अनोळखी जागा
अनोळखी जागा
रिक्षा सुसाट वेगाने पळत होती. मधेच एका गतिरोधकाला धडकून थोडी उडाली. एकटीने प्रवास करत असलेल्या तिचं डोकं आपटलं. त्यासरशी तिची डुलकी उडाली आणि आजूबाजूचा अनोळखी परिसर बघून ती चांगलीच चपापली. तशी ती मुद्दाम झोपली नव्हती पण आज कामच एवढं होतं ऑफिसमधे. ती इतकी दमली होती की अजिबात त्राण उरलं नव्हतं. नवरा कॉन्फरन्ससाठी परदेशी, भाऊ परीक्षेसाठी दुसर्या शहरात आणि वडील आता खूप वयस्कर झाले होते. त्यामुळे हल्ली ती एकटीनेच प्रवास करायची.
तिला जाणवलं की परिस्थिती शांतपणे आणि चलाखीने हाताळावी लागणार होती. मुख्य म्हणजे आपण अनोळखी जागी आहोत हे भान ठेवावं लागणार होतं.
तिने बघितलं मोबाईलची बॅटरी १% उरली होती. कुणाला फोन करण्याची किंवा स्वतःचे लोकेशन बघण्याची सोय नव्हती. त्या किर्र अंधारात रिक्षावाल्याचा चेहराही दिसत नव्हता. रिक्षात साईड मिररही नव्हते त्यामुळे मागच्या रस्त्याचा मागोवाही घेता येत नव्हता. कराटे शिकायचे नुसतेच इमले बांधून तिने कधी त्याचं शिक्षण घेतलंच नव्हतं. तिने २ मिनिटं स्वतःलाच मनात दोन शिव्या दिल्या. आणि देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली.
आता रिक्षा अजूनच भरधाव जात होती आणि हेलकावत होती. रिक्षावाल्याला विचारायचीही सोय नव्हती. कारण त्याच्या मनसुब्यांचा काही अंदाजच येत नव्हता. तिने आज ऑफिसामधे फॉर्मल कपडे घातल्याने ओढणी किंवा स्कार्फही सोबत नव्हता. तसं कपड्यांनी काही फरक पडत नाही पण म्हणतात ना भित्यापाठी ब्रह्मराक्षस. ती अजूनच अवघडून बसली. आपण संकटात सापडलोय याची तिला जाणीव झाली. आणि नमस्कार करायला तिने वर बघून एक क्षण डोळे मिटले.
तेवढ्यात रिक्षा उजवीकडे वळली आणि ती डोळे उघडून बघते तर काय घराजवळचा शांतादुर्गा स्टोअरचा फलक. तिचा जीव एका मोठ्या घमेल्यातच पडला. घरही आलंच त्यासरशी ती उतरली आणि पैसे द्यायला गेली. रस्त्यावरच्या दिव्यांमुळे रिक्षावाल्याचा चिंतातूर चेहराही दिसला तसं न राहवून तिने त्याला कारण विचारलं. त्याने मुलगा खूप आजारी असल्याचं सांगितलं. त्यामुळेच या शॉर्टकटने आणलं असं कबूल करू त्याने तिची माफीही मागितली. त्याच्या डोळ्यातला अश्रू तिच्या नजरेतून सुटला नाही. तिने अधिक पैसे देऊ केले तसे त्याने हात जोडून नाकारले आणि म्हणाला, "फक्त आशिर्वाद द्या ताई पोराला."
तिला एक क्षण स्वतःचीच लाज वाटली. पण तोपर्यंत तो निघूनही गेला होता. त्या दिवसापासून तिने अनोळखी जागांना घाबरण्यापेक्षा सगळ्यांना एकाच चष्म्यातून बघण्याची सवय सोडली आणि स्वसंरक्षणाचे धडे घेतले.
