Pratibha Tarabadkar

Drama Crime

4.5  

Pratibha Tarabadkar

Drama Crime

अडगळ - भाग १

अडगळ - भाग १

3 mins
305


 

रुपा टी.व्ही.समोर बसली.काल तिची आवडती मालिका 'मी सून लाडकी सासूची'सुरु झाली आणि नेमकी वीज गेली.मागच्या एपिसोडमध्ये सासूने सुनेचे छत्री सारखे मोठे झुमके लपवून ठेवले, तिने केलेल्या भाजीत बचकाभर मीठ टाकले .आता सूनबाई सासू वर कशी कुरघोडी करते हे बघण्याची रुपाला उत्सुकता लागून राहिली होती.मालिका सुरू झाली.घरामध्ये बनारसी शालू,अंगभर सोन्याचे दागिने ल्यालेली सासू आणि कांजीवरम साडी आणि हिऱ्याचा सेट घातलेली सून अशा दोघी समोरासमोर आल्या आणि.... फडफडफड आवाज करीत एक कबूतर रुपाच्या डोक्यावरुन उडत गेले.एकाग्रतेने मालिका बघणारी रुपा इतकी दचकली की खुर्चीतून पडता पडता वाचली.

 

'ताई, या कबुतरांचा काहीतरी बंदोबस्त करा आता,'फरशी पुसणारी सगुणा वैतागून म्हणाली.'हे बघा,आत्ताच पुसलेल्या फरशीवर या कबुतराने शिटून ठेवलं.' 

'अगं हो,या माळ्यावर बघितलंस किती अडगळ साठली आहे ती!त्यामुळेच कबुतरांचं चांगलं फावलंय.सारखी माळ्यावरच्या अडगळीत येतात गुटुर्रगुम करायला.कुणालला,त्याच्या बाबांना किती वेळा सांगितलं माळ्यावरची अडगळ काढू म्हणून पण कोणी लक्षच देत नाही.सगुणा तूच ये माझ्या मदतीला.आपण दोघी मिळून माळा साफ करु.तुला पाचशे रुपये देते माळा आवरण्याचे.'


सगुणाच्या तोंडाला पाणी सुटले.दोन तासांसाठी पाचशे रुपये मिळणार असतील तर का सोडा?'ताई, उद्या जरा लवकर येईन माळा आवरायला म्हणून सगुणा निघून गेली. सगुणा स्टुलावरुन माळ्यावर चढली.इतकी अडगळ होती माळ्यावर की अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नव्हती.कबुतरांच्या विष्ठेचा उग्र दर्प सुटला होता.सगुणाने चेहऱ्याच्या संरक्षणासाठी फक्त डोळे उघडे रहातील असे फडके बांधले होते.एक एक वस्तू सगुणा खाली उभ्या असलेल्या रुपाच्या हातात देऊ लागली.


काय नव्हतं त्या माळ्यावर?कपड्यांची बोचकी, जुन्या ट्रंका,सुतळीचे गुंडे, वायरींची भेंडोळी,पत्र्याचे डबे,पाळणा,पुस्तकांचे गठ्ठे आणि काय न् काय! उतरवून घेताना रुपाची बडबड चालू होती,'बघितलंस, किती अडगळ घरात भरुन ठेवली आहे ती? वर्षानुवर्ष कुठली वस्तू वापरली नाही तरी टाकायची नाही.असू दे.लागेल कधीतरी म्हणून माळ्यावर टाकायची.उकीरडा करुन ठेवलाय तो माळा म्हणजे!'

 

सगुणाला हसू आलं.'काय वो ताई,कुणालबाबा आता बारावी शिकतोय मग पाळणा कशाला ठिवलाय माळ्यावर?'

 'विचार तुझ्या दादांनाच,'रुपा फणकाऱ्याने म्हणाली.'सगुणा, ह्या सगळ्या सामानाचा तूच निपटारा कर.हवं ते सामान घरी ने, विकून टाक... काही कर.आणि विकलेल्या सामानाचे पैसे पण तूच घे.माझी या अडगळीपासून सुटका कर.'सगुणाने माळा स्वच्छ झाडला.घरभर धुळीचा खकाणा उडाला.सगुणा माळ्यावरून उतरली.तिने घरी नेण्यासाठी आणि विकण्यासाठीच्या वस्तू वेगवेगळ्या काढल्या.नेमकी तेव्हाच 'भंगारवाला'अशी आरोळी ऐकू आली.सगुणाने त्याला थांबावयास सांगितले आणि लगबगीनं ती ट्रंका,डबे, जुन्या पुस्तकांची रद्दी घेऊन भंगारवाल्याकडे गेली.त्याच्याशी हुज्जत घालून मिळालेले पैसे कनवटीला लावून पुढच्या घरी कामासाठी वळली. फुलचंद भंगारवाला घामाघूम होत आपली हातगाडी ओढत पुढच्या गल्लीत वळला आणि त्याने आरोळी ठोकली'भंगारवाला'


संध्याकाळ होत आली.फुलचंदची हातगाडी भंगाराने बऱ्यापैकी भरली होती.दमलेल्या फुलचंदने आपला मोर्चा 'जैस्वाल ओल्ड पेपरमार्ट'कडे वळवला.चारी बाजूंनी पत्रे ठोकलेल्या त्या वखारीला जाण्यायेण्यासाठी एक दरवाजा होता.एका कोपऱ्यात काचेच्या बाटल्यांचा ढीग, दुसऱ्या बाजूला रद्दी पेपर्सचा डोंगर, तिसऱ्या कोपऱ्यात पत्र्याचे भंगार तर चौथ्या बाजूला प्लॅस्टिकच्या पिशव्यांची चळत.त्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये दुधाच्या पिशव्या सुद्धा सामील असल्याने वखारीत कुबट दर्प सुटला होता.त्याशेजारीच दाटीवाटीने बसवलेल्या टेबल खुर्ची भोवती कचरा वेचणाऱ्या स्त्रिया जैस्वाल शेटशी हुज्जत घालत होत्या.फुलचंद ते दृश्य बघून कंटाळला.आधीच तो दमला होता त्यातून या बायकांचा किचकिचाट!त्याने जैस्वाल शेटच्या नोकराला बोलावून हातगाडीवर असलेल्या भंगाराचा हिशेब करण्यास सांगितले.तेव्हढ्यात त्याला आठवले की घरवालीने,फुलवतीने एक पत्र्याचा डबा आणावयास सांगितले होते.मग त्याने एक डबा घरी नेण्यासाठी ठेवून बाकी सामानाचा हिशेब करून पैसे घेतले आणि हातगाडी ढकलत तो घराच्या दिशेने चालू लागला.

 

अरुंद, वेड्यावाकड्या गल्लीबोळातून हातगाडी ढकलत फुलचंद आपल्या घराजवळ आला तेव्हा त्याची दोन्ही मुलं घराबाहेर खेळत होती.त्याला बघून 'बापू,मेरा चाकलेट'करत त्याच्या भोवती नाचू लागली.फुलचंदने 'बदमाश कहीं के'म्हणत खिशातून दोन चॉकलेटं काढून त्यांच्या हातात ठेवली आणि साखळीने त्याने हातगाडी बांधली.दूरवर सार्वजनिक नळावर चाललेला बायकांचा कल्ला ऐकू येत होता.फुलवतीपण तिकडेच गेली होती.फुलचंद घराचे दार उघडून आत गेला.तेवढ्यात त्याला आठवले,आपण आणलेला पत्र्याचा डबा हातगाडीवरच राहिला.मग परत तो बाहेर येऊन डबा उचलून घरात जाऊ लागला.त्याला तो डबा हाताला खूपच जड लागला.त्याला आश्चर्य वाटले.आत जाऊन त्याने डबा उघडला आणि त्याने तोंडाचा आ वासला. डोळे विस्फारून तो त्या डब्यात बघतच राहिला.

काय होते त्या डब्यात?

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama