आठवणीतला वाडा...
आठवणीतला वाडा...


डिसेंबरचा महिना, गुलाबी थंडी आणि सर्वदूर पसरलेला काळाकुट्ट अंधार. बरं ही काही रात्रीची वेळ नव्हे तर अगदी ब्रह्ममुहूर्ताची वेळ असावी. दृष्टी जाईल तिथवर घनदाट वनराईची सजावट, नीरव शांतता आणि त्याच्या बरोबर मध्येच एक भव्य दगडी वाडा. हा आता तुम्हाला वाटत असेल मी एखादी भुताची गोष्ट वगैरे सांगतेय पण तसं अजिबात नाही. ही एक गोड आठवणींची सहल आहे. शिवाय हा वाडा अविस्मरणीय अशा आठवणींचा पेटारा आहे.
या वाड्यात नर्मदाबाई नावाची, देवभोळं व्यक्तिमत्व असलेली आजी आणि तिची दोन नातवंडं राहत. कन्यारत्न काव्या आणि वंशाचा दिवा सदाशिव अशी ही दोन नातवंडं. यांचे आई-वडील एका अपघातात गेले असेच आजवर आजीने या चिमुकल्यांच्या कानावर घातले. बरं वास्तवाची शहानिशा करण्याइतपत कोणाच्या खांद्यात बळ नव्हते. म्हणून आई-वडिलांचा अपघाती मृत्यू हेच काय ते त्रिकालाबाधित सत्य ठरले.
काव्या आणि सदाशिव लहान असताना वाड्याच्या परिघासमोर सुर पारंब्या, लगोरी, विटी-दांडू असे अनेक खेळ खेळायचे. शालेय शिक्षण म्हणाल तर, सदाशिव अगदी आवड नसतानाही या भुताटकी जागेत नववीपर्यंत शिकला. हा आता शून्याचा शोध तेव्हा काही लागला नव्हता म्हणून सदाशिव दहावीपासून आणि परीक्षेत शून्य मिळण्यापासून वाचला. काव्या मात्र आवड असूनही जास्त शिकू शकली नाही. तशी तिच्या शिक्षणाची तिथे काही सोयही नव्हतीच म्हणा. स्वतःची स्वाक्षरी करता आली म्हणजे पोरं सुशिक्षित असा गोड गैरसमज भोळ्या आजीचा. असो!
दिसायला भव्य असलेल्या या वाड्यात हे तिघेच गुण्यागोविंदाने राहत असत. वाड्यासमोर असलेल्या तुळशी वृंदावनाची नर्मदाबाई तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेत. तिन्हीसांज होताच तुळशीसमोर बसून सदाशिव आणि काव्याला घेऊन देवपूजा करीत. चंद्राच्या प्रकाशात भाकर-ठेचा खाऊन आजीच्या मंजुळ स्वरात विठ्ठलनामाच्या अभंगाने दोन्ही लेकरं छान झोपत. लहान असेपर्यंत ही लेकरं साखरझोपेत असतानाच आजी संपूर्ण वाडा आणि वाड्यासमोरील परीघ एकटीच आवरुन घेत. दररोज सकाळी तुळशीसमोर छानशी रांगोळी काढून वातावरण आल्हाददायक होत. मुलांची सकाळ मात्र पक्ष्यांच्या किलबिलाटाने होत असे. निसर्गाचा अमूल्य ठेवा उपलब्ध असल्याने विविध रंगछटा, शैली असलेले भरपूर पक्षी इथे विसावा घेत. उषःकाल झाली की या पक्ष्यांचे असंख्य थवे उदरनिर्वाहासाठी इकडून तिकडे ये-जा करीत असे. हे थवे वाड्याभोवती ट्रॅफिक जाम करुन किलबिल करु लागले की वाड्यातली ही दोन मानवी पिल्लं उठलीच म्हणून समजा.
हळूहळू काळ बदलत गेला, वाड्यातील पिल्लं आता मोठी झाली. वय वाढलं तसं शिक्षणाचं महत्त्व यांना चांगलंच ठाऊक झालं. आजी दिवंगत झाल्यानंतर या मुलांच्या मनात शहरी वाऱ्याने संचार केला. काव्या तर तिच्या उर्वरित शिक्षणासाठी रोज शहरातून वाड्याकडे अशा चकरा मारु लागली. हा आता आजी हयात नाही म्हणून हे शक्य होतं. नाहीतर यंदा काव्या दोन मुलांना खेळवत असती. असो! पारंपारिक पद्धतीने ग्रासलेल्या भूतकाळाचे स्मरण कशाला? काव्याची शिक्षणाची ओढ पाहून सदाशिवदेखील आपसुकच शिक्षणात रस घेऊ लागला.
आता आम्ही नोकरीसाठी अमेरिकेत असतो. दादाचं लग्न होऊन त्याला आर्यन नावाचा लहान मुलगा आहे. आता तो यंत्राशी खेळतो तेव्हा आम्हाला त्या वाड्यातील आम्ही खेळणारे खेळ आठवतात. छान होतं ते बालपण जेव्हा पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येत. इथे तर जाग यावी यासाठी गजर लावावा लागतो. क्वचित एखादे शोपिसचे झाड दिसले तर पाहून आता समाधान मानावे लागते. कदाचित आमच्या भूतकाळात आर्यनसारख्या मुलांना घेऊन गेलो तर पुन्हा परदेशी वस्तू, यंत्राचे खेळ यांचा मोह त्यांना होणार नाही असे वाटते. पण यात त्यांचा दोष नाहीच म्हणा. अत्युच्च शिक्षण, रोख पगार याचा मोह आम्हालाच आवरता आला नाही. पण राहून राहून त्या वाड्याची आठवण येतेच. शिवाय बालपणी व्यतित केलेले ते गोड क्षण आजी होती म्हणूनच रमणीय होते. नाहीतर अशा भुताटकी जागेत जिथे कित्येक ग्रहण, अमावस्या झाल्या तिथे गुण्यागोविंदाने राहणे शक्य झालेच नसते. हीच गोड आठवणींची शिदोरी आर्यनलाही सांगायची आहे. तेव्हा लवकर निरोप घेते.