माझ्या आठवणीतला गणेशोत्सव
माझ्या आठवणीतला गणेशोत्सव
साधारण 70 ते 80चे दशक म्हणजे सुवर्णकाळ म्हणून ओळखला जायचा. तरुणांना नोकऱ्या सहजासहजी मिळायच्या. स्वस्ताई होती, मोकळे रस्ते, स्वच्छ नद्या, स्वच्छ हवा, शांतता होती. एकमेकांबद्दल आपुलकी, आदर, आपलेपणा होता. कोणत्याही मित्राला भेटायचे असल्यास आत्ताच्या काळासारखे आधी फोन न करता तडक त्याच्या घरी जाता येत होते. कामाला गाव पण होते.
मी साधारण चौथी इयत्तेमध्ये असेल. आम्ही सर्व मित्रांनी गणपती बसवण्याचे ठरवले. त्यासाठी मग मीटिंग घेतली. समता बाल मित्र मंडळाची स्थापना केली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी नेमले. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी पाच-पाच दिवस आरतीला प्रसाद आणायचे ठरले. लाकडी जिन्याखाली त्रिकोणी चिंचोळी जागा होती, ते गणपती बसवण्याचे ठिकाण ठरले. बांबू उभे करून पडदे बांधून मंडप तयार झाला. साधारण गणपतीसारख्या दिसणाऱ्या दगडाला शेंदूर लावून गणपती तयार केला. गोणपाटाचे डोंगर तयार करून त्यावर कापूस पसरून हिमालयातला गणपती अशी आरास केली.
दहा दिवस झाले विसर्जन दिवस आला. मला लहानपणी तीन चाकी सायकल घेतली होती, तिचे पुढचे चाक तुटले होते. तिलाच मागे काठ्या बांधून त्यावर झाडाचा पाला टाकला आणि वि
सर्जन मिरवणूक निघाली. पुढचे चाक तुटले असल्यामुळे दोघांनी हँडल वर पकडून सायकल पुढे घ्यायची. बाकीचे तोंडाने ढोल-लेझीमचा आवाज काढत काही पुढे नाचायचे. सगळ्या बायका माणसे आमच्याकडे पाहून हसायचे, पण आम्हाला त्याचे कौतुक वाटायचे. विसर्जन झाले, एकही रुपया खर्च न येता गणेशोत्सव साजरा झाला.
काळ सरला. पुढे मोठा झाल्यावर आमच्या मोठ्या मंडळात आम्ही सगळे काम करायला लागलो. गावाचे शहर, शहराचे मेट्रो शहर झाले. खेडेगावाची लोक नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात आले. रस्ते गर्दीने भरले, नद्या दूषित झाल्या. प्रदूषण वाढले. महागाई वाढली. हजारोचा गणेशोत्सवाचा खर्च काही लाखावर गेला. फोन केला की मंडप टाकणारे पडदे बांधणारे हजर. सगळी कामे फोनवर व्हायला लागली. नद्या दूषित झाल्या, विसर्जनाला नद्या कमी पडू लागल्या. गणपती दान करण्याची संकल्पना पुढे आली. गणेशोत्सवात सगळे स्वरूप बदलून गेले. माझ्या बालपणीचा गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सव यात खूप फरक होता.
मनात विचार आला हे गणराया खरंच ते मोकळे रस्ते, स्वच्छ हवा, शांतता, स्वच्छ नद्या, गावचे वातावरण आणि गावच्या वातावरणातला गणेशोत्सव परत येईल का?