राने स्वतः करायचे ठरवले. त्याप्रमाणे तो तिला भेटला आणि त्याने तिला आपले काम सांगितले. अर्थातच विजयाने नकार दिला. तिच्या नकाराने माझ्या मित्राचा आणि पर्यायाने आमच्या सगळ्यांचाच इगो दुखावला गेला. खरं तर हे अगदी छोटंसं काम होतं. विजयाने केलं असतं तर होण्यासारखं होतं. पण तिनं चक्क नकार दिला. शेवटी आम्ही मित्रांनी विजयाशी बोलणं बंद करायचं ठरवलं. माझा यात तसं पाहिलं तर काहीच सहभाग नव्हता, पण तिनं आपल्या मित्राला ‘नाही’ म्हटले याचा मलाही राग आला. त्यानंतर तिनं कॉलेजमध्ये असतानाच ३/४ वेळेस माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण माहिती नाही मी कोणत्या धुंदीत होतो. प्रत्येक वेळेस मी अगदी ताठ्यात निघून गेलो. आमची शेवटची भेट रामनवमीच्या यात्रेतली. भेट तरी कशी म्हणता येईल? मी माझ्या मित्रांसोबत होतो, ती तिच्या मैत्रिणींसोबत. आमची एकमेकांच्या पुढ्यात आलो तसे तिने माझ्याकडे बघून स्मित केले, आणि त्या बदल्यात मी मात्र अगदी ओळख नसल्याप्रमाणे रुक्ष चेहरा करून तोंड फिरवले. ही गोष्ट माझ्या मित्रांच्या नजरेतूनही सुटली नाही. इतकेच काय पण ज्या मित्रामुळे मी तिच्याशी अबोला धरला होता त्यानेही मला ‘माझे त्यावेळेसचे वागणे चुकीचे होते’ असे सांगितले. काही दिवसांनी आमचे कॉलेज संपले आणि नंतर आम्ही श्रीरामपूर कायमचे सोडले.


दरम्यानच्या काळात तिचे लग्न झाले. श्रीरामपूरमध्येच. माझ्या मित्राचेही लग्न झाले.अर्थात वेगळ्याच मुलीशी. जसजसे दिवस उलटले माझ्या मनातील अढी नाहीशी झाली. त्यानंतर जेव्हा श्रीरामपूरला जाणे झाले, मी विजयाची विचारपूस स्थानिक मित्रांकडे करत होतो. शेवटी एक दिवस ठरवले, पुढच्या वेळेस श्रीरामपूरला जाऊ त्यावेळेस विजयाच्या घरी जावून भेटायचे. तसेच काही वर्षांपूर्वी केलेल्या माझ्या वर्तनाबद्दल तिची माफी मागायची.


पण म्हणतात ना, दैवाचे लेखच मुळी वेगळे असतात. एका सकाळी माझ्या मित्राचा फोन आला. फोनवर त्याने सांगितले. विजयाने दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कारण मात्र समजले नाही. त्या दिवशी मला सगळ्यात जास्त धक्का बसला. पूर्ण दिवसभर मला आमची काही वर्षांपूर्वीची शेवटची भेट आठवत होती. भेट तरी कसे म्हणता येईल? काही क्षणांची दृष्टादृष्ट. त्यातही तिचा तो आगतिक चेहरा आणि माझे बेदरकार वर्तन. त्या दिवशी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मला स्वतःचा खूप राग आला. त्या दिवशी माझ्या मनातील तगमग माझ्या घरच्यांच्या नजरेतूनही सुटली नाही. अर्थात त्यानंतर दोनच दिवसात मी परत नॉर्मल झालो. काय करणार... कुणी काहीही समजो... हाच माझा स्वभाव आहे. घडून गेलेल्या गोष्टींबद्दल फारसा विचार करायचा नाही. असो... आज खूप दिवसांनी परत एकदा तिची आठवण आली. आता तिची प्रत्यक्ष भेट शक्यच नाही. ती जिथे कुठे असेल तिला फक्त एकच म्हणावेसे वाटते... ‘सॉरी विजया, मला माफ कर..!’ आणि मला माहिती आहे, ती मला नक्कीच माफ करेल. कारण भाऊ कसाही वागला तरी बहिणींच्या मनात भावाबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर असतोच. मग तो भाऊ रक्ताचा असो वा मानलेला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama