Pratibha Tarabadkar

Comedy

3  

Pratibha Tarabadkar

Comedy

अध्यात्मिक वारी

अध्यात्मिक वारी

5 mins
182


    उघडाबंब, बर्म्युडा घातलेला वैभव उर्फ विब्ज सोफ्यावर लोळत कुठलीतरी मारधाडीची वेबसीरिज बघत होता.टी.व्ही.वर एकाग्रतेने नजर लावून बसलेल्या वैभवच्या पोटाच्या डोंगरावर ठेवलेला रिमोट त्याच्या श्वासागणिक वरखाली होत होता.

  'विब्ज, मी एक साईट बघितली आहे.एकदम हटके डेस्टिनेशन!'ज्योतिका उर्फ ज्यो चे डोळे आनंदाने चमकत होते.वैभवने सोफ्यावर नुसती चाळवाचाळव केली.एकदा ज्यो कडे तर एकदा टी.व्ही.कडे बघतंच खुणेनेच त्याने काय म्हणून विचारले.ज्यो ने चिडून टी.व्ही.बंद केला.

   'विब्ज,आपण पुढच्या वीकेंडला बोरपठार ला जाऊया!'

 'बोरपठार?'विब्जने आश्चर्याने विचारले.'कासपठार ऐकलं आहे पण बोरपठार?'

  'अरे तीच तर मजा आहे.आपल्या इथून १५० किलोमीटर अंतरावर बोरपठार गाव आहे आणि तिथल्या बोराच्या झाडाची बोरं शबरीने प्रभू श्रीरामाला खायला दिली होती असे श्री निजलिंगप्पा सिंग या विद्वानाने सिद्ध केले आहे.'ज्यो ने व्हॉट्स अप वरचा मेसेज वाचून दाखविला.

विब्जसुद्धा आता उत्तेजित झाला.खरंच ऑफबीट डेस्टिनेशन होते हे! शिवाय नुकतीच नवीन कार घेतली होती.तिच्यातून लॉंग ड्राईव्हला जाता येईल, फोटो काढून फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकता येतील,सगळेजण असे जळतील ना!जळा लेको...वैभवचा चेहरा आनंदाने उजळला.

  शनिवारी सकाळी सहा वाजताच विब्ज आणि ज्योने आपले देह टी.शर्ट आणि जीन्स मध्ये कोंबले.आपल्या नव्या कोऱ्या गाडीसमोर दोन बोटांनी व्ही करत, तोंड वाकडे करुन जीभ बाहेर काढून तर एक डोळा बंद करून सेल्फी काढले.फोटोच्या प्रत्येक फ्रेम मध्ये गाडी येईल याची दक्षता घेत फटाफट ते फोटो साऱ्या 'फ्रेंडसर्कलला'पाठवून दिले.'हेडिंग टू बोरपठार फॉर स्पिरिच्युअल एक्सपिरिअन्स'असे कॅप्शन टाकायला ते विसरले नाहीत.

 कार हायवेला लागली तेव्हा फटफटू लागले होते.रस्त्यावर तुरळक वहानं दिसत होती.वैभवने गाडीचा वेग वाढवला.दोघेही लेज आणि कुरकुरे चे बकाणे भरत प्रवासाचा आनंद लुटू लागले.टोलनाक्याशी आले नाहीत तोच ज्यो चा फोन वाजला.तिची कलीग वैष्णवी बोलत होती.'वॉव ज्यो, कसलं हटके डेस्टिनेशन शोधलंय ग तुम्ही बोरपठार,वॉव ,नावातच काय जादू आहे!ए तुम्ही परत आलात की सगळी इन्फॉर्मेशन शेअर करा हं''वैष्णवी उत्तेजीत झाली होती.'शुअर'म्हणत ज्यो ने फोन बंद केला.तेव्हढ्यात विब्जचा फोन वाजला या ऑफबीट डेस्टिनेशन ची चौकशी करणारा.आणि मग जुगलबंदी सारखे दोघांचेही फोन आळीपाळीने वाजतच राहिले.दोघांनाही कृतकृत्य वाटत राहिलं.'याचसाठी केला होता अट्टाहास '

   रस्त्याच्या उजव्या बाजूला एक फाटा जात होता.त्याच्या तोंडाशी एक भलेमोठे कट आऊट लावले होते शबरी रामाला बोरं देत आहे असा.ती शबरी आणि श्रीरामाला कुठेतरी पाहिलंय असं ज्यो ला राहून राहून वाटत होतं.'मैं तेरी गुलाम बनकर रहूंगी'सिरीयलमधली सासू आणि हिरो प्रेमप्रीत तर नव्हेत?

   तेव्हढ्यात एक मोठा धक्का बसला आणि गाडी उसळली.रस्त्यात एक भलामोठा खड्डा होता.आणि मग त्यांची नवीकोरी कार त्या कच्च्या रस्त्यावरुन उसळणाऱ्या चेंडू सारखी टप्पे घेत घेत पुढे जात राहिली.अशा परिस्थितीत आजूबाजूच्या रुक्ष,वैराण जमिनीकडे त्यांचं लक्ष जाणंही शक्य नव्हतं.अर्धा तास असं ठेचकाळत प्रवास केल्यावर एक भलीमोठी कमान लागली.त्यावर 'बोरपठारात सर्व रामभक्तांचे स्वागत आहे 'असे मोठ्या अक्षरात लिहीले होते.वैभव आणि ज्यो ने सुटकेचा निश्वास टाकला आणि ते गाडीतून खाली उतरले.तेव्हढ्यात कुठूनसा एक पांढरा पायजमा,शर्ट टोपी घातलेला तरुण अवतीर्ण झाला.'गाडी पार्किंग आणि प्रवेशफी मिळून हजार रुपये 'निर्विकारपणे, खणखणीत आवाजात त्याने सांगितले.दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहिले.गाड्या अगदी तुरळकच होत्या.

'एव्हढ्या भक्तीभावाने आलोय,पैशाकडे कुठे पहायचे! पैसा म्हणजे फक्त मोह 'असे कुठे तरी ऐकलेली वाक्य आठवत वैभवने मुकाटपणे पैसे दिले

 'काय? नुसत्या प्रवेश आणि पार्किंगचे एव्हढे पैसे?काय लुटालूट आहे ही?'असा आरडाओरडा ऐकू आला.विब्ज आणि ज्यो‌ने मागे वळून पाहिले.

USA return लिहीलेला काळा टीशर्ट, बर्म्युडा, बूट, डोक्यावर हॅट आणि गॉगल लावलेले अंकल तावातावाने बोलत होते.शेजारी ढगळ पंजाबी ड्रेस घातलेल्या आंटी उभ्या होत्या.'ही म्हतारी खोडं लै तरास द्येत्यात.यांच्या कष्टाचं पैकं हायीत म्हनं मंग आमी काय फुकाटचं पैकं....

'लबाड लांडगं ढ्वांग करतंय 'श्री तीर्थक्षेत्र बोरपठार वर गाणं ओरडायला लागलं.

ठेचकाळलेल्या अंगानं विब्ज आणि ज्योने कमानीतून आत प्रवेश केला.आत दोन चार स्टॉल्स लावले होते.एकावर पुस्तकं होती... श्री क्षेत्र बोरपठार महात्म्य, श्री राम आणि शबरी भेट महाकाव्य इ.

दुसऱ्या स्टॉल वर बोरापासून केलेले विविध प्रकारचे पदार्थ होते.बोराचं सरबत, जॅम, लोणचं इ.तर तिसऱ्या स्टॉल वर शबरी आणि प्रभू श्रीरामाची भेट,ती त्यांना बोरं देतेय,ते ती उष्टी बोरं खाताहेत इ.प्रसंग दाखवणारी पोस्टर्स होती.विब्ज आणि ज्यो ने सगळ्यांचे फटाफट फोटो काढले.आणि आजूबाजूला नजर टाकली.परत तेच कट आऊट होते.आता गाणं बदलून 'पप्पी दे पप्पी दे पारुला'हे भजन सुरू झालं होतं.त्याचा ठेका धरत भक्तजन झुलत होते.

समोर कुंपण घातलेली विस्तीर्ण जागा होती.त्या कुंपणाच्या आत छोटी छोटी झुडपं होती आणि मध्यभागी एक बऱ्यापैकी मोठे झाड होते.त्या झाडावर दिवे लुकलुकत होते.एक कार्यकर्ता एका छोट्या घोळक्याला सांगत होता,'हेच ते झाड, ज्याची बोरं शबरीने प्रभू श्रीरामाला खायला दिली.'त्या गर्दीने 'प्रभू श्री रामचंद्र की जय'असा जयघोष करीत हात जोडून नमस्कार केला.

'कशावरुन याच झाडाची बोरं शबरीने प्रभू श्रीरामाला खाउ घातली?'अंकलचा प्रश्न ऐकून चेहऱ्यावरील रेषही न हलवता कार्यकर्त्याने एका कट आऊट कडे बोट केले.'इतिहासाचे गाढे विद्वान निजलिंगप्पा सिंग यांनी ते सिद्ध केले आहे.'

'पण प्रभू श्रीराम हे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून ते एक....

'झिंग झिंग झिंगाट 'गाणं सुरू झालं आणि अंकलचे पुढचे शब्द त्यात विरुन गेले.विब्ज आणि ज्योला त्या डिबेटमध्ये रस नव्हता.सेल्फीसाठी योग्य जागेच्या शोधात ते फिरत होते.तसा एक सेल्फी गाडीसमोर, एक कमानी समोर घेऊन झाला होता.बोराचं मेन ट्री फारच लांब होतं आणि त्याच्याजवळ जाण्याची परमिशन नव्हती.ते दोघे या विचाराने त्रस्त असतांनाच तो मघाचा कार्यकर्ता आला,'साहेब, इथेच जेवणार ना महाप्रसादाचं?'दोघांच्या पोटात कावळे कोकलत होतेच.त्यांनी ताबडतोब होकार दिला.'साहेब, दोघांच्या जेवणाचे दोन हजार रुपये पे करा.'कार्यकर्त्याने स्कॅनिंग साठी ठिपक्यांचा त्रिकोण समोर धरला.

'काय?हजार रुपये ताट?काय सोनं वाढणार आहात का ताटात?'आंटीचा आवाज चिरकला.बाकीच्या मंडळींनी महाप्रसादाची किंमत ऐकून केव्हाच पोबारा केला होता.जेवायला फक्त विब्ज,ज्यो,अंकल आणि आंटीच उरले होते.ताटात कंदमुळांची पातळ भाजी, भाकरी,कण्यांचा भात आणि चिमूटभर कसलीतरी पूड होती.

कार्यकर्त्यांचा म्होरक्या पुढे आला,म्हणाला,'भक्तजणहो,प्रभू रामचंद्र वनवासात कंदमुळं खात होते म्हणून मुद्दाम त्यांची भाजी केली आहे आणि ती पूड आहे ती साधीसुधी नाही बरं,ती शबरीच्या बोरांची पूड आहे.'त्याचे ते बोल ऐकून विब्ज आणि ज्योने ती पूड भक्तीभावाने कपाळाला लावली आणि मग तिचे सेवन केले.

'काय हो, प्रभू रामचंद्रांच्या काळातील बोरीचं झाड अजून जिवंत....

'शिट्टी वाजली गाडी सुटली बाई जरा जपून.... त्या तीर्थक्षेत्रातील पुढील भजन सुरू झाले.

उन्हाने अन् उकाड्याने विब्ज आणि ज्यो त्रासले होते शिवाय फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर टाकायला भरपूर फोटो आणि मालमसाला मिळाला होता त्यामुळे त्यांना तिथे थांबण्यात काही रस उरला नव्हता.दोघेही गाडी घेण्यासाठी कमानी कडे आले.

'तुम्ही श्री क्षेत्र बोरपठारला येऊन पावन झालात.'कार्यकर्ता हात जोडून म्हणाला.'या पवित्र क्षेत्राची माहिती तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांना द्यावी.'म्हणत त्याने क्षेत्राची महती सांगणारं पत्रक त्यांच्या हाती ठेवलं.ज्यो ने मोठ्या भक्तिभावानं ते कपाळाला लावून अंगठा उंचावत कार्यकर्त्याला खूण केली.

अंकल आणि आंटीनं फाडून फेकलेल्या ‌पत्रकाचे कपटे वाऱ्याने इतस्ततः उडत होते.

विब्जने गाडीत शिरल्या शिरल्या एसी ऑन केला आणि दोघांच्या जीवात जीव आला.

 ' Visited Shri kshetra Borpathar.Feeling very elated.Charged with Spirituality 'असे कॅप्शन टाकत ज्यो ने सारे फोटो upload केले.

आणि बघता बघता त्यावर लाइक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव झाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy