उंच माझा झोका
उंच माझा झोका
ही कहाणी आहे एका सोळा वर्षाच्या मुलीची. या मुलीचं नाव चांदणी आहे. 'फक्त वय लहान आहे विचार नाही' असं ती म्हणते. या चिमुकल्या वयात तिला खूप काही करण्याची इच्छा आहे. परंतु पाचवीला पुजलेलं फाटकं नशीब आणि अल्लड वयात आलेल्या जबाबदाऱ्यांनी जणू तिच्या आयुष्याची काळरात्रचं झाली आहे. हा, आता तुम्हाला वाटतं असेल अवघ्या सोळा वर्षाच्या मुलीला कसली काळरात्र आणि कोणत्या बरं जबाबदाऱ्या असतील? पण ही एक काल्पनिक वजा सत्यकथा आहे. यातली चांदणी मात्र एका वेगळ्या विचारांनी सुरपारंब्या खेळणारी असामान्य मुलगी आहे. प्रत्येक क्षणी नवीन काहीतरी करणे आणि त्यातून वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहणे हाच काय तो तिचा छंद आहे.
चांदणी तिच्या आई वडिलांच्या बाबतीत पुर्णतः अपरिचित आहे. आपले आई वडील कसे दिसतात? काय करतात? कुठे राहतात? ते या जगात हयात तरी आहेत का? आणि असलेच तर कुठे असतील? त्यांनी मला शोधण्याचा प्रयत्न केला असेल का? कि ते विसरले असतील मला? या नानाविध प्रश्नांनी तिला पुर्णपणे घेरलयं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नाही. आणि म्हणूनच चांदणी हे तिचे नाव देखील स्वयंघोषित आहे. ती रस्त्याच्या दुतर्फाला लागून असलेल्या एका फूटपाथवर दोन वेळचं खाऊन आपलं आयुष्य जगते. आता हे दोन वेळचं जेवण फुकटं मिळावं एवढं तर चांदणीचं भाग्य नक्कीच नाही. तर मग चांदणी आपल्या पोटाची भूक कशी भागवते, ते आपण पाहूया.
चांदणी तिचा दिवस खुपचं वेगळ्या पद्धतीने जगते. ती रोज सकाळी साडे पाच वाजता उठून धावण्यासाठी(jogging) जाते. 'आरोग्य हीच खरी संपत्ती' या युक्तीपमाणे सुदृढ शरीर ही गरिबाची देखील गरज आहे; असे ती म्हणते. दोन तास व्यायाम, कसरत झाल्यानंतर चांदणी सात वाजता जवळच असलेल्या एका बंगल्यावर काम करण्यासाठी जाते. या बंगल्यातील कपूर परिवार म्हणजे जणू कुबेराचे वंशजच म्हणावे. या परिवारात चांदणी तिच्या साध्या राहणीमान आणि उच्च विचारसरणी यामुळे सहजच रुळली. पण जस प्रत्येक कहाणीमध्ये खलनायक असतो. अगदी त्याचप्रमाणे या कथेतही सौ. कपूर या खलनायिका ठरल्या. कारण या बऱ्याचवेळा चांदणी कडून तिला न पेलवणारी कामे मुद्दाम तिच्याकडुन करुन घ्यायच्या आणि त्या कामाचा योग्य तो मोबदला देखील देत नसे. तरी देखील 'पदरी पडलेले पवित्र' मानून चांदणी जे काही हाती येईल त्यात कायम संतुष्ट असे.
या परिवाराचे आधारस्तंभच श्री. कपूर हे एक प्रख्यात लेखक होतं. 'लिहिण्यासाठी जगावं आणि जगण्यासाठी लिहित रहावं' हा त्यांनी स्वतःसाठी आखलेला एक मुक्तमंत्र होय. ते सतत आपल्या विचारांना कागदावर रेखाटून ते लिखाण चांदणी समोर मुद्दाम वाचत. कधी कधी तर चांदणीलाच वाचण्यास सांगायचे. यामुळेच का होईना पण चांदणी हळूहळू जे मिळेल ते वाचून त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करु लागली. पुढे तर तिला त्यांनी लिहिलेल्या कविता, साहित्य वाचायची व ऐकायची एवढी सवय झाली होती की, ती देखील काहीतरी तुटक तुटक शब्द जोडून लिहिण्याचा प्रयत्न करु लागली. चांदणीला परिस्थितीमुळे कधी शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही. पण कपूरांचा बंगला हेच तिच्
यासाठी विद्येचं घर ठरलं. कपूरांच्या बंगल्यात येणारा वृत्तपत्र तसेच साप्ताहिक चांदणी दररोज न चुकता वाचते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला समाजात घडणाऱ्याया घडामोडींशी ती पुर्णपणे परिचित आहे. जसजशी तिची आणि शब्दांची अतूट गट्टी होऊ लागली. तसतशी तिने लिहिलेल्या साहित्यांची कपूर प्रशंसा करु लागले. चांदणी संपूर्ण दहा तास कपूरांच्या घरीच असे. हळूहळू घरातली कामे पटापट आवरुन उर्वरित वेळ ती वाचन लेखन यासाठी व्यथित करु लागली. शिवाय तिचे एक वेळचे जेवण तिला कपूरांच्या घरीच मिळत असे. दुपारी जेवण झाल्यानंतर किंवा जेवणा पुर्वी जर तिला कपूरांनी खाण्यासाठी विचारल्यास ती सरळ नकार देत. कारण त्यांचे तिच्यावर आधीच खूप उपकार होते; त्यात अजून कसली भर तिला मान्य नव्हती.
तिन्ही सांज होताच पाखरे जशी घरट्यापाशी परततात तशी चांदणी देखील तिच्या फूटपाथवरील घराकडे परतायची. पण मग रात्रीच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर होताच. त्यात जर मोबदला म्हणून मिळाणारे पैसे रात्रीच्या जेवणासाठी असेच रोज खर्च होऊ लागले तर स्वतःच्या पायावर उभं राहून नवीन काही साध्य करताच येणार नाही; असे तिला वाटायचे. म्हणून मग तिने एक वेगळाच मार्ग निवडला होता. कपूरांच्या बंगल्यामागेच एक खूप जुनं वृद्धश्रम असल्याचं तिने एकदा पाहिलं होतं. त्या वास्तूचं एकंदरीत बांधकाम पाहून तिने ते वृद्धश्रम खूप आधीपासून असल्याचा अंदाज वर्तवला होता. चांदणी रोज रात्री वृद्धश्रमात जाऊन ज्यांना कोणाचाच आधार नाही त्यांना जगण्याची एक नवी उमेद देण्यासाठी जाऊ लागली. आयुष्याला सर्वार्थाने कंटाळलेले सदगृहस्थ या वृद्धश्रमात मरणाची वाट पाहत, देहाचं लफ्तर निपचित टाकून एकाकी पडलेले असत. जेव्हा जेव्हा चांदणी हे दृश्य स्वनयनांनी बघते तेव्हा तेव्हा तिचे डोळे भरुन येत. आणि आपण खूप सुखी आहोत असा आभास तिला होत. चांदणी या वृद्धश्रमात आली की, सगळ्यांना जगण्याची एक तरुण वाट सापडत आणि चांदणी सोबत सगळे रमून जात. कधी कधी चांदणी आपल्याला मिळालेल्या मोबदल्यामधून काहीतरी भेटवस्तू आणायची. या सगळ्या आजी आजोबांचे अनुभव काही प्रमाणात कळत नसले तरी ती ते सगळं निमूटपणे ऐकत असे. त्यांच्यासोबत गप्पा, गोष्टी, गाणी याबरोबरच त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद यांमुळे चांदणीचा एकटेपणा ही काही काळ तिच्यापासून दूर निघून जात असे. तसेच तिच्या रात्रीच्या जेवणाचा प्रश्न देखील वृद्धाश्रमातच सुटतो.
परिस्थितीने जरी तिच्या पदरातून सुख काढून घेतलं तरी देखील या सर्व परिस्थितीवर मात करून आज चांदणी स्वतःच्या पायावर खंबीर पणे उभी आहे. शाळेत न गेल्याच दुःख आज चांदणीला नाही. कारण निसर्ग आणि परिस्थितीकडून धडे घेऊन आज ती एक उत्तम समाजसेविका, एक प्रख्यात लेखिका आणि नामांकित कवियत्री आहे. समाजात आपली एक वेगळी ओळख बनवून आज ही चांदणी अनेकांची प्रेरणास्थान बनली आहे. स्वतः एकटी असून देखील दुसऱ्यांना एकत्र बांधून कस ठेवता येईल याचा प्रयत्न तीने नेहमी केला. शिवाय आता चांदणीने एक अनाथ गरीब मुलाला दत्तक घेतले आहे. त्याची सगळी जबाबदारी चांदणी मोठ्या निटाने निभावते. अशा प्रकारे या अष्टपैलू चांदणीच्या जीवनाला आकार मिळत गेला.