दैव
दैव
किराणा दुकानात नऊ ते दहा लोकं अंतर ठेवून नंबरला उभे होते. त्यांच्यात मी पण सामील झालो. सहज इकडे तिकडे नजर टाकून आजूबाजूचे निरीक्षण करत होतो. एवढ्यात साहेब थोडी मदत करा, ताई काही मदत करा असा आवाज कानावर पडला.
एक मध्यम वयाची बाई चार पाच वर्षाचे मूल काखेला घेऊन लोकांना विनवणी करत होती. नंबरला उभे असलेले लोक मात्र तुच्छ नजरेने तिच्याकडे पाहून आम्ही उच्चभ्रू असल्याची पावती तिला देत होते.
सुकलेल्या चेहऱ्यावर तिच्या पोटातली आग झाकत नव्हती. काखेतल्या लहान मुलाचि भूक देखील त्याच्या मंदावलेल्या हालचालीवरून स्पष्ट दिसत होती. हॉटेलमध्ये नाष्टा केल्यावर बिल देताना हसत दहा रुपयाची टीप देऊन आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणारे पांढरपेशी माणूस नावाच्या प्राण्याला काकुळतीला आलेल्या त्या बाईची दया येण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच.
लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात इतक्या गरीब लोकांना ज
ेवण दिले, गरजूंना किराणा दिला असे मथळे टाकून सोशल मीडियावर फोटो टाकण्याचा पिवर मात्र आता उतरला होता.
त्या गरीब बाईला कोणी दाद देत नाही हे तिच्या लक्षात आल्यानंतर एकदा किराणा मालाच्या दुकानाकडे पाहून तिथून तिने काढता पाय घेतला. ति सरळ खालच्या दिशेने चालत गेली. फुटपाथ वर आणखी लहान चार मुले बसलेली होती. विडी ओढत भिंतीवर पायावर बसलेला त्या बाईचा नवरा तिला वेगळ्या भाषेत काहीतरी बोलत होता. कदाचित काही मिळाले नाही असे तिने सांगितले असावे. तेवढ्यात तो दुसर्या मुलीला काहीतरी बोलला. ती दुसरे लहान मुल घेऊन समोरच्या दिशेने भांडे घेऊन काही मिळते का बघायला गेली. मी त्यांना दहा रुपये दिले आणि परत दुकानाकडे वळालो.
पण येताना माझ्या मनात एक विचार आला, भिक मागून दोन वेळच्या अन्नाची शाश्वती नसताना एवढ्या पाच मुलांना जन्म दिला. यात आपल्या पुढच्या आयुष्याची पुसटशीही कल्पना नसताना लहान वयातच हातात कटोरा घेऊन भीक मागणाऱ्या त्या मुलांचे कर्म की बेफिकिरीने वागणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांचे भोग. यात नक्की दोष कोणाचा?