झिरपी
झिरपी


झिरपी आणि नामा दादू धनगराला दोन पोरं. नदीच्या वरच्या वावरात धनगराचा वाडा उतरला होता. दिवसभर डोंगर-दऱ्या, रानात फिरून संध्याकाळी मेंढरं नदीवर आणायची, अन नंतर वाड्यावर न्यायची.
नामाच्या लग्नानंतर झिरपीच लग्न म्हातारीने आठवड्याच्या बाजारात पंचायतीत ठरवलं. झिरपी लग्न होऊन सासरी गेली. दादू धनगर त्याची म्हातारी, सून आणि नामा रोजचा उद्योग करून दिवस कंठीत होते.
एक दिवस नाताला पोहायला शिकवायला म्हणून दादू धनगर नाताला घेऊन नदीवर गेला. पोहायला शिकवताना नातू बुडतो की काय म्हणून गडबडला. तसा धरणाच्या मोरीतून पाण्याबरोबर खाली पडला तो परत वर आलाच नाही. दुसर्या दिवशी पाण्यावर फुगून वर आलेला दादू धनगर सापडला. त्याच्या धसक्यानं म्हातारीलाही झटका आला. एकाच दिवशी दोन सरणं जळली. म्हातारा-म्हातारीचा दिवस उरकून नामा वाडा घेऊन परमुलखात गेला.
एक महिन्यानी झिरपीच्या सासर्याला आठवड्याच्या बाजारात निरोप कळाला. तसं झिरपीच्या डोळ्याचं पाणी थांबेना. पोटच्या पोराला पाठीला बांधून झिरपी मजल दर मजल करत गावात आली अन् थेट गावाबाहेर नदीच्या वरच्या वावरात गेली. पालाच्या काठ्या, दगडाची चूल सगळं तसंच होतं. नदीवर गेली गुराखी पोरांनी म्हातारा-म्हातारीला अग्नी दिलेली जागा दाखवली. अन् झिरपीनं आई म्हणून मोठा हंबरडा फोडला. लग्न होऊन सासरी निघाली तेव्हा आई-बापाच्या गळ्यात पडून झिरपी रडली होती.
रडून रडून झिरपीचा घसा कोरडा पडला होता. सरण जाळलेल्या जागची माती हातात घेऊन झिरपीनं दर्शन घेतलं. पोराला पाठीला बांधलं आणि वावरातून जाताना वाडा उतरलेल्या जागेकडे चार वेळा मागे वळून बघत हुंदके देत देत झिरपी सासरी तिच्या गावी गेली.