अज्ञात बेटावर ३
अज्ञात बेटावर ३
प्रकरण ३
मग शेवटी दोन होड्यांमधून ते निघाले. एकामध्ये तुषार आणि दुसऱ्यात राजेंद्र होता. राजेंद्रची होडी पुढे गेली होती. कारण तो सर्वाना दिशा दाखवणार होता. आधी बेटाला पूर्ण वळसा घालायचा परिस्थितीचा अंदाज घ्यायचा आणि मग बेटावर पाय ठेवायचा असे ठरले. ते निघाले होते. प्रवास सुरु करून तीन तास झाले तरी बेट नजरेच्या टप्प्यात येत नव्हते . तसा तुषार अस्वस्थ झाला. बेटावर मोबाईलला रेंज नसणार म्हणून त्याने आणि राजेंद्रने वॉकी टॉकी सोबत घेतले होते. तो राजेंद्रला कॉल करणार इतक्यात पुढच्या होडीत असलेल्या राजेंद्रने दूरवर इशारा करून दाखवले. खूप दूरवर एक अंधुक बेट दिसत होते. ते अर्धे धुक्यात लपेटल्यासारखे वाटत होते. बेट हळू हळू नजरेच्या टप्प्यात येऊ लागले. तसा त्याचा मोठा आकार नजरेत भरू लागला. ते कासवाच्या पाठीप्रमाणे गोल होते. त्यावरील जंगलामुळे ते हिरवेगार दिसत होते. ती नक्की निसर्गरम्य जागा असणार याची तुषारला खात्री झाली. इतक्यात राकेश म्हणाला," चला बाकी काही नाही झालं तरी एक मस्त पिकनिक तर होईल." हे ऐकणारे प्रोफेसर गुप्तां हसले आणि म्हणाले," नक्कीच इथे काहीतरी सापडेल. मला पूर्ण खात्री आहे. या वरच्या सौंदर्यावर जाऊ नका. इथे नक्कीच काहीतरी धोकादायक असणार. जे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत जाऊ देणार नाही." राकेश तुषारला डोळा मारून म्हणाला," मला तर या प्रोफेसरचाच डाउट येतोय. तोच तर आपल्याला बेटावर नेऊन मारणार नाही ना!" आणि हसला. तुषारसुद्धा हसला. तरीही त्याला राकेशच्या बोलण्यात तथ्य वाटत होते. हे प्रोफेसर इतक्या लांबवरून येऊन फक्त या बेटाचा शोध घ्यायला नक्कीच येणार नाहीत. त्यावर जे काही आहे त्याची याना माहिती आणि खात्री असणारच. हा माणूस नक्कीच लबाड वाटतोय. प्रोफेसर वर नीट लक्ष ठेवायचा त्याने निश्चय केला.
आता ते बेटाला वळसा घालत होते. बेट खरंच सुंदर होते आणि गोल गरगरीतही होते. जसे मुद्दाम तासून बनवले असावे. इतक्यात रितूच्या आवाजाने राजेंद्र भानावर आला," अय्या ते बघा काय !" ती म्हणाली. ती दाखवत असलेल्या दिशेने सगळे बघू लागले. पण कोणालाच काहीच दिसले नाही. सगळे रितुकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागले. ती म्हणाली " अरे ! हे काय कोणालाच कसे दिसले नाही ! मी आताच एक सोनेरी हरीण पहिले. सोनेरी म्हणजे अगदी सोन्यासारखे. चमकत असलेले." वीर म्हणाला," अगं हे कसं शक्य आहे ? असं कधी असतं का ? तुला भास झाला असेल." रितू चडून म्हणाली नाही रे ! शप्पत मी खरंच पाहिलं." त्यांची बेटाभोवतीची फेरी पूर्ण झाली होती. कोणताही धोका दिसत नसल्याने आता उतरायला काहीच हरकत नाही असे ठरले. "उतरल्यावर तुझं सोन्याचं हरीण शोधू बरं ! " राकेश रितूला चिडवत म्हणाला. रितू त्याच्याकडे रागाने बघत बोटीतून उतरली.
क्रमशः
