Ishwari Shirur

Thriller

4.5  

Ishwari Shirur

Thriller

अनपेक्षित डेस्टिनेशन

अनपेक्षित डेस्टिनेशन

3 mins
384


    तांबड फुटलं. नेहमीप्रमाणे टेक्नो कोंबडारुपी गजर आरवला आणि दिवसाची सुरुवात झाली. रंगभूमीवर ज्याप्रमाणे तिसरी घंटा वाजते आणि पडदा उघडतो, तसंच हे दिवस-रात्रीचं गणित. बरं, दिवस उजाडला की आमची स्वारी प्रवासाच्या दिशेने मार्गक्रमण करायला लागते. आषाढी कार्तिकीच्या वार्‍या ज्याप्रमाणे न चुकता होतात अगदी त्याचप्रमाणे माझं आणि प्रवासाचं नातं आहे. आमची वारी कधीच चुकत नाही. आजही या प्रवासासाठी मी सज्ज होते. नेहमीसारखीच पळत जाऊन मिडल लेडीजचा डबा आणि माझी खिडकीची जागा चपळाईने पकडली. सगळं कसं रोजच्या सारखचं होतं. फक्त आज जाण्याचं डेस्टिनेशन परिचयाचं नव्हतं. आजही गर्दीचा तुकडा बनून हा प्रवास चालू झाला, तरीदेखील काहीतरी वेगळेपणा जाणवत होता.. नवीन जागेची आतुरता एखाद्या नंदनवनासारखी सतत खुणावत होती. जणू या प्रवासाच्या तिकिटावर ठिकाणाचे नाव नसून to the destination... असं लिहिलेलं भासत होतं. हंऽऽ आता हा प्रवास कुठे थांबणार माहीत नाही.. खरं तर मनुष्याच्या आयुष्याचा खरा प्रवास आईच्या गर्भात असल्यापासूनच सुरू होत असतो. हा आयुष्याचा प्रवास कधी कोणत्या ठिकाणी घेऊन जाईल, कधी कोणत्या वल्लीसोबत आपली भेट करुन देईल याचा काहीही नेम नसतो. आपण मात्र एका वाटसरूप्रमाणे या प्रवासाचा आनंद अनुभवायचा इतकंच..  

आजही प्रवास चालूच होता. अगदी नेहमीसारखाच कानात इअरफोन घालून.... एकांतात... परंतु नेहमी जाणवणारा एकटेपणा आज जराही जाणवत नव्हता. वातावरणातील गारवा आणि बरसणारा मल्हार प्रवासात माझी सावलीप्रमाणे साथ देत होता. वेळ जसजसा पुढे सरकत होता तशी गाडीतली गर्दी हळूहळू कमी होऊन गारवा अंगाला बोचू लागला होता. जणू अंगावरच्या शहाऱ्यांची आपापसात मिटिंग चालू आहे की काय असं वाटत होतं. खिडकीतून झाडे वेगाने पळताना दिसत होती. साचलेल्या पाण्यात पांढर्‍या रंगाच्या विहंगांनी सामुहिकरित्या हजेरी लावली होती. ज्या ठिकाणी जायचं होतं ते ठिकाण नेमकं कसं असेल याची चित्र मी मनातच रंगवायला सुरुवात केली. जसजसा वेळ पुढे सरकत होता तशी उत्कंठा देखील वाढत होती. आता पावसाने देखील जरावेळ विश्रांती घेतली होती. पण वातवरणात पसरलेला गारवा काही कमी होण्याचं नाव घेत नव्हता. तेव्हा वाटलं एसीला जसा रिमोट कंट्रोल असतो तसाच एक रिमोट हा वातावरणात पसरलेला एसी बंद करायला हवा होता. पाऊस थांबला वाटतं. आता पूर्ण खिडकी उघडायला मिळणार असं मनात येत नाही तोच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. 

पावसाचा वेग वाढतच चालला होता. ट्रेन लेट असल्याच्या सूचना वेळोवेळी केल्या जात होत्या. माझ्या कंपार्टमेंटमध्ये आता आम्ही चौघीच होतो. एक माझ्या अगदी समोर घोरत होती आणि दोघी माझ्या मागच्या बाजूला बसल्या होत्या. पावसाच्या सरी वार्‍याबरोबर आत येऊ लागल्या तशी घोरत असलेली महिला ताडकन जागी झाली आणि खिडकी लावा, दार बंद करा असं मोठमोठ्याने सांगू लागली. शब्दाला शब्द नको म्हणून मीही अर्धवट उघडलेली खिडकी निमूटपणे बंद केली. 

आता मात्र कानात घातलेल्या इअरफोनचाच काय तो आधार होता. बऱ्यापैकी गाण्यांचा आवाज लहान ठेवला होता. त्यामुळे ट्रेनमध्ये होणार्‍या अनाउंसमेंट स्पष्टपणे कानावर येत होत्या. आता आपल्या डेस्टिनेशनपर्यंत थोड्याच वेळात आपण पोहचणार याची उत्सुकता वाढत असतानाच एक अनाऊंसमेंट झाली. विजेचा खांब पडून लोकल सेवा पाच तासासाठी ठप्प... माझं डेस्टिनेशन मला अशा काही अनपेक्षित ठिकाणी आणून सोडेल असं वाटलंही नव्हतं. बरं, त्यात ट्रेन अशा ठिकाणी थांबली होती की ती जागा माझ्यासाठी पूर्णतः अपरिचित होती. समोरची महिला तर अजूनही आपल्याच मालकीची गाडी आहे अशी झोपली होती. मागच्या बाजूला बसलेल्या दोन बायका याला त्याला फोन करून चौकशी करू लागल्या होत्या. आतापर्यंत माझ्या मनात अनेक विचारांनी घर केलं होतं. काय करावं बसून राहावं की अजून काही? बराच वेळ असाच गेला. त्यानंतर मात्र निश्चय केला की अजून एक क्षणदेखील इथे थांबायचं नाही. सरळ उठून दाराकडे गेले. दार उघडलं. पावसाचा वेग थोडा कमी झाला होता. परंतु ट्रॅकवर पाणी भरलं होतं. थोडा अंदाज घेऊन ट्रॅकवर उडी मारली. सर्वच लोकलसेवा ठप्प झाल्याने रुळावरुन चालण्याचं हे धाडस मी केलं होतं. माझ्यासारख्या गुडघाभर पाण्यातून वाट काढत जाणाऱ्या इतर सहप्रवाशांच्या साथीने बराच पल्ला पार केल्यानंतर रेल्वे रूळाला लागूनच एक बाहेर जाणारा निमुळता रस्ता मला दिसला. हाच रस्ता गाठून मी समुद्रातून किनार्‍यावर आल्यासारखं वाटू लागलं. आता किनार्‍यावर आले होते तरी हा किनारा माझ्यासाठी तितकाच अनोळखी होता. जेवढं माझं डेस्टिनेशन. एवढ्यात मनात विचार आला हेच तर नव्हतं ना माझं अनपेक्षित डेस्टिनेशन? 


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller