मी अनुभवलेला किरकेट...!
मी अनुभवलेला किरकेट...!
क्रिकेट हा शब्द नुसता ऐकला जरी तरी एक वेगळीच उमाळी फुलून येते. तसं बघायला गेलं तर क्रिकेट हा मुलांचा प्रचंड आवडता खेळ. पण एक मुलगी म्हणून क्रिकेटकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन जरा वेगळाच आहे. हा आता, हातात बॅट धरण्याची वेळ कधी माझ्यावर आली नसली तरी वर्ल्ड कपची मॅच बघण्यात मला अजूनही मजा येते. प्रत्येक बालमन तर आपल्या कुमार वयात सचिन तेंडुलकर होण्याचं स्वप्न अंतर्मनात रंगवत असतंच. क्रिकेटसोबत प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी जोडलेल्या असतात. माझीही अशीच एक आठवण क्रिकेटशी जोडलेली आहे. ही क्रिकेटची आठवण म्हणजे २०११ची भारत विरुद्ध श्रीलंका वर्ल्ड कप मॅच. मला तर वाटतंय की, ही मॅच कोणीच विसरू शकणार नाही. तशीच काहीशी ही मॅच रंगली होती. हा चुरशीचा सामना चालू असताना माझ्या घरातलं वातावरण फारच लक्षवेधी स्वरुपाचं होतं.
घरात बऱ्यापैकी मोठा टिव्ही असल्यामुळे आजूबाजूची चिल्ली पिल्ली कारटी आमच्या घरी येऊन बसली होती. मॅच चालू होण्याआधीच घरात सचिनच्या नावाचा जयघोष चालू होता. बाहेरील वातावरणदेखील क्रिकेटमय झाले होतेे. मॅच चालू झाल्यावर टिव्हीसमोर बसलेली आमची चिल्लर पार्टी हातात पॉपकॉर्न घेऊन घरात स्टेडियमवाला फिल घेऊन बसली होती. बाबांची त्यांच्या जिवश्च कंठश्च मित्रांसोबत ऑनलाइन बेटिंग चालू होती. शिवाय बाबांना पूर्णपणे खात्री असल्यामुळे मोठ्या मनाने इंडियाच्या बाजूने बेटिंग लावली होती. घरात सर्वात लहान व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे उत्साही आजोबा. आजोबा तर थाळी आणि चमचा वाजवत चौकार आणि षटकारांना प्रतिसाद देत होते. देवभोळी आजीदेखील अध्यात्म बाजूला ठेवून नातवंडांसोबत सचिन.... सचिन.... असा जयघोष करीत होती. विशेष म्हणजे सासू-सुनेच्या मालिका पाहणारी माझी आईदेखील स्वयंपाक गृहातून डोकाऊन अधून मधून स्कोर किती झाला? असे विचारत होती. दहावीच्या परीक्षेला बसलेला बिचारा दादा आपल्या छोट्या बहिणीला कधी चॉकलेट कधी आणखी काही अशी आमिष देऊन बहिणीकडून फ्री कॉमेंट्री काढून घेत होता. लहान बहीणदेखील तेवढीच हुशार होती. आपल्याला जे जे पाहिजे त्या सगळ्याची भली मोठी लिस्ट तिने आधीपासूनच तयार ठेवली होती.
महेंद्रसिंह धोनी या मॅचची कॅप्टनशिप निभावत होता. घरातल्या सगळ्यांच्या दृष्टीने भारताची ही फारच महत्त्वाची मॅच होती. कारण या सामन्याअंती भारताला दुसर्या वर्ल्ड कपची ट्रॉफी मिळणार होती. सामना खूपच रंगत चालला होता. जशी चौकार आणि षटकारांची उजळणी होत होती. अगदी त्याचप्रमाणे विरुद्ध संघाकडून गोलंदाजीदेखील तितक्याच आक्रमकतेने होत होती. कधी इंडियाचे पारडे जड तर कधी श्रीलंकेचे पारडे जड. शेवटी तर भारत हा सामना हरणार की काय अशी काहीशी दृश्य डोळे टिपू लागले होते. डोळ्याचे पारणे क्षणभर विश्रांती घ्यायलाही तयार नव्हते. बोर्डाचा अभ्यास करण्याऱ्या दादाला त्याच्या बहिणीने जेव्हा ही परिस्थिती सांगितली तसा दादा बोर्डाचा अभ्यास अक्षरशः बाजूला टाकून बाहेर येऊन टिव्हीसमोर बसला. बाबांना तर जवळपास आज माझ्या हाती काही येणार नाही; आज मी बेटिंग हरणार अशा खात्रीत ते तोंडात बोट खालून बसले होते. चिल्लर पार्टी तर पॉपकॉर्न हातात घेऊन नुसतेच तोंड आऽऽ करुन मॅच पाहत होते. उत्साही आजोबांचा उत्साह तर पूर्णतः ढासळून गेला होता. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी म्हणत आजोबा आपल्या खोलीत आराम खुर्चीत जाऊन रेडीओ लावून बसले. आजीने तर जपमाळ हातात घेऊन हरिनाम घेण्याऐवजी इंडियाऽऽऽ इंडिया ऽऽ असा जप करुन देवाला साकडे घालू लागली. स्वयंपाक गृहातून डोकावणारी आई स्वतःशीच पुटपुटत होती.
काय त्या किरकेटचं आकर्षण म्हणून नाय. चांगली मालिका चालू होती; एव्हाना तर सुरेखाच्या सासूने तिला धक्का मारुन घराबाहेर काढले असेल. जाधव काकींची कारटी इथेच मॅच बघायला आली तेवढं एक बरं म्हणायचं. आता उद्या जाधव काकींना विचारायला लागेल. सुरेखाचं काय झालं ते? असे काहीसे आईचे पुटपुटणे नॉनस्टॉप चालूच होते.
हे सारे क्षण कॅमेरा किंवा मोबाईल कॅप्चर करु शकला नसता. म्हणूनच मी हे क्षण माझ्या डोळ्यासकट मनामध्ये आजही टिपून ठेवले आहेत. पण या सामन्यानेदेखील आमच्यासारख्या चाहत्या वर्गाचा मान राखला आणि भारताला दुसरा वर्ल्ड कप मिळवून दिला. माझी लहानपणाची खूप छान आठवण आहे ही; जी मी आता ही एखादी मॅच चालू असेल तरी आठवून खदखदून हसते.