Milind Joshi

Comedy

3  

Milind Joshi

Comedy

अत्युच्च आनंदाचा क्षण

अत्युच्च आनंदाचा क्षण

4 mins
147


काल गप्पा मारताना मित्राने विचारले, ‘तुझ्या आयुष्यातील अत्युच्च आनंदाचा क्षण कोणता?’ त्याने हा प्रश्न केला आणि मन जवळपास वीस बावीस वर्ष मागे गेले.

अजूनही आठवतो तो दिवस. अर्थात तारीख / वार नाही सांगता येणार, पण दिवस उन्हाळ्याचे होते हे नक्की. वेळ दुपारी बारा साडेबाराची असावी. मध्यान्हीचा सूर्य अंग भाजून काढत होता आणि त्यामुळे जितके होईल तितके पाणी पिऊन शरीरात थंडावा निर्माण करावा लागत होता. सारडा सर्कलवर एका ठिकाणी नोकरीचा अर्ज द्यायचा असल्यामुळे द्वारकालाच बसमधून उतरलो. खरे तर माझ्याकडे सायकल असायची पण त्यादिवशी ती मकरंद घेऊन गेल्यामुळे मला बसने फिरावे लागत होते. द्वारका ते सारडा सर्कल हे अंतर तसे चालत गेले तरी ५ मिनिटाचे. पत्ताही अगदीच सोपा होता, त्यामुळे लगेचच सापडला. तिथे जाऊन मी माझा अर्ज दिला आणि बाहेर पडलो. गावात फिरायचे तर प्रत्येक ठिकाणी रिक्षा करणे परवडणारे नव्हतेच त्यामुळे चालतच निघालो. एकसारखे पाणी पीत असल्यामुळे लघवी लागली होती. विचार केला... बसस्टँडवर जावे आणि मोकळे व्हावे. १० एक मिनिटात बसस्टँडवरील प्रसाधन गृहाच्या पायऱ्या चढलो, तर समोर बसलेल्या माणसाने आडवले. 

“रुको, सफाई चालू है..!!!” मनात म्हटलं साला यांना आताच सफाई सुचली. पण बोलून काही फायदा नव्हता. तसाच चालत गोळे कॉलीनीच्या सिग्नलवर आलो. वेळ जात होता तसे प्रेशरही वाढत होते. आता डोक्यात फक्त कुठे मोकळे होता येईल याचेच विचार होते. हा विचार चालू असतानाच मागून खांद्यावर थाप पडली. वळून पाहिले तर सुनील हसत उभा होता. बऱ्याच दिवसांनी भेटत होता तो. 

“आयला मिल्या... आहेस कुठे सध्या?” सुन्याने प्रश्न केला. 

“इथेच आहे यार..!!!” चेहऱ्यावर उसनं हसू आणत मी उत्तर दिलं.

“किती दिवसांनी भेटतोय यार... चल समोर जावून उसाचा रस घेऊ...” 

“नाही रे.. सध्या खूप घाईत आहे...” मी उत्तर दिले. साला एक गोष्ट समजत नाही, अशा वेळीच असे मित्र का भेटतात काय माहित. बरे अशा वेळी त्यांच्याकडे वेळही चिक्कार असतो.

“गप रे.. चल...” माझा दंड धरून जवळपास मला ओढतच तो निघाला. मनात विचार आला आधीच प्रेशर वाढलेलं आणि त्यात परत नवीन भर टाकायची? शेवटी न राहवून म्हटलं.

“यार... प्रॉब्लेम आहे... समजून घे...” हे म्हणतच मी करंगळी वर केली.

“अरे इतकंचं ना? थांब... इथे प्रधान पार्क मध्ये जाऊ. मी नेहमी तिथेच जातो.” त्याने म्हटले आणि मला अत्यानंद झाला.

“अरे चल मग... लवकर...” म्हणत आम्ही जवळपास पळतच प्रधान पार्क इमारतीत पोहोचलो. पण साला नशीबच पांडू. तेथील प्रसाधन गृहाच्या दरवाजाला भलं मोठं कुलूप. एकेक मिनिट आता तासासारखा वाटत होता. शेवटी रस घ्यायचा बेत रद्द करून त्याला निरोप दिला आणि पाऊले सार्वजनिक वाचनालयाच्या दिशेने वळली. आता डोक्यानेही काम करणे थांबवले होते. काहीच सुचत नव्हते. शेवटी पळत जायचा विचार केला. चार सहा पावले तशी टाकलीही पण लगेच लक्षात आले, आता पळणे सोयीचे नाही तर गैरसोयीचे होईल. 

शेवटी कसेतरी करून तिथे पोहोचलो. आता फक्त बाजूच्या रस्त्याने वाचनालयामागे जायचे आणि जटील समस्येतून मुक्त व्हायचे. या सध्या विचारानेही मनाला समाधान वाटले. पण हाय रे दैवा ! वाचनालयाच्या दारातून माझ्या बहिणीची मैत्रीण बाहेर पडत होती. आमची अगदी समोरासमोर गाठ पडली.

“हाय...!!!” तिने अगदी लडिवाळपणे हाय केले. आईशप्पथ सांगतो... अगदी कलेजा खलास झाला आपला. पण काय करणार? आजची परिस्थिती अनुकूल नव्हती.

“हेल्लो... काय ठीक आहे ना?” मी चेहरा कसनुसा करत प्रश्न केला. 

“हे काय रे? तुझा चेहरा असा वैतागलेला का? माझ्याशी बोलणे तुला इतके जीवावर येते?” तिने चेहऱ्यावर मिश्कील भाव आणत पुढचा प्रश्न केला आणि माझे टाळकेच सरकले. अगदी खरमरीत उत्तर द्यावेसे वाटले. पण परत त्यातही वेळ गेला असता. बरे ती समोरच वाटेत उभी. तिला “चल सरक बाजूला....” असे तरी कसे सांगणार? आणि असे सांगितले तर आपला पत्ता कायमसाठी कट व्हायचा भीती. आता देवाला शरण जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. उत्तर तर द्यावेच लागणार होते.

“अरे बोल ना...” तिचे शब्द आले. “नाही गं... वैताग नाही... आनंद झाला आहे... इतका की तो आता पोटात मावत नाहीये... अजून काही वेळाने ओसंडून वाहायला लागेल.” खरं तर मी वैतागानेच बोललो होतो. पण ती मठ्ठ डोक्याची... सोडायला तयारच नव्हती.

“अरे आनंद म्हणतोय आणि मग चेहऱ्यावर असे १२ का वाजले आहेत?” तिचा पुढचा प्रश्न आणि माझ्या कपाळावर आठ्या आल्या. मनात म्हटले ‘भले भविष्यासाठी दुसरी पाहू, पण आत्ता हिच्या कानाखाली लावू...’ पण तेवढ्यात देवाची कृपा झाली आणि तिची मैत्रीण तिथे आली. हिची गाडी लगेचच तिच्याकडे वळली आणि मी सुसाट सुटलो. आता मात्र धावण्याशिवाय पर्यायच नव्हता. प्रसाधन गृहाच्या दारातून आत शिरताना मी सुखावलो. आणि त्यानंतर जीवनातील सगळ्यात मोठ्या आनंदाची अनुभूती मी ‘मोकळं’ होताना घेतली. बाहेर इतकं रटरटीत उन असतानाही, सगळे घामाघूम होताना मला मात्र अगदी आल्हाददायक वाटत होतं. 

हाच तो क्षण आहे जो मला जीवनातील सगळ्यात मोठा आनंद देऊन गेला. काय म्हणता, पटत नाही तुम्हाला? ठीक आहे... ठीक आहे. अनुभव हीच खात्री... 

“देवा! परमेश्वरा!! हे कृपाळू करुणाकरा!!!, हे पामर लोक या अत्युच्च आनंदाला पारखे आहेत अजून. यांच्यावर कृपा कर आणि... यांच्यावरही तीच वेळ आण, जी माझ्यावर आणली होतीस. मला खात्री आहे, माझे मत त्यांना नक्की पटेल आणि तेही जीवनातील अत्युच्च आनंदाचा अनुभव घेतील... कृपा कर रे देवा... हेहेहे...”


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy