Surarna Sayepure

Comedy Children

2.3  

Surarna Sayepure

Comedy Children

अभ्यासातला गोंधळ

अभ्यासातला गोंधळ

4 mins
15.7K


(माझी डायरी-भाग:4)

अभ्यास म्हणजे पर्याय नसणारा प्रश्न! प्रत्येकाच्या वाट्याला आवर्जुन येतो.

प्रत्येक विषयाला कितीही समान वागणूक द्यायची म्हंटले तरी प्रगती पुस्तकाच्या चढत्या-उतरत्या क्रमामुळे प्रत्येक विषयातली रुची आणि तिरस्कार जगजाहीर झाल्याशिवाय राहत नाही. 

माझी रुची आणि अरुचीही अशीच काहीशी होती.....

इतिहास म्हंटले की 'इऽऽइऽऽ' अस म्हणण्या पलिकडे माझ्याकडे सांगण्यासारखं दुसरे काहीच नाही.

मला फक्त इतकेच माहित आहे कि, आपला इतिहास ध्रुवाधरून सुरु होतो आणि गांधीजींवर येऊन संपतो. (यानंतरही बरेच काही घडले पण तो इतिहास माझ्या पाठ्यपुस्तकात नव्हता.) यापलिकडे मी इतिहासाचे पुस्तक कधीही वाचले नाही.

यामध्ये मला फक्त दोनच गोष्टी कळाल्या त्या म्हणजे ध्रुव आकाशात असतो आणि गांधीजी नोटांवर!!

गृहपाठाचा आणि माझा दुर - दूरवर पण संबंध नव्हता पण शाळेत जावे लागायचे त्यामुळे पाठ्यपुस्तकाशी मात्र संबंध यायचा!

इतिहास आठवायचा म्हणजे अगदी कठीण शब्द म्हणून पाठ केलेला 'मोहंजोदडो' मात्र हमखास आठवतो! गोवारीकरांचा नाही.

त्यातल्या त्यात 'बोस्टन टी पार्टी' तर आठवतेच!

कारण त्यामुळेच मला नवीन पार्टीची कन्सेप्ट कळली होती!

कधीकधी इतिहासाची माझी उत्तरे लाल किल्ल्यावर सुरू होऊन लाल महालवर येऊन संपायची

बीजगणितातल्या बीजाचे तर वटवृक्षच झाले हाते!

त्यातल्या घातांकाने माझा घातच केला आणि म्हणून मूळ शोधण्याच मी कधी प्रयत्नच केला नाही. सरकारने १० पैसे, २५ पैसे, ५० पैस्यांवर बंदी आणली. तेव्हाच खरेतर पुर्णांकाची गणितांवरही बंदी आणायला हवी होती. असो, सरकारने जर आज तसे केले तर विद्यार्थ्यांना कोवळ्या वयात २००० ची गणितं सोडवावी लागतील.

बर गणिताच्या धड्याखाली सोडावायला दिलेल्या गणितांना आपण ‘उदाहरण’ का म्हणतो. हा ही एक प्रश्न आहे.

भुमिती आणि माझं नात काय हे तर विचारुच नका!

मी तर नेहमीच म्हणायची पायथागोरसच कूळ आणि बीजगणिताचं मूळ कधीही कोणी विचारु नये.

परिक्षेसाठी 30-60-90 किंवा 45-45-90 कितीही पाठ करून गेलात तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ३६-२४-३६ हाच फार्म्यूला कुठे फिट बसतोय का हे पाहत असतो.असो!

गोष्टी असायच्या म्हणून मला मराठी हा विषय फार आवडायचा!

आजही त्या दमडी, पाखर्या आणि भीमाचा विषय निघाला कि जीव हळहळतो.

'डुळकैल्या बाळाचा दृष्टांत' या धड्यात आपल्या बाळाविषयी आईने दाखविलेले प्रेम तर अवर्णनीय आहे.

आजही 'कान्होपात्रा', 'सागरा प्राण तळमळला' या कविता ऐकायला मिळाल्या कि प्राण तळमळतो.

आजही माझी आपुलकी प्रेम आणि जीव अडकलेला आहे त्या मराठीच्या पुस्तकात....

बर मराठीत समास ओळखा हा एक व्याकरणाचा प्रकार होता. आधी डावीकडून समास सोडतात असं सांगायचं आणि नंतर पुढे जावून समास ओळखा असं म्हणायचं. किती हे कन्फ्युजन? त्यामधला द्वंद्व समास ओळखताना तर मनात इतकं द्वंद्व माजायचं की, आपण नेमक्या कोणत्या तासाला आपण झोपलो असणार हे अचानक आठवायला लागतं.

मला तसा कोणताही ‘छंद’ नसल्याने मी तशी ‘छंदांच्या’ प्रकारापासून मुक्त असायची. शाळेत तशी ‘अलंकार’ घालण्यास बंदी असली तरी शाळेत मात्र, अलंकार शिकवले जायचे. त्यातल्या त्यात मला अतिशययोक्ती अलंकार लक्षात राहिला आहे. त्याचा कारण म्हणजे आमच्या मराठीच्या बाई त्यांच्या सौंदऱ्यापेक्षा अति मेकअप करून यायच्या त्यामुळे… एकदा पेपरातही मी असं लिहीलं होतं. आता मी अशी कितीवेळा नापास झाले हे वेगळं सांगायला नको.

बोर्डात मात्र, रिचेकींगच्यावेळेस मला कळलं की, नेमकं त्याचं उत्तराला मला पैकीच्यापेकी मार्क्स देण्यात आले होते. बहुदा ते स्त्री मेकअप विरोधी गटातले असावेत.

पाठंतरासाठी म्हणालं तर अर्थशास्त्र आणि नागरीकशास्त्र हे विषय चांगले वाटायचे.

नागरीक नसतानाही अर्थ न कळणारे शास्त्र केवळ मोजके आणि छोटे धडे म्हणून वाचायचो! खरेतर ही पुस्तकं म्हणजे लहान मुलांवर अत्याचारच!

भुगोल शिकली पण नकाशात माझं घर शोधण्याचा प्रयत्न मात्र अपयशस्वीच राहिला. (अलिकडे गुगल मॅपवर घर शोधण्याची इच्छा भागवत आहे). पण पर्याय म्हणून ही इच्छा तेव्हा 'इग्लू' वर भागवली.

अमेझॉनच खोऱ्यापेक्षा मुंबईचा बंदराचं खोर मोठं वाटायचं. आणि मी ते ठासून शिक्षकांना सांगायची. ‘आपलं खोर मोठ आहे हे मान्य करा नाहीतर मला अमेझ़ॉनचं खोर दाखवायला न्या’ ही अट न झेपल्याने सरांनी ‘अमेझ़ॉनच खोर’ हा धडा अर्धवट ठेवून पुढचे धडे शिकवले. पुढे मी नसताना कधीतरी त्यांनी तो धडा पूर्ण केला.

भूगोलाच्या बाबतीत मी फक्त वाध गुरूजींवर विश्वास ठेवायची. शाळेत पासपोर्ट असलेले ते एकमेव शिक्षक असल्याने त्यांनी सांगितलेली सर्वच माहिती अधिकृत मानली जायची. आजही मी अमेरिकेत गेली नाही. त्यामुळे तिथले रस्ते काचेचे असतात. यावर माझा अजुनही विश्वास आहे. वाघ गुरजी म्हणजे पुर्वजन्मीचे कोलंबसचे सहकारी अशी त्यांची शाळेत ख्याती होती. अधी त्यांनी भूगोल घडवला मग तो पुढे शिकवण्यास सुरवात केली. असेही आम्हाला कळले होते. अमेरिकेचा शोध लावण्यात ‘वाघ’ गुरूजींचा ‘सिंहाचा’ वाटा होता. याचा ‘मुंबई’ व ‘गुजरात’शी काहीही सबंघ नाही.

इंग्रजांनी आपल्यावर किती अन्याय केले याची खरी जाणीव मला इंग्रजी शिकताना व्हायची. आणि तेव्हा माझे देशप्रेम जरा जास्तच उफाळून यायचे!! प्रश्नातील अवघड शब्दाच्या सेम स्पेलिंग उतार्यातून शोधून काढायच्या माझ्या सवयीचे फायदे मला नंतर सेम रंगाच्या candy शोधून काढण्यासाठी candy crush मध्ये झाली.

या न्युटनने बालपणात शोध लावले आणि आमचे बालपणच हिरावून घेतले असा माझा ठाम आरोप आहे. विज्ञानातले अणू-रेणू म्हणजे माझ्यासाठी राहू-केतूच!! यामुळेच कदाचित माझ्या प्रगती पुस्तकात फारशी प्रगती दिसली नाही. असा हा अभ्यासातला गोंधळ माझ्यासाठी आभासचं असायचा

एवढ्या सगळ्या प्रक्रियेत आपली ‘अधोगती’ असली तरी त्याला ‘प्रगतीपुस्तक’ म्हणण्याची संकल्पना मला मात्र जाम आवडली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy