Milind Joshi

Inspirational

4  

Milind Joshi

Inspirational

अपशब्द

अपशब्द

7 mins
1.5K


दोन व्यक्ती किंवा कुटुंबात मतभेद होण्याची कारणे अनेक असतात, पण ती विकोपाला जाण्याचे सगळ्यात मोठे कारण असते ‘तोंडावर ताबा नसणे.’ हे वाक्य माझी आई कायम बोलायची. जसजसा मोठा होत गेलो, त्यातील सत्यता अधोरेखित होत गेली. दोन चांगले मित्र गप्पांच्या नादात मस्करी चालू करतात, त्याचे पर्यावसन एकमेकांना चिडविण्यात, त्यानंतर एकमेकांना शिव्या देण्यात आणि सर्वात शेवटी मैत्री तुटण्यात होते हे मी अनेकदा बघितले आहे. जवळपास सगळ्यांनाच असा अनुभव असेल. हे जितके लवकर आपल्याला समजते, तितके यामुळे पुढे येणारे वाईट प्रसंग टाळले जाऊ शकतात. आजचा लेख त्याबद्दलच.


ही गोष्ट आहे माझ्या शालेय जीवनातली. शाळेत असताना आजूबाजूला मुलं जे बघतात तेच आचरणात आणतात. आम्ही ज्या भागात राहायचो तिथेही या गोष्टी होत्याच. आजूबाजूला शिव्या देणारे अनेक जण होते, पर्यायाने आमच्या तोंडीही शिव्या येऊ लागल्या. दोन तीन वेळेस आईने समजावून बघितले. वडिलांनी प्रसादही दिला. पण फारसा उपयोग झाला नाही. 


त्यावेळी आम्हाला कामाची सवय लागावी तसेच प्रत्येक गोष्टीला एक मोल असते हे समजावे म्हणून आईने एक नियम बनवला होता. आम्ही घरातले जे काम करायचो त्याबद्दल महिना अखेरीस आम्हाला पैसे मिळायचे. उदा. घर झाडून घेतले तर प्रत्येक खोलीसाठी २५ पैसे. संडास बाथरूम धुतले तर त्यासाठी प्रत्येकी ५० पैसे. इतकेच काय पण वडिलांचे पाय दाबून दिले तर त्यासाठीही पैसे होते. १० मिनिटे पाय दाबले तर ५० पैसे. हे सगळे आम्ही एका वहीत लिहून ठेवायचो. दोन किंवा तीन तारखेला मी, मकरंद आणि तृप्ती आपापला हिशोब घेऊन बसायचो. मग महिनाभरात जितके काम झाले असेल त्यानुसार आम्हाला पगार मिळत होता. तोही रोख स्वरूपात. तो आनंद छान असायचा. मग सगळा हिशोब पूर्ण झाल्यावर ते सगळे पैसे वडिलांना दिले जायचे आणि मग ते आमच्या बँक खात्यात जमा केले जायचे. 


आमच्या तोंडी असलेल्या शिव्या ज्यावेळी समजावून किंवा शिक्षा करूनही कमी झाल्या नाहीत, त्यावेळी आईने एक शक्कल लढवली आणि एक नवीन नियम अस्तित्वात आला. त्या नियमानुसार आम्ही बोलताना जी शिवी देऊ त्याचा लेखाजोखा इतर दोघांनी किंवा एकाने लिहून ठेवायचा. बरे प्रत्येक शिवीला वेगवेगळ्या श्रेणीत विभागले होते. म्हणजे जर कुणी व्यक्तिगत एखाद्याला मूर्ख, बावळट असे शब्द वापरले तर १/- रुपया. आई / बहिण यांच्यावरून अर्वाच्य शिवी दिली तर २/- रुपये. इत्यादी. सगळ्यात जास्त दंड होता एका शब्दाला. एकदम ५/- रुपये कट व्हायचे. तो शब्द आजही लिहिताना हात थरथरतो. तो शब्द म्हणजे ‘हिजडा’. माझ्या तोंडी त्यावेळी हा शब्द कायम यायचा. यामुळे मी घरात आणि बाहेरही अनेकदा मार खाल्ला होता. त्यामुळेच आईचे तो शब्द वापरला तर डायरेक्ट ५/- रुपये दंड ठेवला होता. 


महिन्याच्या सुरुवातीला ज्यावेळी मागील महिन्याचा आम्ही हिशोब घेऊन बसायचो त्यावेळी आधी केलेले कामाचे पैसे मिळायचे. त्यानंतर आम्ही त्या काळात दिलेल्या शिव्यांसाठीचा दंड मोजला जायचा. मग कमावलेल्या पगारातून दंड वजा व्हायचा आणि उरलेली रक्कम आमच्या हाती मिळायची. मला चांगले आठवते, ३/४ वेळेस मला झालेला दंड माझ्या पगारापेक्षा जास्त होता. मग माझा पगार शून्य आणि दंडाची उरलेली रक्कम पुढील महिन्यातील पगारातून वजा करण्यात यायची. त्यावेळी तर सलग ४/५ महिने मला पगार मिळाला नव्हता आणि त्यावेळी तृप्ती आणि मकरंद माझ्याकडे बघून हसत असायचे. त्यावेळी खूप राग यायचा. वाटायचे एखादा अपशब्द बोलवा, पण लगेच मनात यायचे, परत पैसे कट होतील. मग काय, बसायचो गप्पं.


ही गोष्ट माझे कॉलेज संपेपर्यंत सुरु होती. पण त्यामुळे एक झाले तोंडावर खूप ताबा आला. आताही अनेकदा राग आला तरी तोंडून अपशब्द निघत नाही. माझ्याच काय पण मकरंद आणि तृप्तीच्याही. ( आयला, च्यायला, साला हे शब्द नोकरीला लागल्यानंतर माझ्या तोंडात बसले. ते अनेकदा लिखाणातही येतात. आता त्यासाठीही काहीतरी नियम बनवावा लागणार बहुतेक. )


नोकरीला लागल्यानंतर एकदा आईशी गप्पा मारताना शिव्यांचा विषय निघाला. 


“आई... एक विचारू?” 


“विचार की.”


“तू शिव्यांच्या बाबतीत इतके कडक धोरण का स्वीकारले होते?” खरे तर माझा हे विचारण्याचा रोख हलका फुलका होता. वाटले होते आई एखादे मिश्कील उत्तर देईल. पण आई काहीशी गंभीर झाली.


“माणसाचा तोंडावर ताबा नसेल तर त्याचा तोटा त्याच्या सोबतच इतरांनाही बसतो मिलिंद. द्रौपदीने तोंडावर ताबा ठेवला असता तर महाभारत झाले नसते. कर्णाने तोंडावर ताबा ठेवला असता तर त्याचे प्राण वाचू शकले असते.” तिने सांगितले.


“हं... बरोबर आहे तुझे. पण तुझ्या चेहऱ्यावरील गंभीर भाव काहीतरी वेगळेच सांगत आहेत.” मी आईकडे रोखून बघत म्हटले. 


“हं... काही जुन्या खपल्या निघाल्या की होतं असं...” तिने काहीसे हसत उत्तर दिले पण ते स्मित नेहमीसारखे निखळ नव्हते. त्यानंतर काही वेळ ती शांत बसली. 


“आता तुला सांगायला काही हरकत नाही. तू समजदार झाला आहेस. तसेही होऊन गेलेल्या गोष्टीतून फक्त धडा घ्यायचा असतो. कारण त्यात बदल होणार नसतो. त्यामुळे आता ज्या घटना तुला सांगेन त्याने तुझ्या वागण्यात बदल होऊ देऊ नकोस.” तिने सांगितले आणि मी फक्त मान डोलावली.


“ही गोष्ट आहे १५ ऑगस्ट १९७७ची. तू पढेगावला होतास. तुला भेटायला हे पढेगावला आले होते. तुझा वाढदिवस म्हणून. मी आई आप्पांना भेटायला माहेरी गेले होते. त्याच दिवशी दादाकडे सत्यनारायण पूजा ठेवली होती. वर्षाचा वाढदिवस असायचा म्हणून त्याच्याकडे सत्यनारायणची पूजा असायची. दादाने अतुलला आपल्या घरी निमंत्रण द्यायला पाठवले. आता जोशी लोक म्हणजे अगदी जुन्या विचारांचे. अतुल त्यावेळी शाळेत जात होता. अतुलच्या हाती आलेले निमंत्रण रमेश भाऊजींना आवडले नाही आणि त्यांचा पारा चढला. त्यांनी लगेच नेहमीप्रमाणे शिव्या द्यायला सुरुवात केली आणि अतुलला सांगितले, जा तुझ्या घरी जाऊन हा निरोप सांग, ‘आम्ही फालतू कार्यक्रमांना येत नसतो. आणि निमंत्रण द्यायचे तर कुणी मोठ्या लोकांनी यायचे. पोरासोरांच्या हाती निमंत्रण स्वीकारायला आम्ही मिंधे नाही आहोत.’ अतुलने हे जसेच्या तसे दादाला सांगितले. त्यावेळी आई, अशोक, वसंता दादाकडेच बसले होते. अतुलचा निरोप ऐकून दादा लगेच जोशींकडे जायला निघाला. उगाच छोट्या गोष्टीसाठी बहिणीच्या संसारात विघ्न नको म्हणून. सोबत आई, अशोक आणि वसंताही निघाले. जोशींचा राग शांत करण्यासाठी. जसे ते आपल्या घरी पोहोचले, रमेश भाऊजींच्या तोंडाचा पट्टा चालू झाला आणि मग शब्दाने शब्द वाढत गेला. अशोकही गरम डोक्याचा. आपल्या आईला कुणी अपशब्द बोलतोय ते त्याला कसे खपणार? तो रमेश भाऊजींच्या अंगावर धावून गेला आणि प्रकरण जास्तच वाढले. मी इकडे आईची वाटच बघत होते. कारण ती आली की मी घरी जाणार होते. आई, अशोक आणि वसंता ज्यावेळी घरी आले त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. मी काहीसा अंदाज घेत आईला म्हटले, ‘किती वेळ लागला गं, तुला तर माहिती आहे ना, जोशी लोक किती विचित्र आहेत ते. आता उशीर झाला म्हणून तोंडसुख घेतील. एकतर हेही पढेगावला गेले आहेत.’ त्यावर आई काही बोलायच्या आत अशोक म्हणाला, ‘बेबी, काही गरज नाहीये तुला आता तिथे जाण्याची.’ मी आश्चर्यचकित झाले आणि मग आईने घडलेला सगळा प्रकार मला सांगितला. आता मी तिथे जाणे म्हणजे स्वतःहून वाघाच्या गुहेत जाण्यासारखे होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे आले. त्यावेळी त्यांच्या घरच्यांनी ह्यांचे कान भरवले. हेही अगदी कोपिष्ट. दुसऱ्या दिवशी दुपारीच मी दादाकडे गेले, ह्यांची ऑफिसमधून येण्याची वेळ झाली तशी मी बोळीच्या टोकाशी थांबले. ते जसे आले तसा मी त्यांना आवाज दिला. पण त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, ‘जोपर्यंत माझ्या घरचे सांगत नाहीत तोपर्यंत तू माझ्याशी बोलण्याचाही प्रयत्न करू नकोस. फक्त अपमान करून घेशील. तुझ्या भावाला खूप गुर्मी आहे ना ताकदीची? आता तुझा बाप, आई आणि भाऊ नाक घासत येत नाहीत आणि माफी मागत नाहीत तोपर्यंत तू तिथेच रहा’. आणि बाजूने निघून गेले. त्यानंतर मी ३/४ वेळेस त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. यात जवळपास वर्ष निघून गेले. मीही घरी परतण्याचा विचार सोडला होता. तू अक्काकडे होतास, मकरंद माझ्याकडे होता. दादानेही आता घटस्फोटाच्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली होती. शेवटी एक दिवस याचा सोक्षमोक्ष लावण्याचा विचार करून मी ह्यांच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे खेडकर काकाही बसलेले होते. मला बघताच ह्यांनी खुर्चीवरून उठायचा प्रयत्न केला पण खेडकर काका तिथे आले. ‘भरत आधी ती काय म्हणते ते ऐकून घे. लग्नानंतर माणसाला दोन्ही बाजूंनी विचार करावा लागतो.’ मी जे आईने मला सांगितले ते सगळे सांगितले. आणि ह्यांना दादा करीत असलेला विचारही सांगितला. आणि मग निघून आले. त्यानंतर जवळपास ३/४ दिवसांनी अचानक हे घरी आले. आई आप्पांच्या पाया पडले आणि मला सासरी घेऊन जाण्याची परवानगी मागितली. आई आणि आप्पांना तर फक्त माझा संसार व्यवस्थित होणेच महत्वाचे होते. त्यावेळी तुझ्या मोठ्या काकांनी तर ह्यांना असेही सांगितले होते, ‘जर तू मीराला घरी आणशील तर आम्ही घर सोडून जाऊ.’ आणि ह्यांनी त्यांना स्पष्ट सांगितले, ‘मी तिला घरी आणणार आहे, ज्याला जायचे असेल त्याने खुशाल जावे.’ आणि ज्या दिवशी तुझ्या मोठ्या काकांना रूम मिळाली त्यावेळी मला आपल्या घरी प्रवेश मिळाला. त्यानंतर मी एकदा ह्यांना विचारले होते, तुमच्यात असा बदल कसा झाला? त्यावेळी त्यांनी मला सांगितले होते. मी त्यांच्या ऑफिसला येऊन गेल्यावर त्यांनी शेजारी चौकशी करून खरे भांडण कशावरून झाले याची माहिती घेतली होती.” यानंतर आईने थोडा दम घेतला.


“आता तूच सांग, यात माझा किंवा तुझ्या वडिलांचा अर्थाअर्थी काही संबंध होता का? नाही. आणि भांडणही का झाले तर तुझ्या काकांचा त्यांच्या तोंडावर ताबा नव्हता. आणि त्याची झळ त्याही लोकांना पोहोचली, ज्यांचा काहीही दोष नव्हता. हेच कारण आहे की मी त्यावेळीच ठरवले होते, ‘माझ्या मुलांच्या तोंडी अपशब्द येऊ नयेत याची शक्य तितकी काळजी घेईन मी’. आणि आज मला ती गोष्ट बऱ्याच प्रमाणात शक्य झाल्याचे समाधान आहे.”


कधी कधी मी विचार करतो, आई नसती तर माझा स्वभाव कसा असता? खरंच आईचे ऋण कधीच फिटत नाही. उगाच नाही तिला देवाच्याही वरचे स्थान देण्यात आले आहे. 


-- आईच्या ऋणात राहणारा


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational