अनव्हट
अनव्हट


बारावीची बोर्डाची परीक्षा झाली आणि सुट्टी लागली होती. धरणावर अंघोळीला जायचा उपक्रम नित्त्याचाच झाला होता. धरणाला दहा-पंधरा मोऱ्या आहेत. आणि सगळ्या मोऱ्यांमधून धो धो पाणी वाहत असते. साधारण दहाव्या किंवा अकराव्या मोरीवर कपडे काढून ठेवायचे. आणि पाण्यात उडी मारून लांब पर्यंत पोहोचायचे, परत येऊन साबण लावून अंघोळ करायची आणि केजु देवीचे दर्शन घेऊन घरी यायचे. साधारण महिनाभर रोज अशीच दिवसाला सुरुवात व्हायची.
एप्रिल महिना साधारण अर्धा गेला होता. नेहमीप्रमाणे नदीवर आंघोळीला गेलो. पाण्यात उडी मारून लांब पर्यंत पोहोत गेलो. लांबून एक ओंडका वाहत येत असल्याचे मला दिसले. तो जवळ आला की त्याच्यावर बसून धरणापर्यंत जायचे असा विचार करून मी पाण्यावर उलटा पडून राहिलो. हात पाय न हलवता पाण्यावर उलटे पडून राहणे हा एक योगाचा प्रकार आहे. तो मला लहानपणापासूनच अवगत होता. पण नंतर पाहिले की तो ओंडका अजून लांबच होता. म्हणून धरणाकडे येऊन मी साबण लावून अंघोळ केली आणि मोरी वर अंग पुसत उभा होतो. तर तो ओंडका जवळ येत असल्याचे दिसले म्हणून नजर रोखून मी ओंडक्या कडे पाहत होतो.
एवढ्यात मला दिसले की तो ओंडका नसून सहा फुट उंच काळा धिप्पाड माणूस फुगून पाण्यावर तरंगत येत आहे. पाण्यात फुगल्या मुळे त्याचे हात पाय लांब ताणले गेले होते. लांब केस, दात बाहेर आणि फुगल्या मुळे त्याच्या शरीराचा आकार प्रमाणापेक्षा मोठा झाला होता.
मी अंग पुसत असलेल्या मोरी जवळ अर्धा मिनिट आडकला आणि पाण्याच्या प्रवाहामुळे मोरीतून खाली पडला. हे सगळं खाली धुणे धुवत असलेल्या बायका माणसांनी पाहिले. आणि सगळे पाण्यावर वहात चाललेल्या मढ्या बरोबर ओरडत किनाऱ्याने पळत सुटले.
वरच्या वाडीत रात्री मासे धरायला गेलेला भुई जाळ्यात पाय अडकून बुडाला आणि ते वाहत गेलेलं मढ त्याचंच असल्याचे कळले. घडल्या प्रकाराची मला फारशी भीती वाटली नाही. कारण नदी मध्ये बुडून मेलेले कित्येक तरुण, माणसे फुगून वर आलेली मी लहानपणापासून बघत आलो होतो.
पण तेवढ्यात माझ्या मनात एक विचार आला एवढ्या सकाळी धरणात मी एकटाच असताना लांब पर्यंत पोहत जाऊन पाण्यावर उलटा पडुन वाट पाहत असताना ते मढ येऊन आपल्या डोक्याला धडकल असत तर....
आणि या विचाराने माझ्या हृदयाचा ठोका चुकला.