उन्हाळी पाहुणे
उन्हाळी पाहुणे
उन्हाळ्या सुट्टीचा उन्हासोबत कोणाचा त्रास होत असेल तर ते म्हणजे उन्हाळी पाहुणे!
परिक्षा उरकल्या की आपल्या चिलीपिल्यांना घेऊन आपण कुठे जायचा बेत करण्याआधी तळ ठोकतात.
दोन (दोन तर्हांची) चिरंजीव, एखादी गोड पापा द्यावा अशी गोंडस (गोंडा घोळत मधीमधी करणारी)कुमारी, तिर्थरूप आत्या (पप्पांच्या चुलत चुलत्यांची.... थोडक्यात लांबची बहीण) उन्हाळा लागला की लगोलग येते. तिच्या मागून चार निरनिराळ्या आकारांची बाचकी सावरत तिचा नवरा उर्फ आमचा मामा (ज्याला तीन मुलांचा विस्तार केल्यानंतर पहिल्यांदाच भेटण्याचा योग आलेला असतो) येतो.
एरव्ही वर्षभरत एखादा खुशालीचा फोन करणे हिला जमलेलं नसतं पण रहायला मात्र चार जन्मीचे उपकार ठेऊन असल्यासारखीच येते.
बरं "फोन का करत नाही?" या माझ्या खोचट प्रश्नावर, "अगं बाबांना केला होता की फोन, तेव्हा सगळ्यांची विचापूस केली होती मी..." अशी उत्तर तिच्याकडे तयार असतात.
खरेतर तो फोन नसून मिस्डकाॅल दिल्यानंतर बाबांनी केलेला काॅलबॅक असतो. खुशाली हे फक्त निमित्त असतं!
"ऊरसाला येणारचं असशील गावाला! राहयचा मात्र आमच्याकडेच हं... चांगल गावचं पिठ्ठल भाकर खायला घालीन म्हणते मनभर(फार फार तर एक भाकर आणि ओंजळभर भात आणि वरण की पिठ्ठल? अशी शंका यावी असे पितळभर पिठ्ठल!)... बरं येणारच असशील तर सुशी ला सांग शेर-पावशेर मसाला पाठवून द्यायला हं... माझे येणं काय आता उन्हाळ्याशिवाय होणार नाही म्हणून म्हंटल!"
वास्तविक हा फोन खुशालीसाठी नसून मसाल्यासाठी असतो. यावरून आई-बाबांचे झालेले भांडण दोन दिवसाच्या रुसव्यापर्यंत गेले होते. तरी मसाला गावाला पोच झालाच... त्यामुळे हा फोन मी तरी विसरणे शक्य नव्हते.
आल्या आल्या भांडण नको म्हणून मी बोलणं आवरत घेतलं. मग तीच पुढे बोलू लागली.
"अगं तुझ्या आईने आग्रह केला होता. म्हणे, कधी येत नाही रहायला आमच्याकडे म्हणून ठरवलं या सुट्टीत मामाकडेच न्यायचं पोरांना!"
असे बोलताच आईने आणि मी ऐकमेकींकडे पाहिले. आईच्या चेहर्यावर आश्चर्य कम पश्चाताप असे काहिसे भाव दिसत होते.
वास्तविक कुठल्यातरी चमेलीच्या लग्नात भेटल्यावर, "या कधीतरी घरी" या आईच्या औपचारिकतेला आमची आत्या 'आग्रह' म्हणते.
आत्याची ही प्याद आमच्या घरी पोहचवून परत निघालेला आत्याच्या नवर्याच्या चेहर्यावर झालेल्या आनंदाची तुलना फक्त आणि फक्त पिंजर्यातून सुटलेल्या पक्ष्याशीच होऊ शकते.
त्यामुळे मटणाच्या बेतचा आग्रह केला तरी ते रहायला मागत नाही.
निघताना मामाला ढीगभर सुचना (आज्ञा?) दिल्या... मामा मात्र त्याच्याच तंद्रीत (आनंदात) होता. त्यामुळे सगळ्याच सुचनांना त्याने 'होकार' देत सुटका करून घेतली.
मामा निघाले तसे चिरंजीव आणि कुमारी घरात धूडगूस घालून शक्य त्या महत्वाच्या वस्तू बिघडविण्यास आपला महत्वाचा सहभाग नोंदवतात.
आत्या दोन्ही गालात मशेरीचे गोळे कोंबून घरातली माजी सदस्य असल्यासारखीच वागू लागते.
"तुमच्याकडे बाई रोपं कुंडीत लावतात. आम्हाला नाही बाई आवडतं असं आम्ही अंगणात लावतो होऽऽ (वरचा स्वर -गावकीला ऐकवणं केल्यागत) झाडांना कसं जखडून ठेवल्यासारख वाटत ना?"
"थोडीशी जागा पाठवून दे आम्हाला इथे मग आम्ही पण लावू अंगणात झाडं" असे सुनवण्याची तीव्र इच्छा झाली पण 'सुशीक्षित आणि सभ्य' अशी माझी प्रतिमा तिच्यासमोर होती त्यामुळे आवरतं घेतलं.
हळूहळू सगळ्यात नाक खुपसून, "आम्हाला नाही बाई आवडत असं" असं ध्रुपद ती प्रती वाक्य तथा टोमण्या मागे बोलू लागली.
मग आपला मोठेपण दाखविण्यासाठी तीने छोट्या चिरंजिवाला बोलवून घेतले.
"अगं फक्त तीन वर्षाचा (पुढच्याच महिन्यात चार वर्षाचा होणार होता तरी तिच्यासाठी तीनच!) आहे हा.... पण ए फाॅर एॅपल, बी फाॅर बाॅल सगळं ओळखतो हं"
हा 'अॅपल' स्टीव्ह जाॅब, न्यूटन आणि आता या लहान मुलांना सोडायला तयार नव्हता.
आत्या पण त्याचे कौतुक अशा पद्धतीने सांगत होती जसा काय तो आईनस्टाईनचा वंशज आहे.
बिचार्या छोटू (अजून नावाची ओळख राहिली होती म्हणून छोटू!) बटण दाबल्यावर रेडिओची अंखड बडबड सुरू व्हावी तशी कधी नजर खेळण्यावर तर कधी हवेत ठेऊन, बोटात बोट घालून, या पायावरून त्या पायावर झुलत 'ए टू झेड' म्हणून दाखवले आणि थेट खेळायला पळाला.
तिच्या अचानक येण्याने आईचा आधीच गोंधळ उडाला होता म्हणून रात्रीचा स्वयंपाक मीच केला.
शेवटी जेवणावर, "पोरीला जेवण शिकवलेस होय? मला वाटलं शहरातल्या मुलिंना फ्यॅशन (ती असचं बोलते) शिवाय बाकी काय जमत नसावं.... पण भाकरीचा काठ जरा कच्चाच राहिला ना?"
निव्वळ कौतूक करणं हिला कधी जमलेच नाही.
पण ही असे पर्यंत जेवण बनवायचे नाही असा निश्चय मी मात्र मनाशी करून टाकला.
केवळ आराम हे उद्दीष्ट ठेऊन आलेली या आत्याला कोणत्याही कामाला हात लावला नाही.
त्यात हातभार लावावा म्हणून मदत करायला सांगावी तर आपल्या चमत्कारिक गोष्टींची यांना माहिती नसते. डायरेक्ट प्लग ऑन करून मिक्सर लागतो हा चमत्कार फक्त आपल्यालाच ठाऊक...कडेला तुटलेल्या लाटण्याने फक्त आपल्यालाच चपाती करता येऊ शकते... दांडा नसलेला तवा कसा उतरावा ही एक कलाच असते... कुकरची शिट्टी होत नसेल तर कोणते उपाय करावेत याचे तत्वज्ञान आपल्या खेरीज कुणालाही येत नसते. ही सर्वसाधारण घरातली गुपित ज्याच्या त्याच्यास्वयंपाकघरानुसार निरनिराळी असतात.
तसेही ती काही स्वयंपाक करण्याच्या भानगडीत पडली नाही. पण ही गुपितं घरभर असतात हे तिला ठाऊक नव्हते.
गावाला इस्त्रीची सोय नाही म्हणून हिने सगळ्या साड्या इस्त्रीला काढल्या! माझ्याकडून इस्त्री मागवून घेतली आणि इस्त्री तापवत ठेवली.
शाॅक लागू नये म्हणून इस्त्रीच्या दांड्याला धरण्याची एक विशिष्ट पद्धत आम्हा चौघांखेरीज कोणाला माहित असण्याची गरज नव्हती. त्यामुळे कोणाला विशेष सुचना द्यावी लागायची नाही. तशी ती सुचना आत्याला द्यायला मी विसरले.
दोन्ही बाजूला कपड्यांचे ढीग मध्यभागी इस्त्री करण्याच्या तयारीत असलेली आत्या असे चित्र पाहून मी माझ्या कामासाठी बेडरूममध्ये निघून गेली.
परत आली तेव्हा समोर जळत चाललेली साडी आणि आडवी झालेली आत्या असे काहीसे चित्र पहायला मिळाले.
त्यानंतर बाबा, मी आणि भाऊ यांची दवखान्यात झालेली धावपळ हा एक नवीन उद्योगच झाला.
तिच्या मुलांचा वाढता गदारोळ पाहता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिला कोणत्याही परिस्थितीत लवकरार लवकर बरे करणे भाग होते.
सुदैवाने संध्याकाळी तिला डिस्चार्ज मिळाला. अर्थात सगळा खर्च आमच्याच बोकंडी बसला.
मग मी मात्र, काही झाले तरी दोन दिवसात इस्त्री दुरूस्त करून आणण्याची ताकीद भावाला दिली.
तिच्या आत्रट मुलांना सांभळण्याच्या त्रासातून आईची सुटका झाली.
या आनंदाच्या भरात आणि आत्या आजारी आहे म्हणून आईने खीर केली.त्याचे तिला काही कौतूकच नाही.. तरी एक टोमणा मारलाच!
"आमची छबी, अग माझ्या सख्या भावाची पोरगी... काय छान खीर करते म्हणून सांगू? यात जरा बेदाणे कमीच पडलेत ना सुशी?"
या छबीला पाहण्याचा योग कधी आला नव्हता पण आलाच तर तिला खीर बनवायला लावयचीच आणि 'सुंदर खीर' काय असते ते पाहायचे हे मी ठरवले होते... खरेतर सख्या भावाचे आणि तिचे सबंध फारसे चांगले नाहीत असं मी कुणा एका चौकस नातेवाईकाकडून ऐकले होते.
शाॅकचे प्रकरण तिने फारचं मनावर घेतले. दुसर्या दिवशी घरी परत जाण्याचे ती बोलू लागली.
एवढ्या आजारीपणातही तिचा तोंडाचा पट्टा चालूच होता. फक्त मालिका चालू झाल्या की तीन-साडेतीन तास (जाहिरातींचा वेळ सोडून.... त्या वेळात ती आईला मालिकांचा इतिहास सांगायची) गप्प बसायची तेवढेच!
तेवढ्या वेळात तिने छोटीला (अजूनही त्यांची नाव जाणून घेण्याची इच्छा झाली नव्हती.) बोलावून घेतले.
"ताईला गाणे बोलून दाखवं बाईंनी शिकवलेलं... ती ताई तुला छान ड्रेस घेईल गाणे बोलल्यावर" शेवटचं वाक्य तिने मनानेच अॅड केलं आणि मुलांना पोषाख घ्या अशी जवळजवळ आज्ञाच केली.
"अगं फक्त अडीच वर्षाची (निदान सांगताना दोन मुलांमध्ये नऊ महिन्यांचा गॅप ठेवावा याचेही भान तिला नव्हते.) आहे ही.. अंगणवाडीत जाते. तिथं तिला शिकवतात गाणे"
यानंतर 'एक होती इडली, सांबारात पडून भिजली' या आत्याच्या गाण्यावर तिचा अभिनय करून झाला आणि बदल्यात ड्रेसचे वचन घेऊन झाले.
आजवर दिलखूष परफाॅर्मन्सला फार फार तर हात दुखे पर्यंत टाळ्या वाजवल्या होत्या पण दमडी काय दिली नव्हती.
वास्तविकता काचे पलिकडचा स्टॅच्यूवरचा ड्रेस विकत घेण्यासाठी मी पैसे-पैसे जोडत होती आणि असे वचन देऊन पूर्ण बजेटचं कोलमडलं.
दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे तिला ड्रेस घेतला आणि तसेच आत्याला 'पोहचल्यावर फोन कर' अशी ताकीद देऊन स्टेशनवर सोडून आले.
पैसे खर्च झाल्याचे दुःख होतेच पण ती गेल्याने घराला जी शांती लाभली ती जरा जास्तच होती कारण जाता- जाता तिच्या मुलांनी टिव्हीचा रिमोट बिघडून ठेवला. त्यामुळे टिव्हीचाही आवाज होणार नाही अशी शांतता ती देऊन गेली.
थोड्या वेळाने तिचा फोन आला. "पोहचलो हं सुखरूप सुवर्णे... आणि हो छोटीने आल्या आल्या तू घेतलेला फ्राॅक घातला... आता तोच घालून मिरवतेय... खूप आवडला तिला... मी म्हणाले असं छान गाणे परत म्हंटले ना तर ताई तुला त्या जान्हवीसारखा ड्रेस घेईल म्हणून!"
'जान्हवी' हा भाग तीने बळे मधे घुसवला होता. तसा ड्रेस घालण्याचे वय तरी होते का तिचे? पण हौस पालकांची!
याऊपर ती अजून काही बोलली असती तर माझ्या 'सभ्य' या प्रतिमेला तडा गेला असता हे नक्की! मी यथातथा बोलून फोन ठेऊन दिला.
भावाला सांगितले, "इस्त्री दुरूस्त करण्याची गरज नाही"
मग रिमोटची आदळआपट करून मी आत निघून गेली.
- सय...!!
(व्यक्ती - 2)