STORYMIRROR

Ishwari Shirur

Drama Tragedy

4.2  

Ishwari Shirur

Drama Tragedy

पालक दोस्त की घोस्ट

पालक दोस्त की घोस्ट

14 mins
24.1K


प्रस्तुत कथा मुंबईच्या स्मार्टसिटी मधील एका उच्चभ्रू अशा सावंत कुंटुंबाची आहे. हे सावंत पुर्वी कोकणात राहत. तिथेच यांचं बालपण, तारुण्य यांच्या आई-वडिलांनी रेखाटल्याप्रमाणे सुरळीत घडलं. देवाब्राह्मणाच्या साक्षीने विवाहदेखील घरच्यांनी ठरवल्याप्रमाणेच संपन्न झाला. सावंत थोडे कठोर पण आतून फारच मृदू स्वभावाचे. त्यातही सौ. सावंत तर फारच हळव्या स्वभावाच्या. कोणाच्याही सुख-दुःखात सहज आपलं म्हणून सामील होत, असं यांचं व्यक्तिमत्त्व. श्री. व सौ. सावंत नेहमीच धाकात वाढलेले. त्यामुळे आपल्याला मुलं झाली की आपणही त्यांच्यावर असाच हुकूम गाजवायचा म्हणजे त्यांच्याकडून कोणती चूक होणार नाही असे सावंतांनी मनातच ठरवले. अपत्य झाल्यावर मात्र आपल्या आईला घेऊन मुंबईत स्थायिक झाल्याने घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई यांच्यासाठी तशी नवीनच ठरली. सावंतांचं कन्यारत्न स्वरा आणि वंशाचा दिवा शंतनू अशी ही नवसाची दोन अपत्ये. मूल जन्माला येऊन मोठं होईपर्यंतच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पालकांचं मुलांसोबतचं नातं बदलत असतं. आयुष्याच्या एका टप्प्यावर तर पालक बालक होतात नि बालक पालक होतात. 


स्वरा शंतनूपेक्षा चार वर्षाने मोठी, अभ्यासात हुशार, गोड गळ्याची आणि स्वावलंबी स्वभावाची तर शंतनू मात्र खोडकर आणि हट्टी स्वभावाचा. पण घरात आजी नावाचं देवभोळं व्यक्तिमत्व असल्याने सावंतांच्या मुलांवर पाळण्यात असल्यापासूनच सुलभ संस्कार झालेले. हा आता घरातलं शेंडेफळ म्हणून शंतनूचे फार लाड पुरवले जात. शिवाय सावंत मंत्रालयात उच्च पदावर आणि सौ. सावंत या गृहलक्ष्मी. घरात लक्ष्मी जणू पाणी भरत असल्याने आर्थिक चणचण अजिबात नव्हती. दिवसामागून दिवस जावे तसे सावंतांची अपत्ये मोठी होत गेली. आता मात्र आधी पुरविले जाणारे लाड बऱ्यापैकी लोप पावले होते. 


स्वरा जगाच्या पाठीवर नेहमीच एक पाऊल मागे असायची. त्यामुळे कोणतीही गोष्ट तिच्यापर्यंत येईपर्यंत ती गोष्ट इतिहासजमा झालेली असे. ती वयात आली तेव्हाही तिच्याबद्दल असेच काहीसे घडले. वयात येईपर्यंत तिला या नैसर्गिक क्रियेची साधी कल्पनाही नव्हती. आणि, वयात आल्यानंतरची योग्य ती सूचनादेखील तिला तिच्या काकीकडून मिळावी हे नवलच! मुळात घरातला संवाद एवढा खुंटावा का? या विचाराने स्वरा नेहमी त्रस्त होत असे. शिवाय आजीने वयात आल्यावर सांगितलेल्या भयावह अंधश्रद्धा स्वरासाठी गळफास भासू लागल्या होत्या, असो. 


आता स्वरा स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत होती. विज्ञान शाखेत पदवी मिळवून पुढील उच्च शिक्षणासाठी तिला पुण्याला जाण्याची तीव्र इच्छा होती. स्वराने आपली ही इच्छा घरातल्यांसमोर व्यक्त केली. यापूर्वी स्वराने कधीच कोणत्या गोष्टीची मागणी अथवा इच्छा घरातल्यांकडे व्यक्त केली नव्हती. घरातली लेक खूप छान शिकून सावंत कुटुंबाचं नाव काढेल, उच्च पदावर, उच्च पगारावर नोकरीला लागेल असा बाबांचा आणि आईचा विश्वास असला तरी वर्तमानपत्रात सतत डोकावणाऱ्या बलात्काराच्या बातम्या आईच्या मनात वेगवेगळ्या विचारांनी सुरपारंब्या खेळत होत्या. म्हणून पुण्याला उच्च शिक्षणासाठी जाण्यास आईने अगदी चुटकीसरशी नकार कळवला. यावर स्वराचे वडीलदेखील प्रश्नार्थक नजरेने आईकडे पाहू लागले. कालपर्यंत स्वराला लग्नासाठी घाई करु नका तिला शिकायची इच्छा आहे तर शिकू द्या; असे म्हणणारी आई आज मुलीला शिक्षणासाठी नकार का देते? हे सावंतांसमोर उद्भवलेले एक कोडेच जणू! यावेळी तर पारंपारिक तत्त्वाने वावरणारं देवभोळं व्यक्तिमत्वदेखील हयात नव्हतं. मग शिक्षणाला नकार का करावा? कारण शंतनूचं शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीच सावंत आजी दिवंगत झाल्या होत्या. नाहीतर स्वरा यंदा संसार सांभाळत असती. असो, नको तो पारंपरिक भविष्यकाळ! आईच्या होकाराची वाट न पाहताच स्वरा पुढील शिक्षणासाठी पुण्यात स्थायिक होते. स्वरा पुण्याला गेली हे कळताच आई आपल्या नकाराचे कारण स्वराच्या वडिलांना सांगते. आता मात्र आईला धीर देत सावंत स्वतःच्या मनाची समजूत काढतात. त्याचबरोबर सावंत दररोज दिवसातून दोन वेळा तरी स्वराला भ्रमणध्वनी करुन तिची हालचाल विचारात घेतात किंवा तिच्या दिवसभरातील घटनांची नोंद घेत असतात. पुण्याच्या वातावरणाची सवय व्हावी याकरिता स्वरा आठवड्याआधीच पुण्याच्या वसतिगृहात आलेली असते. आपण इथे व्यवस्थित रुळलो आहे याची खात्री ती दररोज बाबांना द्यायची. 

 

महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी तिची नकळतच भेट होते ती म्हणजे गौरांग सोबत. गौरांग महाविद्यालयातील एक होतकरू विद्यार्थी. श्रीमंत कुंटुंबात वाढला असला तरी त्याला पैशाची जाण होती, मेहनतीचा पैसाच त्याला प्रिय होता. तो अभ्यास आणि अभ्यासेतर सर्व गोष्टींमध्ये पारंगत, मनमिळाऊ स्वभावाचा. स्वरा पुस्तकी किडा तर गौरांग अष्टपैलू सर्वगुणसंपन्न असा आहे. तसं स्वराला गाण्याची फार आवड होती. पण अभ्यासामुळे तिने संगीताला आपल्यातील एक सुप्त कला असा स्वयंघोषित ठसाच दिला होता. या दोघांची मैत्री ही निव्वळ योगायोग आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. कारण स्वराच्या अति अभ्यासू स्वभावामुळे आजवर तिचा एकही मित्र नव्हता. पण ती मात्र त्यात खुश होती. एक दोन मैत्रिणी होत्या पण त्या नावापुरत्या आणि कामापुरत्या स्वराशी जवळीक साधणाऱ्या होत्या. गौरांगच्या मनमिळाऊ स्वभावामुळे मात्र त्याच्या आजूबाजूला बऱ्याच मित्र-मैत्रिणींचा गदारोळ सतत असे. एवढे असूनही कोणत्याही मुलीचा भ्रमणध्वनी त्याच्याकडे संग्रही नव्हता. कधीच कोणत्या मुलीचे आकर्षणही त्याला नव्हते. हा आता लहानपणापासून आईनेच त्याचा सांभाळ केल्यामुळे मुलींविषयी एक सॉफ्ट कॉर्नर त्याच्या मनात सतत होताच. असे सगळे विरोधाभास असतानादेखील हे दोघं एकमेकांना कसे भेटले? यांच्यामध्ये नक्की काय संवाद झाला असावा की हे एकमेकांचे चांगले मित्र बनले? असे नाना तऱ्हेचे प्रश्न पडणे स्वाभाविक आहेच. 


तर झाले असे की, महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी उशीर होऊ नये या हेतूने स्वरा वसतिगृहातून जरा लवकरच महाविद्यालयात आली. महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार अजूनही विद्यार्थ्यांसाठी बंदच होते. हा आता त्याला कारणही अगदी तसेच होते. एक तर शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी जास्त विद्यार्थी संख्या उपस्थित नसते. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उत्साही मंडळी तेवढी पहिल्या दिवशी हजेरी लावते. त्यामुळे प्रांगणात गोंधळ होऊ नये म्हणून प्राध्यापकांच्या आदेशानुसार मुख्य दरवाजा बंद ठेवण्यात आला होता. स्वरा काय तशी या उत्साही मंडळीत मोडत नव्हती. पण तिला हा महाविद्यालयाचा पहिला दिवस अनुभवायचा होता. तात्पुरता कोठेतरी विसावा घ्यावा असा विचार करून ती आपल्या कटाक्ष नजरेने योग्य जागेचा कानोसा घेत होती. महाविद्यालयाला लागूनच विशाल असे वडाचे झाड आणि त्याखाली मोठा असा चबुतरा होता. त्याला विद्यार्थ्यांनी 'विद्यार्थी कट्टा' असे नाव दिले. अजून बराच वेळ असल्याने स्वरा या कट्ट्यावर पुस्तक वाचत बसली. त्यात योगायोग असा की बरोबर तिच्याच मागच्या बाजूला गौरांग गँग बसली होती. पाच जण असावे बहुधा असा अंदाज स्वराने लावला. स्वराला खरंतर त्यांच्यात काडीमात्र रस नव्हता. पण पक्ष्यांनाही लाजवेल असा कर्कश किलबिलाट ही मंडळी करीत होती. बरं त्यात इतरत्र बसण्याची कोठे सोय दृष्टीस पडत नसल्याने स्वराकडे तिथेच बसण्याखेरीज अजून कोणताही पर्याय शिल्लक उरला नव्हता. आजूबाजूला काही वरिष्ठ मंडळीदेखील फेरफटका मारत होती. त्यांना मात्र हा गदारोळ सहन होत नव्हता. म्हणून त्यातील एक वरिष्ठ पुढे आला आणि जरा वरच्या स्वरातच त्यांना दम दिला. 'कारट्यांनो आधीच अर्धी लाकडं मसनात गेली आहे. उरलेली तुम्ही पाठवणार आहात का?' जरा पुढे येऊन सन्मित्र मंडळींशी जरा बारिक आवाजात पुन्हा पुटपुटतात; घरी थांबायचं म्हटलं तर सुनेची आदळआपट असते आणि म्हणून निसर्गाच्या सान्निध्यात निवांत मन रमवावं म्हटलं तर या कारट्यांचा किलबिलाट! या मंडळींचा झालेला संताप पाहून गौरांगने मैफिल जरा शांत केली. तेवढंच काय ते स्वराला स्मितहास्य करण्याची संधी मिळाली. आता गौरांग गँगमधील एक जण बाईकवर बसून कसली तरी यादी वाचत होता. ही यादी सांस्कृतिक, कला आणि क्रिडा क्षेत्रातील बाह्य स्पर्धांची आहे हे तिला थोड्यावेळाने स्पष्ट झाले होते. या यादीत एक साम्य तिला आढळले. ते म्हणजे प्रत्येक यादीत असलेले गौरांगचे नाव. कोण असावा हा अष्टपैलू गौरांग असा एक हलका विचार करुन ती पुन्हा पुस्तकात रमली. ओठांवर पुस्तकातील शब्द आणि डोक्यात मात्र गौरांगचा विचार. आतापर्यंत तिच्या समोर गौरांगची अस्पष्ट पुसट अशी प्रतिमा उभी राहिली होती. पण गौरांग आणि स्वरा अजूनही एकमेकांसाठी अनोळखीच होते. हा सगळा पडद्यामागील लपाछपीचा डाव चालू असतानाच झाडाची सुकलेली फांदी कोण्याएका सद्गृहस्थाच्या डोक्यावर पडते. बरं हे गृहस्थ त्या वरिष्ठ मंडळींमधील एक म्हणून गौरांगच्या मित्राला हसू अनावर झाले. 'मुले ही देवाघरची फुले असतात' त्यांना दुखावलं तर देव शिक्षा करतो. असे अगदी सहजच तो बोलून गेला. दरम्यान, दोन वेगवेगळे गंभीर स्वर कानी येऊन गृहस्थ धारातीर्थी पडतात. फांदी डोक्याला लागल्याने डोक्यातून रक्ताची नदी वाहू लागते. हा सगळा तमाशा सगळे मुकाट्याने पाहत असताना गौरांग तातडीने पाणी घेऊन त्या गृहस्थांपाशी जातो. तोंडावर पाणी मारतो आणि खिशातून रुमाल काढून डोक्याला बांधतो. जेणेकरून रक्तस्त्राव थांबेल. स्वरा लांबूनच हे सर्व गंभीर चित्र बघत असते. तिने तिच्या आजोबांना कधीच पाहिले नव्हते त्यामुळे त्या निपचित गृहस्थांना पाहून तिचे डोळे पाणावून जातात. पण हतबल झालेल्या स्वराकडे फक्त लांबून बघण्याशिवाय गत्यंतर नसते. 


कितीही प्रथमोपचार केले तरी गृहस्थ शुद्धीवर येत नाहीत हे कळल्यावर गौरांग मित्राच्या बाइकवरून गृहस्थांना तात्काळ इस्पितळात दाखल करतो. या सगळ्यात स्वरा दुहेरी मनातून कुठेतरी गौरांगचा शोध घेत असते. एखाद्या अनोळखीची एवढ्या तातडीने सेवा करावी हा गौरांगमधील माणुसकीचा गुण स्वराला फार आवडला होता. पण स्वराला अजूनही याची कल्पना नव्हती की आपण ज्याचं चित्र मनातल्या मनात रेखाटत आहोत तो हाच गौरांग आहे. इस्पितळात काही हालचालीनंतर तीन चार चिकित्सक मंडळी बाहेर आली. गौरांग प्रथम घाबरून गेला की नक्की काय झाले असावे? पण त्याची शंका दूर करत गौरांगला 'आता आजोबा बरे आहेत, थोड्या आरामानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल.' असे सांगितल्यावर त्याच्या जिवात जीव आला. त्याला ही बातमी घरी जाऊन सांगायची होती; त्यामुळे तो महाविद्यालयात न जाता तसाच घरी गेला. गौरांगच्या बाबांना ही बातमी कळताच त्यांनी गौरांगचे कौतुक करण्याऐवजी त्याला चांगलेच सुनावले. 'पैसे काही झाडाला लागलेले नाही, अशी उधळपट्टी चालू ठेवली तर एक दिवस आपणच रस्त्यावर येऊ.' हे शब्द गौरांगच्या मनात घर करून बसले. आपण केलेली जनसेवा नाही तर गुन्हा आहे असे काहीसे त्याला वाटू लागले. खरं तर या वयात मुलांना पालकांच्या पाठिंब्याची फार गरज असते. त्यामुळे मुलांना त्यांचं मत मांडण्याची एक संधी तरी द्यावी. गौरांगचे हे वागणे वडिलांना खटकले असले तरी स्वराला त्याचा अभिमान वाटत होता; आणि दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात गौरांगचा विशेष सत्कार केल्यामुळे स्वराला तिच्या मनात अस्पष्ट असलेला गौरांग आता स्पष्ट दिसला होता. तिथूनच स्वरा आणि गौरांगच्या संवादाला सुरुवात झाली. पुढील काळात गौरांगसोबत राहून राहून स्वरा अभ्यासासोबतच इतर कार्यक्रमात सहभागी होऊ लागली. दोघांची आता चांगलीच गट्टी जमली होती. त्यामुळे घरी भ्रमणध्वनी करण्याचं प्रमाण आता चांगलंच कमी झालं होतं. खर तरं गौरांगसारखं सगळं जमवून घेण्याची सवय स्वराला अजिबातच नव्हती. म्हणून दिवसभर अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमांमुळे स्वरा फार दमून जात. शिवाय स्वरा रात्री लवकर झोपत असल्याने बाबंना भ्रमणध्वनी करण्याचे ती विसरून जाई. बाबांना मात्र कुठून तरी अफवा समजते की, स्वरा सतत कोणासोबत तरी असते. त्यामुळे तिला घरी भ्रमणध्वनी करायला वेळ मिळत नाही. सावंत याविषयी स्वराशी वार्तालाप न करता स्वतःलाच दोष देतात. शेवटी सहन न होऊन सावंत स्वराला न कळवताच स्वराच्या महाविद्यालयात अनपेक्षित भेट देतात. महाविद्यालयाच्या प्रांगणात शिरताच फलकावर ठळक अक्षरात गौरांगचे कौतुक केलेले असते. हे पाहून सावंतांना गौरांगचा अभिमान वाटतो. शेवटी काय सावंतांसाठी गौरांग हा एक अनोळखी इसमच.

असो! 


सावंत जवळपास स्वराला महाविद्यालयातून कमी करण्याच्या हेतूनेच प्राध्यापकांना भेटायला गेले. प्राध्यापक काही कारणास्तव उपस्थित नाहीत; लवकरच येथील, तोपर्यंत आपण आत बसून घ्या. असे सांगून तेथील कर्मचारीे रजा घेतो आणि प्राध्यापकांच्या खोलीत बसून प्रतिक्षा करायला सांगतो. प्राध्यापकांच्या खोलीत ठिकठिकाणी स्वराने अभ्यासेतर उपक्रमांमध्ये पटकावलेल्या बक्षिसांची छायाचित्रे सावंत डोळे भरून पाहतात. हे पाहून सावंतांचे मन गहिवरून येते. ऐकले ते नवलच आणि पहावे ते नवलच; अशा द्विधा मनस्थितीत असतानाच प्राध्यापक खोलीत येतात. जरा साशंक नजरेनेच ते विचारतात, आपण? पाणावलेल्या डोळ्यांनी स्वराच्या छायाचित्राकडे पाहत ते उत्तर देणार इतक्यात, तुम्ही स्वराचे वडील का? असे प्राध्यापक विचारतात. लेकीच्या नावाने वडिलांची झालेली ओळख सावंतांना खूप अभिमानास्पद वाटते. होकारार्थी मान हलवत सावंत संवाद साधण्यास सुरू करतात. पण आतल्या आत स्वतःला अपराधी समजून संवाद अर्ध्यातच सोडून स्वराला न भेट देताच निघायच्या मनःस्थितीत असतात. इतक्यात स्वरा ग्रंथालयातून बाहेर येताना त्यांना दिसते. सावंत चेहरा लपवणार तेवढ्यात स्वरा धावत येऊन त्यांना मिठी मारते. मी भ्रमणध्वनी करायला विसरते म्हणून तुम्ही माझी भेट घेण्यासाठी आलात, मला फार बरे वाटले. आई कशी आहे? शंतनू अभ्यास करतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 'हा', 'हमम्' अशा स्वरुपात देऊन सावंत जरा शांतच उभे राहतात. या दोघांचा संवाद चालू असतानाच गौरांग वक्तृत्व स्पर्धेचं पारितोषिक घेऊन तिथे येतो. स्वरा वडिलांना गौरांगची ओळख करून देते. याच्यामुळेच अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमात कसा समतोल साधला जातो याची प्रचिती मला झाली. स्वराचे हे बोल ऐकून सावंत गौरांगला शुभेच्छाप्रत 101 रुपये देतात. मनातल्या सगळ्या शंका दूर करून हलक्या मनाने सावंत पुन्हा मुंबईला प्रस्थान करतात. 


आई, वडील, आजी आणि मुलं यांमध्ये वयोमानानुसार असलेले अंतर मुलांच्या प्रत्येक आवडीनिवडींना मान्यता देईल असे नव्हते. शंतनू लहानपणापासून हट्टी, त्यामुळे त्याच्या आवडीनिवडी देखील तशाच. शंतनूला अभ्यासेतर सर्व गोष्टींची आवड होती. क्रिकेट आणि गिटार हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय होता. शालेय जीवनात प्रगती पुस्तकावर अभ्यासाचे विषय जरी लाल शाईने दाखवले असले तरी क्रिडा आणि सांस्कृतिक क्षेत्र शंतनू चांगलंच गाजवायचा. सावंतांना हे माहीत असूनही त्यांनी त्याच्या मानगुटीवर बसून अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घ्यावा यासाठी हट्टहास धरला. शंतनूला अभियांत्रिकी क्षेत्रात काडीमात्र रस नसल्याने प्रसंगी काय करावे हे सुचत नव्हते. यामुळे शंतनू मोठ्याच पेचप्रसंगात सापडला. तेवढ्यात त्याला लक्षात येते की, अभियांत्रिकी क्षेत्रात जाण्याइतपत आपले गुणांक तर नाहीच मग बाबांची इच्छा कितीही असली तरी जाणे शक्य नाही. तरी मुद्दामच शंतनू बाबांना म्हणतो, अशी सगळी तुमची स्वप्न आमच्यावर लादली तर आम्ही पाहिलेल्या स्वप्नांचं काय? पण सावंत शंतनूपेक्षा जरा हुशारच होते. शिक्षणातील अनुभव, कामातील प्रसिद्धी, गाठीशी असलेला चांगल्या माणसांचा सहवास आणि शंतनूपेक्षा अधिक पावसाळे पाहिल्यामुळे एकंदरीतच शेवटी तेच झाले जे वडीलांना अपेक्षित होते. गुणवत्ता आणि क्षमता नसूनही बाबांच्या ओळखीवर शंतनू अभियांत्रिकी क्षेत्रात ढकलला गेला. लहान असतानाच फार लाड पुरविले होते. त्यामुळे आता मात्र नाक मुठीत धरून शंतनू अभियंता होण्यासाठी तयार झाला. अभियांत्रिकी क्षेत्रात असताना त्याच्या कलेकडे दुर्लक्ष तर झालेच, शिवाय अभियांत्रिकी विषय फारसे जमले नसल्याने दुसऱ्याच वर्षी तीन विषय राहिले. याआधी शंतनू पास होण्यापुरते तरी गुण मिळवायचा. अभियांत्रिकीचे प्रथम वर्ष देखील शंतनू यशस्वी पार पाडले होते. त्यामुळे पदरी पडलेलं अपयश हे आयुष्यातील सर्वात मोठे अपयश आहे असे त्याला वाटू लागले. शंतनूने ही बातमी वडिलांना सांगण्याआधी स्वराला सांगितली. स्वराने त्यावर, 'तुझा ज्या क्षेत्रात हातखंडा आहे त्याच क्षेत्रात मेहनत घे' असा सल्ला दिला. हे ऐकून शंतनूला जरा आधार मिळाला. आई आणि बाबादेखील आपल्याला असेच समजून घेतील या आशेवर शंतनू ही वार्ता घरी सांगतो. त्यावर आईची प्रतिक्रिया, 'शिक्षण वगैरे सोडून दे आणि घरी बस. आमची लाज तर घालावलीस, आता आम्ही चारचौघात काय तोंड दाखवायचं?' इतक्यात एवढा वेळ मौन धारण केलेले वडील दोघांचीही समजूत काढतात. 'अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे तू खचून जाऊ नकोस. पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात कर. तुला यश नक्कीच मिळेल,' असे सांगून सावंत पुन्हा शंतनूला अभियांत्रिकी क्षेत्रातच तुझं करिअर आहे हे ठासून सांगतात. कुबेराशी पुर्वीचे नाते असल्यासारखे सावंतांचे उत्तर असते. असो! हतबल झालेला शंतनू स्वराला भ्रमणध्वनी करुन घरच्यांचे उत्तर कळवतो. स्वरा हे ऐकून निःशब्द होते. तिला यावर काय बोलावे सुचत नाही. दरम्यानच्या काळात शंतनू गिटार वाजवण्याची कलादेखील विसरून जातो. एकवेळ त्यालाही वाटते की, आपणही वेळेत ताईसारखे लांब जायला पाहिजे होते. पण शंतनूला मायग्रेनचा खूप त्रास होत असल्याने ते काही शक्य नव्हते. आता अभियांत्रिकी क्षेत्रात जमवून घेण्याखेरीज त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. 


शंतनू वडिलांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा अभियांत्रिकी क्षेत्रात मन रमवायचा प्रयत्न करतो. दिवसरात्र रट्टा मारुन अभ्यास करतो. आता शंतनू गिटार तर विसरतोच पण शालेय जीवनात मिळवलेली, धूळ खात पडलेली बक्षिसे दररोज डोळ्यासमोर पाहून त्याला फार दुःख होतं. एकदा असंच घरातून महाविद्यालयात जाताना घराबाहेरच त्याला त्याचा बालमित्र भेटतो. गौतम आणि शंतनू दहावीपर्यंत सोबतच होते. गौतमला पाहून शंतनूला फार आनंद होतो. डोळ्यावर गॉगल, कानात हेडफोन, अंगात जॅकेट, खांद्यावर गिटार, पायात जिन्स आणि ब्रँडेड शूज हा त्याचा अवतार शंतनूला त्याच्या भूतकाळाची आठवण करून देत होता. दहावीनंतर मिळालेली खूप मोठी सुट्टी या दोघांनी भरपूर स्पर्धा, कार्यक्रमांनी भरुन काढली होती. पण शंतनू सोबत असताना गौतमला कधीच पहिला नंबर प्राप्त करता आला नाही. आता मात्र शंतनूची ही हालत बघून गौतमला धक्काच बसला. फॉर्मल शर्ट पॅन्ट, खांद्यावर न पेलवणारी बॅग आणि हातात दोन पुस्तके. अबब! त्यात पण दहावीपासूनच बाइकचे प्रचंड वेड असणारा हा शंतनू रिक्षाची वाट पाहत घराबाहेर थांबला होता. गौतम त्याला त्याच्या या अवस्थेचे कारण विचारणार इतक्यातच गौतमला दहावीची पालकसभा आठवते. शिक्षक त्या दिवशी सगळ्यांना पुढे काय करणार याबाबत विचारत होते. शंतनूकडे हा प्रश्न येताच त्याचे उत्तर वडिलांनीच दिले होते. माझा शंतनू अभियांत्रिकी क्षेत्रात जाणार आहे. गौतम शंतनूला एक पेपर देऊन काहीही न बोलता तसाच निघून जातो. त्या पेपरात 'संगीत संध्याकाळ' नावाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण दिलेले असते. शिवाय त्यात वादक म्हणून गौतम आणि सहकारी असे नमूद केलेले असते. ते पाहून शंतनू आतल्या आत दुखावला जातो. पेपर फाडून शंतनू रिक्षातून महाविद्यालयात जातो. हळूहळू परिक्षेचा सप्ताह जवळ येतो आणि शंतनूला आणखी भीती वाटायला लागते. पदरी पडलेला भूतकाळ स्मरण करुन शंतनू परीक्षागृहात जातो. परीक्षा झाल्यावर काहीच कालावधीत परीक्षेचा निकाल लागतो आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते. म्हणजेच शंतनूचे पुन्हा दोन विषय राहतात. आता मात्र शंतनू पुर्णपणे खचून जातो. इथे गुंतवलेले पैसे जर वेळ निघून जाण्याआधीच संगीत क्षेत्रात गुंतवले असते तर सत्कारणी लागले असते असे त्याला राहून राहून वाटू लागते. आता तर सगळंच संपलंय, घरी कोणत्या तोंडाने जाऊ?, आई बाबा खूप ओरडतील, या कल्पनेने तो घरी जातच नाही. स्वराला तेवढा निरोप देऊन आपण पुन्हा अयशस्वी झाल्याचे कळवतो. स्वरा शंतनूची समजूत काढते आणि तुझी काहीही चूक नाही तू असं खचून जाऊ नकोस; आधी घरी जा, असा सल्ला देते. शंतनू बऱ्याच कालावधीनंतर घरी जायचे निश्चित करतो. पण शंतनू घरी पोहोचण्याअगोदरच घरी निकालाची कल्पना आलेली असते. आता मात्र आपण शंतनूबाबत खूप मोठी चूक केली हे आई-वडिलांच्या लक्षात येते. या वयात खरं तर मुलांनी पाहिलेल्या स्वप्नांमागे ठामपणे उभे राहायचे असते. आपण तर आपलीच स्वप्नं त्यांच्यावर लादली; असे म्हणून वडील खूप भावूक होतात. मी तर आई असून आपल्याच मुलांना समजून घेऊ शकली नाही याची आईला फार खंत वाटते. याचवेळी शंतनू घराकडे पोहोचतो. मनात अनेक निरुत्तरी प्रश्न घेऊन तो दाराची कडी वाजवून विचार करत थांबतो. इतर वेळी पाच-सहा डोअर बेल वाजवणारा शंतनू आज चक्क दारची कडी वाजवून थांबला? नक्की शंतनूच आला असेल का? या साशंक मनाने आई दार उघडते तोच शंतनू घळाघळा रडत आईला मिठी मारतो. आई मुद्दामच विचारते, काय झालं बाळा? काही त्रास होतोय का? इतक्यात सावंतदेखील येतात. वडिलांना पाहून शंतनू आणखी हुंदके देऊन रडायला सुरु करतो. बाबा मला माफ करा मी तुमचे स्वप्न साकार करण्यास अपात्र ठरलो. असे सांगून तो पुन्हा रडू लागतो. त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसत, बाळा खाऊन घे आणि आराम कर आपण उद्या बोलू, असे सांगून सावंत तिथून निघून जातात. शंतनूला आईला पण आपण कसे अयशस्वी आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. जेवणाचे ताट पुढे करुन आई त्याला सांगते, उद्या बाबा बोलणार आहेत ना तेव्हा बघू. आता न विचार करता जेऊन घे आणि खोलीत जाऊन झोप; असे आई सांगते. थोडेसे जेवून शंतनू आपल्या खोलीत जातो. आई आणि बाबांनी आपल्याला माफ केले असेल का की अजून काही... असे बाबांचे काहीही न बोलता निघून जाणे मला अजिबातच अपेक्षित नव्हते. उद्या नेमके काय होणार? हे सगळे प्रश्न त्याच्या मनात हेलकावे घेत असतात. घडलेला सगळा प्रकार शंतनू भ्रमणध्वनी करुन स्वराला सांगतो. स्वरा दुसऱ्याच दिवशी मुंबईला येण्याचे निश्चित करते. 


दुसऱ्या दिवशी सकाळीच स्वरा घरी येते. शंतनूची समजूत काढून झाल्यावर शंतनू तिला बाबा पुण्याला येण्याचे खरे कारण सांगतो. स्वराला फार वाईट वाटते. आपल्याबद्दल बाबा असा विचार कसा करु शकतात या फक्त विचारानेच स्वरा खूप नाराज होते. स्वरा, आई आणि शंतनू यावर बऱ्याच वेळ 'सं'वाद करतात. सावंत मात्र स्वरा येण्याआधीच मंत्रालयात गेलेले असतात. आपल्यामुळे शंतनूच्या आयुष्यातीन तीन वर्षे वाया गेली आहे, हे सावंतांना सहन होत नसते. आपल्या दोन्ही मुलांबाबत आपण चुकीचा विचार केला याबद्दल त्यांना आतल्या आत पश्चात्ताप होत असतो. संध्याकाळी मंत्रालयातून घरी परतताना सावंत मुंबईतल्या सगळ्यात चांगल्या म्युझिक क्लासमध्ये जाऊन शंतनूची नाव नोंदणी करतात. आता घरात जाऊन काय बोलायचे? संवाद कोठून साधायचा या विचारात ते दारापाशी येऊन थांबतात. त्याचवेळी शेजारील विवेक हातात मिठाईचा मोठा डब्बा घेऊन तिथे येतो. काय रे विवेक इथे कसा? आणि ही मिठाई कोणत्या आनंदाचा संकेत म्हणावी? सावंत जरा साशंक मनानेच विचारतात. त्यावर विवेक सांगतो, काका आता मला काय बाहेर उभं करुनच सगळं विचारणारं का? घरी तर चला मला काकींनाही सांगायाचे आहे. आता विवेक सोबतीला आहे म्हटल्यावर सावंत त्याला घेऊन घरी येतात. स्वरा आणि शंतनू बाबांना पाहून काहीतरी बोलणार इतक्यात विवेक मोठ्या आनंदाने सगळ्यांना मिठाई भरतो. काका, काकी माझ्या घरी लक्ष्मी आली आहे. मी बाबा झालो. डोळ्यात साचलेले आनंदाश्रू पुसत विवेक ही वार्ता सांगत असतो. खूप छान बातमी आणलीस पोरा, छान संसार कर, मुलीला खूप शिकव आणि तिला कसलीही कमी भासू देऊ नकोस असे सांगून आई देवाकडे साखर ठेऊन येते. हे वाक्य आपल्यालाही कोणीतरी सांगितले होते पण आपण असफल ठरलो असे मनातल्या बोलून सावंत डोळ्यात आलेले अश्रू गिळतात. विवेककडे जाऊन त्याचा हात हातात घेऊन त्याला समजावतात तुझ्या मुलीच्या निर्णयामागे नेहमी ठामपणे उभं राहा. तिला ज्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचं आहे त्या क्षेत्रात तिला शिक्षण घेऊ दे. आता मात्र अनावर झालेले अश्रू सावंत थांबवू शकत नाही. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, ती तुझ्याकडून काय तर कोणत्याच पालकाकडून होऊ नये असे मला वाटते. पालकत्व स्विकारणं आणि परिपूर्ण पालक होणं यात समतोल साधता आला पाहिजे. मुलांच्या प्रौढ वयात त्यांचे पालक नाही तर मित्र म्हणून त्यांच्याशी संवाद साधावा. मुलांना त्यांच्या स्वप्नांना गगनभरारी घेण्यास पाठिंबा द्यावा. सावंतांच्या शंतनू आणि स्वरावर आलेली वेळ कोणत्याही पाल्यावर येणार नाही याची दक्षता प्रत्येक पालकाने घेतली पाहिजे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama