अनुभवाचे बोल# दिसतं तसं नसतं
अनुभवाचे बोल# दिसतं तसं नसतं
मीराच्या घरी आठ दिवस राहायला गेलेले तिचे बाबा जेव्हा पुन्हा घरी परतले.. तेव्हा त्यांच्या मध्ये खूपच बदल घडलेला तिच्या आईला जाणवला.. म्हणुन आईने मीराला फोन करून विचारणा केली..
आई:- मीरा!
मीरा:- हा आई बोल गं...
आई:- अगं तुझे बाबा तुझ्या घराहून परतले तेव्हा पासुन त्यांच्या मध्ये खुप मोठा बदल घडला आहे..
मीरा:- अगं पण बाबा तर अगदी आनंदी होते.. निघताना देखील अगदी हसत निघाले.. काही बोलले का ते तुला? काही टेन्शन वैगेरे?
आई:- नाही गं वेडा बाई.. तसं काही टेन्शन नाही..
मीरा:- अग आई! तु पटकन सांग ना.. केवढा उशीर लावतेस सांगायला.. इकडे मला काळजी लागली आहे..
आई:- तुझ्या बाबांनी गेल्या पस्तीस वर्षात कधीच मला घरकामाला हातभार लावला नाही.. पण गेले दोन दिवस झाले त्यांना तुझ्याकडून येऊन... तर बाई बाई.. माणूस मदत करायला पुढे पुढे.. उभ्या आयुष्यातील मोठं नवलच की गं..
मीरा:- मी तरी कसं विचारू.. तुच विचार की त्यांना ह्यामागे काय गुपित दडलंय?
आई:- नक्की विचारते.. चल ठेवते गं...असं म्हणत आईने फोन ठेवला आणि बाबांकडे गेली..
आई:- अहो! तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे..
बाबा:- विचार की मग.. एवढा उशीर कशापायी..
आई:- तुम्ही मीराकडून आल्यापासून मी पाहतेय.. घर कामातील तुमची रुची वाढली आहे... अख्या आयुष्यातील हा वेगळा अनुभव आहे हा माझ्यासाठी म्हणुन विचारलं..
बाबा डोक्यावर चष्मा चडवत वृत्तपत्र बाजुला ठेवत बोलू लागले..
बाबा:- मीरा लहानाची मोठी कधी झाली कळलंच नाही गं.. लग्न होऊन संसार सागरात पोहायला सुद्धा लागली.. ज्या मुलीला अंथरुणातून उठवायला तुला किती वेळ लागायचा.. ती सकाळी पाच वाजता उठून सगळ्यांच्या आवडी निवडी नुसार नाष्टा बनवुन दयायची.. जावई, नात आणि स्वतः च्या टिफीन बरोबर माझ्या जेवणाची सोय करून ऑफीस साठी रवाना व्हायची.. संध्याकाळी ट्रेनच्या प्रवासातून थकुन आल्यानंतर तिचे ऑफिस कॉल पण तिच्या सोबत घरी येतात.. फोन वर बोलत बोलत घरातील काही कामं करून घेते.. फ्रेश झाली की मग पुन्हा लेक किचन कडे.. रात्रीच जेवण झालं की, मग ती मुलीला गोष्ट सांगत झोपवते.. मुलगी झोपली की, मग पुन्हा स्वारी किचन साफ करायला.. शेवटचं तीच काम कपड्याची मशीन लावणे.. त्या तीन ड्रेन मध्ये ती बसल्या बसल्या अर्ध्या झोपेत असते.. झोपायला तिला रोज एक वाजतो आणि पुन्हा सकाळी पाच वाजता उठून सगळं तेच..
आई:- स्त्री एकदा संसाराला लागली की, तिच्या साठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन नसतात.. प्रत्येक बाईला हे करावं लागते.. पण एक आहे घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळणे सगळ्यांना जमतेे असे नाही
बाबा:- मीरा अगदी तुझ्यावर गेली आहे.. कारण तुझ बघून ती सर्व काही शिकली आहे.. पण माझ्या मीराचा हात मात्र कोणी पकडू शकत नाही.. अगदी तु देखील नाही..किती थकते ती?मदतीला कोणीच नाही.. तिचा एकटीचा ताण मला मात्र पाहवला नाही..
आई:- अच्छा! म्हणजे लेकीचा ताण तुम्हाला बघवला नाही म्हणा की.. अहो परत एकदा सांगते.. बहुतांश स्त्रियांच्या बाबतीत असे घडतं.. फक्त आपल्या लेकीच्या बाबतीत नाही.. आता त्या चक्रवृहातून बाहेर या.. (आई हसत उत्तरली)
बाबा:- मी कधीच तुला इतक्या वर्षात समजू शकलो नाही.. कधीच तुला कधी मदत केली नाही.. त्याबद्दल क्षमस्व बाईसाहेब.. म्हणून ह्या उतारवयात तुला मदत करण्याचा एक प्रयत्न करू पाहत होतो.. शेवटी माणूस अनुभवातून शिकत असतो
आई:- एवढी वर्ष मी सगळं काही करते आहे.. पण कधी सु म्हणुन तुम्हाला तक्रार केली का? आणि मलाच नाही आवडत बायकांच्या कामात पुरुषांनी उगाच लुडबुड केलेली.. बायकांची कामं बायकांना शोभतात पुरुषांना नव्हे..
बाबा:- मला जसं वाटलं तसे मी करण्याचा प्रयत्न केला.. पण आता तु नाही म्हणतेस तर नाही करणार लुडबुड पुढे..
आईने मीराला फोन केला.. आणि सगळं काही सांगितलं.. मीरा यावर हसू लागली..
मीरा:- आई! खरं बोलायचं झालं तर ...
आई:- हो बोल पुढे.. काय?
मीरा:- घरातील सकाळचं सगळं डिपार्टमेंट माझ्याकडे आणि संध्याकाळी ऑफिस वरून आल्यानंतर शिरीषचे असते.. पण बाबा होते ना घरी..
आई:- मग.. बाबा होते तर काय?
मीरा:- अगं! जावई बाई माणसांची काम करतो आहे.. हे त्यांना कदाचित आवडणार नाही म्हणुन शिरीष आणि मी दोघांनी असं ठरवलं होतं की, बाबा असे पर्यंत शिरीष घरातील कुठल्याच कामाला हात लावणार नाही..
आई:- तुमच्या नवीन पिढीचे विचार चांगले आहेत.. पण मला नाही आवडत ते पुरुषांनी बाईची कामं केलेली.. तुझ्या बाबांनासुद्धा बजावलं यापुढे कामात लुडबुड करू नका..
मीरा:- आई! हाच तर तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे.. तुमचे आणि आमचे विचार कधीच पटणार नाही.. कारण शिरीषने कामं केलेली माझ्या सासरच्या लोकांना पण आवडत नाही.. गेल्या खेपेस सासु आली होती तेव्हा खुप मोठा अनर्थ घडला म्हणुन सांगु.. सगळीकडे नुसती बोंबाबोब.. तेव्हापासून ठरवलं कोणी घरी आलं की, शिरीष ने पाहुणे आल्यावर कुठल्याच कामाला हात लावायचा नाही..
आई:- जावई तुला समजून घेतात तीच खूप मोठी गोष्ट आहे.. कारण ट्रेनच्या प्रवासातून थकून आल्यानंतर कामाला लागायचं म्हणजे काही खायचं काम नाही..
मीरा:- हो आई! बाबांना माझा निरोप दे.. काही काळजी करू नका.. त्यांना सांग.. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं....
आणि दोघीही फोनवर खळखळून हसू लागल्या..
