पावसाळा
पावसाळा


महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाचा पावसाळा ऋतु मला आठवतोय. उन्हाळ्यात साधारण मे महिन्यामध्ये वळीव चालू व्हायचा. उन्हाळा कडक असायचा, त्यामुळे उन्हाळ्यात आलेला पाऊस मनाला आणि जीवाला खूप सुखावून जायचा. सगळे वातावरण अगदी आल्हाददायक व्हायचे.
बारावीची परीक्षा होऊन सुट्टी लागली होती. एप्रिल महिन्याचा कडक उन्हाळा होता. सगळे मित्र तालमीच्या ओट्यावर रात्री बाहेर झोपायचे. ओटा तसा यैस पैस मातीचा होता. वळीव झाला की मृग नक्षत्राचा पाऊस बरोबर तारखेवर चालू व्हायचा.
पावसाळा चालू झाला की आम्ही सगळे तालमीत झोपायचो. विस ते बावीस जण झोपायला असायचे. बाकी व्यायाम करणारे होते तसा मीही त्यांच्या बरोबर व्यायाम करायचो. पण महाविद्यालयीन शिक्षण घेणारा मी एकटाच होतो.
कधीकधी रात्री अचानक मोठा पाऊस यायचा. तालमी वर कौलाचे छप्पर असल्याने बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी गळायचे, मग पाण्यामुळे अंथरून ओले होऊ नये म्हणून गोळा करून पायाजवळ घेऊन बसायचे. बहुतेक सगळेच तसे करायचे. आणि गप्पा मारत पाऊस थांबण्याची वाट पाहायची. पाऊस थांबला की फरशी पुसून घ्यायचि मग झोपायला मिळायचं. पण बराच वेळा पाऊस रात्री चालू झाला की पहाटे पर्यंत चालायचा मग पहाटे केव्हातरी झोपायला मिळायचे. कॉलेजची वेळ सकाळी सात ते बारा असायचि. रात्रभर झोप न मिळाल्यामुळे वर्गात डोळ्यावर यायची, असे साधारण महिन्यातून दहा-बारा वेळा व्हायचे. पावसाळ्यात झोपेची खूप हाल व्हायचे.
रात्री पाऊस चालू झाला की मनात धस व्हायचे. पूर्ण रात्र गप्पा मारत काढावी लागायची. खुप अटी तटीचे दिवस असायचे. काळ सरला, तालीम जुनी झाली. मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात ती पडली. पावसाळा चालू झाला आनं त्या कॉलेजच्या जीवनाच्या पावसाळ्यातल्या आठवणी आरशा सारख्या डोळ्यापुढे उभ्या ठाकल्या.