ढग
ढग


अंगावर शरदाचं चांदण झेलत तो ढग एकटाच फिरत होता.
कुणीतरी मध्यान्ह रात्रीही दिवे चालू ठेऊन कामात व्यग्र होता तर.... कुणीतरी 'तो' स्पर्श अनुभवत होता..... तर कुणीतरी स्वप्न रंगवत होता.....कुणीतरी तोंडाने श्वास घेत गाढ झोपेत होता.
खुप दूरवर एक दगड निवांत होता.... तर कुठेतरी चाफा आपला सुगंध हळूवार कुणाच्या तरी श्वासात मिसळत होता.
तो ढग मात्र घरा-घरात डोकावत होता. थोडा अल्लडच म्हणा हवतर!
त्याने एका खिडकितून डोकावले तर, टोपी घातलेला एक दिवा स्वतःच उभा असलेल्या टेबलाकडे एकटक पाहत होता. त्याच्यासाठी झुळूक म्हणून आत जाणार इतक्यात लक्षात आलं तिथे तांत्रिक झुळकिचे वारे वाहत होते. हे पाहून तो तिथूनच फिरला....
झोपी गेलेल्या दुकानांसमोर आसरा मागत काही थकलेले चेहरे निजले होते, मग तो एक झुळूक झाला... अलगद मोराच्या पिसाचा स्पर्श व्हावा इतक्या सहजतेने तो त्यांना स्पर्शून गेला.... अन् अंगावर पांघरूनघेतलेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या अजून गच्च आवळल्या गेल्या..... ते दृश्य पाहून तो जरा सुखावला आणि पुढे निघाला. ..
दिवसा जाळलेला कचरा रात्र झाली तरी आपली ड्युटी बजावत निवांत जळत होता. त्या धुराने डोळे झोंबले आणि नाक चोंदल एवढेच नव्हे तर थेट शिंकच आली.
त्याचे चार शिंतोडे अंगावर पडले म्हणून लोकांनी 'त्या' ढगाला 'बिनबुलाया मेहमान' अशी उक्ती देऊन शरदाच्या चांदण्यावरून त्याला थेट शरद पवारांच्या राजकरणापर्यंत नेऊन पोहचवले.
बिचारा कितीवेळा सांगत होता, आम्ही साधे ढग.... कवितेच्या वाटेवर पण क्वचीतच येतो. कारण कवीवर्य एकतर थेट चंद्राला जाऊन भिडतात नाहीतर चांदणी भोवती घुटमळतात. आम्ही तिथेही दुर्लक्षित राहिलेला पारदर्शक घटक! तर या राजकारणाशी आमचा आतून-बाहेरून संबंध का लावावा?