दुकान: रिकाम्या पाकिटाचे'
दुकान: रिकाम्या पाकिटाचे'


'दुकान: रिकाम्या पाकिटाचे'
आयुष्यात तीन महत्वाचे काळ असतात.
१. BORNVITA काळ – या काळात आपल्या बुद्धीचा विकास होत असतो.
२. सोशल मिडिया काळ – या काळात आपले जास्तीत जास्त प्रबोधन होते.
३. टीका काळ - सर्वसाधारण निवृत्ती नंतर या काळास सुरुवात होते. यावेळेस कोणी काय केले पाहिजे आणि काय नाही याचे अचानक आकलन होऊ लागते. मग हे अपक्ष राहून टीका करू लागतात. या मध्ये चार उपप्रकार आहेत.
एक म्हणजे निवृत्ती नंतर हि लोक एकतर दुसर्याचे लग्न ठरवण्यात मग्न असतात. आणि आपण पडलेल्या खड्यात दुसर्यानाही खेचण्यास मदत करतात.
किंवा
हे स्वतःचे आत्म्चारीत्र्य लिहितात. यात अचानक ५० कोटीचा वारस दरिद्री वगैरे होतो किंवा हि लोक निवृत्तीनंतर फेरफटका मारत असतात. कारण घरात त्यांचा शब्दाला बायको फारशी जुमानत नसते. त्यामुळे यांच्याकडे कसलेही हक्क नसतात. अशा काळात माणसाला खर्या अर्थाने मुक्ती हवी असेल तर त्याने फक्त बायकोच्या हातातला रिमोट खेचून घ्यावा.
आणि चौथा म्हणजे गोळ्यांचा काळ - सोशल मिडिया काळ हा आठवणी आणि विरहात गेल्याने, काहीतरी आठवण्यापेक्षा विसरण्यात धन्यता आहे हा मानणारा हा प्रवर्ग!गोळ्या खाण्याचा काळ!
वारसाहक्कात मिळालेला मधुमेह, रक्तदाब आणि अशाच तत्सम आजारांची डॉक्टरी रेपोर्टमध्ये नोंद होते आणि तिथून सुरु होतो गोळा खाण्याचा काळ!
मग या गोळ्यांचे टाईमटेबल लक्षात ठेवता-ठेवता नाकीनऊ येतात. आणि यात जराशी चूक झाली कि मात्र बारा वाजतात. इथूनच सुरुवात होते महत्वाच्या गोष्टी विसरण्याची!
"तबेतीत सुधारणा दिसतेय तुमच्या, आता थोड्या गोळ्या कमी करूयात. ही गोळी आता एक दिवसाआड घ्यायची"
असा सल्ला डाॅक्टरांनी बाबांना दिला आणि नसता घोटाळा होऊन बसला!
एक दिवसाआड हे गणित लक्षात रहावे म्हणून बाबांनी कॅलेंडरवर खुणा करायला सुरुवात केली आणि आईची गॅस, पेपर, दुध अशी सगळी चिन्हं उडवून टाकली.
मग अख्या कॅलेंडरवर फुली, गोळा सुरू झाला. पहिलीच्या मुलाचा वाहिवरचा पहिल्या पराक्रमाने जे स्वरूप येते तसे काहीसे कॅलेंडरचे स्वरूप दिसत होते. दिनदर्शिकेची दुर्दशा पाहून... अखेर वैतागून आईने कॅलेंडरवर खुणा करायला मनाई केली!
'महालक्ष्मीचा' आराखडा बदल्यावर आईने बाबांची रवानगी इंग्रजी कॅलेंडरवर केली.
तर तिथे अख्या कॅलेंडरवर खुणाच खुणा (खून निघावे इतक्या खुणा). खालेल्याच्याही आणि न खालेल्याच्याही!!
परंतु कॅलेंडरवर खुणा करूनही यांचे रोज गोळ्या खाणे चालू आहे ही बाब आईच्या लक्षात आली. मग सुट्टीच्या दिवशी कॅलेंडर आणि गोळ्यांचे पाकीट या दोन्ही गोष्टी टॅली करण्यासाठी आईने बसवले.
मारून मुटकून मुलाला आभ्यासाला बसवावे तसा चेहरा झाला होता बाबांचा....
तो हिशोब त्यांच्याच्याने काही लागला नाही मग एक दिवसाच्या सक्तीच्या उपासावर प्रकरण मिटले.
अजूनही अधूनमधून खुणा करूनही हिशोब चुकतो त्यांचा मग हा हिशोब लागावा म्हणून एखादे दिवशी गोळीच न खा किंवा जास्तची गोळी कुठेतरी लपव असे काहीतरी चालू असते.
कधीकधी हिशोबातून उरलेल्या या जास्तीच्या गोळ्या परत केल्यावर किती पैसे येतील याचाही हिशोब चालू असतो. (भीतीपोटी माणूस कोणती शक्कल लढवेल सांगता येत नाही.)
वर ते मला सांगत होते, "बर त्या काही लिमलेटच्या गोळ्या नाहीत की ज्या कोणालातरी देऊन दान केल्याचे पुण्य पदरी पाडता येईल." (मुळात त्या लिमलेटच्या गोळ्या असत्या तर यांनीच फस्त केल्या असत्या यात तीळमात्रही शंका नाही).
कधीकधी ऑफिसला जाताना अर्ध्या रस्त्यातुन परत येऊन गोळ्या चेक करून पाहतात. तर कधी कधी लपवलेल्या गोळ्यांची चौकशी करण्यासाठी फोनवर -फोन करून विचारतात.
'बायकांची दहशत' यालाच म्हणत असावे कदाचित!
एकदा पिकनिकला जाताना गोळ्यांचे पाकीट न्यायचे विसरून गेले.... आणि आल्यावर मला सांगितले की, "मेडीकलमध्ये एखादे रिकामे पाकीट मिळते ते पाहशील का?"
"रिकामे पाकीट?"
मला तर हसू का रडू झाले.
असे किती नवरे असतील जे डाॅक्टरांना नव्हे तर बायकोला हिशोब लागावा म्हणून मेडीकलमध्ये रिकामे पाकीट घ्यायला येत असतील? किंवा आपले पाकीट विकायला येत असतील?
कधीतरी बाटलीचे नुसते बूच घेण्यासाठी किंवा बिना बूचाची बाटली घेण्यासाठी येत असतील??
शेजारणीला 'साखर नाही आहे' असे सांगायचे. असे कितीही पढवून ठेवले तरी अर्धी बरणी तिच्या वाटीत खर्च केली म्हणून हिशोब जुळवणारे नवरे, बरणी भरेल एवढीच साखर मिळविण्यासाठी दुकानं भटकत असतातच की!
कधीकधी डाव्या-उजव्या हाताने ठेवलेली वस्तू सापडली नाही कि, ‘मी पहिलीच नाही” असे सांगून मोकळे होतात आणि मग ती वस्तू त्यांच्याच सामानात सापडते. पुढे काय-काय होते हे या चार भिंतीच जाणो!
"दुधावर लक्ष ठेवा" असे सांगून ‘ही’ बाहेर पडली की ते पातेलं आधी काळा रंग घेतो आणि मग अर्धाच्या जागी एक लिटर दुध उकळते तेव्हा चोर पकडला जातो.
यांच्या त्या रिकाम्या पाकिटासाठी, बिना बूचाच्या बाटलीसाठी, बरणी भरेल एवढीच साखर मिळण्यासाठी एक दुकान हवेच!!
अखेर अशी असंख्य.... रिकाम्या पाकीटांचे, करपलेल्या दुधाचे, कॅलेंडरवरची उडालेल्या चिन्हांची गुपित किती दिवस लपवून ठेवणार?
शेवटी, "तरी मला वाटलच होत....."हे ऐकण्याची वेळ आल्याशिवाय राहत नाही.