Milind Joshi

Comedy

3  

Milind Joshi

Comedy

झेंडा

झेंडा

2 mins
226


मी कधीकधी इतक्या उत्कटतेने देवाची प्रार्थना करतो की त्याच्याकडेही माझ्यासमोर येण्याशिवाय पर्यायच उरत नाही. अर्थात मी साधे गाणे म्हणत असलो तरी लोकांना ते रडगाणे वाटते तर त्यात माझा काय दोष? आणि तसेही 'रडगाणे' म्हटल्यावर त्यात उत्कट भाव येणारच ना?

आता कालचीच गोष्ट. खूप दिवसांनी झेंडा चित्रपटातील गाणे ऐकण्यात आले. ते गाणे ज्ञानेश्वर मेश्राम यांनी खूप छान गायले आहे. अगदी तार सप्तकात. मग काय, माझ्या मनातही ते गाणे म्हणायची खुमखुमी जागृत झाली. लगेच तार सप्तकात सूर लावला...

"विठ्ठलाऽऽऽऽऽ कोणता झेंडा घेऊ हाती?"

त्याचा परिणाम असा झाला की ते माझे आर्त सूर साक्षात विठ्ठलाला ऐकू गेले आणि...

माझ्या समोर एकदम पांढरा शुभ्र प्रकाश तयार झाला. हळूहळू तो मोठा व तेजस्वी होत गेला आणि त्यात स्वतः विठ्ठल प्रगट झाले. मी लगेच त्यांना साष्टांग दंडवत घातले.

"अरे... तू तर अगदी व्यवस्थित दिसतोय मला." त्यांनी म्हटले.

"हो तर... तुमचाच आशीर्वाद आहे ना... बरे आता आलाच आहात तर उत्तरही द्या... निवडणुका जवळ आल्या आहेत. कोणता झेंडा घेऊ हाती?" मी लगेचच चान्स मारून घेतला.

"गपे... म्हणे कोणता झेंडा घेऊ हाती? आधी कामधंदा घे हाती. झेंड्यामागे फिरलास तर पंढरपूरची वारीही दुसऱ्याच्या झेंड्यावर करण्याची वेळ येईल तुझ्यावर! प्रश्नच विचारायचा तर कामधंद्याबद्दल विचार. त्याने थोडाफार उपयोग तरी होईल." त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

"ठीक आहे. मग त्याबद्दल सांगा..."

"वा रे वा! सगळे मीच सांगायचे तर तू काय करणार? तुला शाळेत शिकवले आहे ना, प्रयत्ना अंती परमेश्वर. म्हणजे प्रयत्न करून झाल्यावर मग परमेश्वराची मदत मिळते. तू तर प्रयत्न सोडून लागलाय लोकांच्या झेंड्यामागे. मग मी काय सांगू?" त्यांनी हसत म्हटले.

"ठीके ठीके... धन्यवाद..." मी म्हटले आणि विठ्ठल अंतर्धान पावले. तेजस्वी प्रकाशही हळूहळू कमी होत नाहीसा झाला आणि समोरचे दृश्य बघून अंगावर काटा आला. समोर माझे वडील उभे होते आणि त्यांच्या हाती झेंडा नाही तर झेंड्याचा दांडा होता. मी काही बोलायच्या आत तो दंडावर आदळला.

"बावळट, किती मोठ्याने ओरडतोस मुर्खा? तुझ्यामुळे काय काय ऐकावे लागते शेजाऱ्यांचे !" त्यांनी रागाने म्हटले. 

"कोण काय म्हणालं?" मी दंड चोळत अगदी हळू आवाजात विचारले.

"शेजारचे xxx म्हणत होते, तुम्ही खूप भाग्यवान आहात. ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवले, त्या रेड्याने तुमच्या घरी जन्म घेतलाय. जेंव्हा बघावं तेंव्हा रेकत असतो..."

"यार... आपली तर कुणी इज्जतच करत नाही. ना जन्मदाता पिता, ना जगतपिता... "



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy