ऋणानुबंध
ऋणानुबंध


काही वर्षांपूर्वीच निसर्गाच्या सानिध्यातून काढता पाय घेऊन काँक्रिटच्या जंगलात सुखासुखी वावरणाऱ्या दामले कुटुंबातील ही गोष्ट. ही पारंपारिक आणि अत्याधुनिक नात्याला जोडणारी अशी पारंधुनिक कहाणी आहे. दामले कुटुंबात इनमिन चार माणसं राहत असे. श्री.विश्वासराव दामले उर्फ दामले आजोबा, सौ.कुमुदिनी दामले उर्फ दामले आजी, श्री.सदाशिव उर्फ सदा आणि सौ.वैशाली अशी या दाम्पत्यांची ओळख सांगता येईल. सदा लहान असतानाच त्याचे आई वडील देवाघरी गेले. त्यामुळे लहानपणापासून आजीआजोबांनी मिळून सदाचा सांभाळ केला. सदा आणि आजीआजोबा यांच्या वयात एका पिढीची तफावत असल्याकारणाने त्यांच्यात विचारांची फार खोल दरी होती. तरी देखील आपल्या नातवाची प्रत्येक इच्छा त्यांनी पुर्ण केलीच परंतु त्याचबरोबर त्याला योग्य ते संस्कार वेळोवेळी दिले. म्हणूनच आज सदाला कोणतेही वाईट व्यसन नाही. आजीआजोबांना देखील सदा आईवडिलांप्रमाणे जपत आणि त्यांची योग्य ती काळजी घेत असे. आजीआजोबांच्या आशिर्वादाने आणि सदाच्या बुद्धिचातुर्याच्या बळावर सदा त्याच्या आॅफिसात उच्च पदावर कार्यरत होता. तिथेच सदाची वैशाली सोबत ओळख झाली. आणि हीच ओळख पुढे जाऊन विवाहाच्या रेशीमबंधनात विवाहबद्ध झाली. लग्नानंतर घर आणि आॅफिस या दोहोंची जबाबदारी वैशाली अत्यंत चोख पार पाडत होती. प्रपंच आणि परमार्थ उत्तम चालू होता. लग्नाच्या एक वर्षानंतर सुनेच्या गोडबातमीने घरात अगदी चैतन्याचे वातावरण संचारले होते.
सगळे सुखासुखी चालू असतानाच सदा आणि वैशालीच्या ऑफिसमध्ये कोण्या एका क्लायंटच्या चुकीमुळे ऑफिस खूप मोठ्या तोट्यात सापडते. घरातील जबाबदाऱ्या आणि ऑफिसची दगदग या सगळ्याचा येणाऱ्या बाळावर काही परिणाम होऊ नये म्हणून सदा वैशालीला 'ऑफिस मी सांभाळतो, तू घर सांभाळून तुझी आणि सोबतच आपल्या बाळाची काळजी घे' असा सल्ला देतो. हा सल्ला आपल्याच हितासाठी आहे हे लक्षात घेऊन वैशाली घरची जबाबदारी सांभाळण्याचा निर्णय घेते. पण यामुळे एकट्या सदावर घरखर्च, आॅफिसचं टेन्शन याचा भार येतो. तरी देखील सदा आजोबांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या अनुभवाच्या जोरावर काही प्रमाणात काहोईना ऑफिसमधील तणावजन्य परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करीत असतो. आजीआजोबा, वैशाली यासगळ्यांना सांभाळून आॅफिस मधील जबाबदारी देखील सदा त्याच्या परिने पार पाडत होता. यामध्येच आजीला एका गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. यासगळ्यात सदा आणि वैशाली यांनी भविष्यासाठी साठवलेली पुंजी जवळपास संपते.
"आजीच आजारपण, आजोबांची औषध, येणार्या बाळाची काळजी, वैशालीची गरोदरपणात होणारी ट्रिटमेंट आणि सोकॉल्ड घरखर्च" या सगळ्यात माझी अशी वैयक्तिक स्पेसच नाही. असे सदाला वाटते आणि याचा त्याला प्रचंड मानसिक त्रास होऊ लागतो. यासगळ्यातून बाहेर कसे पडता येईल याचा अंदाज बांधत असताना त्याच्या मनात एक विचार येतो. पण आजीआजोबांसमोर तेवढ्या स्पष्टपणे मांडण सदाला शक्य नव्हतं. त्यामुळे तो एक युक्ती करतो. आजीआजोबांना ऐकायला येईल अशा पद्धतीने वैशालीला आपल्याला होणार्या त्रासाबद्दल सांगू लागतो. 'शिवाय आजी आजोबांना आपण वृद्धाश्रमात पाठवलं तर त्यांचही समवयस्कांमध्ये मन रमेल. एकदा का आॅफिस पूर्ववत झालं की मग परत आजीआजोबांना घरी घेऊन येऊ. उद्याच सकाळी मी चौकशी करतो'. सदा मुद्दाम हे बोलून दाखवतोय याची कल्पना वैशालीला नसते. त्यामुळे सदाची व्यथा आणि एकंदरीत सगळं बोलणं ऐकून वैशाली रडकुंडीला येते आणि स्वतःसोबत त्यालाही धीर देण्याचा प्रयत्न करते.
सदा आणि वैशाली यांच बोलणं ऐकून आजी आजोबा देखील आतूनच घचून जातात. त्यांना फार दुःख होतं. "आता आपणं या घराचा भार झालो आहोत. आपल्या खर्चाचं ओझ सदा एकटा आणखी किती काळ झेलणार?" असे आजी, आजोबांना समजावते. त्यावर आजोबा सांगतात, "सदाने खूप काही केलय आपल्यासाठी. आता परत आश्रमाचा वेगळा खर्च त्याला होता कामा नये. आपण एक काम करुयात; आज रात्रीच आपण घरातून बाहेर पडून एका मंदिरात आश्रय घेऊ." आजी हृदयावर दगड ठेवून होकारार्थी मान हलवते. ठरल्याप्रमाणे आपलं गाठोडं बांधून आजीआजोबा सदा आणि वैशाली साखरझोपेत असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास घरातून काढता पाय घेतात.
सकाळ उजाडताच वैशालीला कळतं की, आजीआजोबा घरी नाहीत. वैशाली घाबरून सदाला उठवते आणि आजीआजोबा त्यांच्या सामानासकट घर सोडून गेलेत असे सांगते. अरे बापरे! आजोबा आणि आजींनी आपलं कालचं बोलणं ऐकलं तर नसेल ना? आश्चर्याने सदा वैशालीला प्रश्न करतो. खरं तर त्यांनी ऐकाव यासाठीच सदाने हा डाव रचलेला असतो. पण वैशाली समोर आपली प्रतिमा कायम चांगली रहावी यासाठी वैशालीने सद्यपरिस्थिती सांगितल्यावर सदा त्या प्रश्नाचे सांत्वन करतो. शिवाय मी आज आॅफिसला जाण्यापूर्वी वृद्धाश्रमात चौकशी करतो असे वैशालीला वचन देखील देतो. त्यामुळे वैशाली जरा निर्धास्त होते.
सदा आश्रमात चौकशी करण्यासाठी म्हणून घरातून तर लवकर बाहेर पडतो. परंतु वाटेतच त्याला ऑफिसमधून फोन येतो. 'आपात्कालीन मिटिंग आहे तर त्वरित ऑफिसला पोचवे'. आता वचनबद्ध असलेला सदा आणि आॅफिसची जबाबदारी सांभाळणारा सदा यामध्ये कोणाची निवड करावी या धर्मसंकटात असणार्या सदाला अचानक एक युक्ती सुचते. वैशालीला मी वृद्धाश्रमात चौकशी करण्याच वचन दिलयं आणि चौकशी तर फोन वर देखील होईल; असे स्वतःलाच सांगून स्वतःची पाठ थोपटून घेतो. ऑफिसची वाट जसजशी समीप येऊ लागली तोच त्याने एक एक करून शहरातील जवळपास सर्वच वृद्धश्रमात चौकशी केली. परंतु सगळ्यांकडूनच नकारार्थी उत्तर मिळाल्यावर मात्र सदा जरा घाबरलाच. आजीआजोबा कोणत्याच वृद्धश्रमात नाहीत तर कुठे गेले असतील? ते पण अस न सांगता? आजपर्यंत असे कधीच झाले नाही. एवढ्यातच सदाला वैशालीचा काॅल येतो. सदा घडलेली सर्व हकीकत वैशालीला सांगतो. वैशाली देखील हे ऐकून फार दुःखी होते. आपण घरी आल्यावर बोलू; आजी आजोबा त्यांच्या खोलीत नक्कीच एखादी चिठ्ठी सोडून गेले असतील असे सांगून सदा वैशालीला आधार देतो.
सदा मिटिंग सोडून त्वरित घरी येतो. वैशाली देखील सदा येईपर्यंत कुठे काही चिठ्ठी दडून ठेवली का हे शोधते. सदा काही न बोलता सरळ आजीआजोबांच्या खोलीत जातो. हळूहळू पुर्ण खोली आवरून झाल्यावर त्याला कपाटावर एका कोपऱ्यात एक खूप जुना फार जळमटं लागलेला पिटारा सापडतो. पिटारा खाली काढून साफ करतो आणि एका बाजूला घेऊन बसतो. पिटार्यात आजोबाआजी आणि मध्ये एक तिसराच इसम असलेला फोटो व एक पत्र असतं. फोटोमधील तो तिसरा इसम आजोबाआजी पेक्षा वेगळा पण लगबग आपल्यासारखा असल्याचे भासते. त्या पत्राच्या वर मोठ्या अक्षरात 'न फिटणारे ऋण' असं लिहिलेलं असतं.
सदा खोलीची कडी लावून घेतो आणि संपूर्ण पत्र वाचून काढतो. पत्र वाचून सदा हुंदके देऊन स्वतःशीच पुटपुटतो, ज्यांना आजवर मी कधीच पाहिलं नाही त्या माझ्या बाबांनी आजोबांना भेट स्वरूपात दिलेलं हे पत्र आहे. आपल्याला सापडलेल्या छायाचित्रामधील तो तिसरा इसम अन्य कोणी नसून माझे सख्खे बाबा आहे. पण माझे बाबा मात्र आजीआजोबांचे सख्खे चिरंजीव नाही. बाबांना तर आजी एका मुसळधार पावसात नाल्यात पडलेल्या अवस्थेतून उचलून घरी घेऊन आली होती. तेव्हापासून बाबांचा सांभाळ आजीआजोबा करताय. सदाला फार अपराधी असल्यासारखं वाटू लागलं. आजीआजोबांनी जर ठरवलं असतं तर आईबाबा गेल्यावर मला आश्रमात ठेवलं असतं. पण असं झालं नाही मला त्यादोघांनीही प्रचंड जीव लावला. माझ्यावर योग्य ते संस्कार वेळोवेळी देऊन माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. नाहीतर मी... मी खूप चुकीचं वागलोय..हे स्वतःला सांगतानाही सदा ओक्साबोक्शी रडायला लागतो. मला निःस्वार्थ सांभाळून ज्यांनी मला माझ्या बाबांनंतर देखील या घरात आश्रय दिला त्यांनाच मी ओझ समजून आश्रमात पाठवायला निघालो होतो. आता आजीआजोबा कुठे असतील? ते माझी चूक पदरात घेतील का?
हे सगळे अनुत्तरीत प्रश्न आणि डोळ्यात साचलेलं पाणी घेऊन सदा खोलीतून बाहेर येतो आणि वैशालीला सगळी हकीकत सांगून आपल्या चुकीची कबुली देतो. वैशाली सदाला आधार देत सांगते, 'जेवढी चूक तुझी आहे तेवढीच चूक माझीदेखील आहे. त्यामुळे आता आपण दोघेही आजीआजोबांना शोधून घरी घेऊन येऊ.' सदा वैशालीला होकारार्थी मान हलवून मनातच म्हणतो; इतक्या वर्षात कधीच आईबाबांची कमी जाणवली नाही. खरचं आजीआजोबांचे ऋण न फिटण्यासारखे आहेत.