जावईबापू
जावईबापू


तर आपण असे म्हणतो की लग्न झाल्याने मुलीचे आयुष्यच बदलून जाते. तिला माहेर सोडून सासरी जायला लागल्याने खूप adjustmentजुळवून घ्यावे लागते हे सगळे कुठेही खोडण्याचा माझा हेतू नाही.
पण ज्याप्रमाणे मुलीचे आयुष्य बदलते त्याप्रमाणे पुरुषाच्या आयुष्यातही काही बदल होत असतात त्यावरून स्मरलेल हे पात्र....
सर्वसाधारणपणे पुरुष झालेला हा मुलगा सगळ्यांच्या घरात असतो. अशी माझी तरी ठाम समजूत आहे.
ऐन लग्नसराईत कुणाचेही ओळखीच्याचे लग्न उरकावे इतक्या सहज त्याचे लग्न उरकले. लग्न मंडपात एवढ्या सुंदर्या फिरत असताना कुणाचाही गोंधळ व्हावा इतका त्याचाही गोंधळ झाला आणि वरमाला घालताना ‘आपला निर्णय चुकला तर नाही ना’ असा एक विचारही त्याच्या मनात येऊन गेला.
न आवाडती ताटात आलेली भेंडीची भाजी पाहून जेवणाच्या पंगतीत त्याचा दुसरा एक गोंधळ उडाला. पण आसपास हे अप्सरांचे स्वर्गसुख नांदत असताना भेंडीला पण चव येते हे त्या ‘भेंडीला’ पहिल्यांदाच कळले.
घास भरवताना वधूच्या भुकेचा अंदाजही त्याने घेतला. अशा परिस्थितीत त्याचे कसे बसे लग्न उरकले आणि हि वरात घरी वाजत गाजत आली तेव्हा माप ओलांडण्या आधी वधूला नाव घेण्याचा आग्रह करण्यात आला.
वधूने लाजत-लाजत पाठराखीणीकडे एकदा नजर टाकली. तर ती दिराकडे चोरून पाहत असल्याचे, तिच्या लक्षात आले. आता आपली पाठराखीणच माप ओलांडते की काय?? या गडबडीत तिने माप ओलांडले आणि म्हणाली, “झुक्याच फेसबुक, मक्याचा जोक, जानुच नाव घेते काढा शंभरची नोट..”
‘भविष्यात आपले दिवाळं निघणार’ हे लक्षात येताच या आधुनिक नावाने त्याच्या हातातले फेसबुक हादरले खरे पण, त्याहीपेक्षा चारचौघात तिने ‘जानु’ असे नाव घेऊन त्याचा जीव मेटाकुटीला आणला. वधू ‘पावसाळी कवी’ असल्याने तिला यमक जुळविण्यात यश आले होते. हीच काय ती जमेची बाजू होती. या नवावर तोच आतल्या आत लाजला (लाजवला गेला) हे मात्र कुणाच्याही नजरेस पडले नाही.
लग्न, सत्यनारायण, गोंधळ उरकला आणि खर्या गोंधळाला सुरुवात झाली. हे सगळे उरकले म्हणून त्याने एक निश्वास टाकला. आता एकदाचा सुटलो असे तो मनोमन म्हणाला खरे पण, आता तो सापडला असे वधूनेही तितक्याच आत्मविश्वासाने बहुतेक ठरवले होते.
सासूबाईनी सगळा संसार(तिजोरी/कपाटाच्या चाव्या वगळता - हे फक्त मालिकेत पहायला मिळते.) नववधूच्या हातात देऊन त्या बिशी मंडळ, मिशेरी मंडळ वैगरेसाठी मोकळ्या झाल्या....
आता स्वयंपाक घर वधूकडे होते. जेवण बनवायचे म्हणजे मीठ, मिरची, कांदा, लसूण यांचे पत्ते माहित असणे गरजेचे असते.
स्वयपाकघरातला तिचा पहिला दिवस उजाडला.
कढईत तेल टाकले की,
“जिरे कुठे ठेवले आहे?”
हे विचारायला ही लाजरी नववधू (लाजरी म्हणजे सासूबाईंना लाजणारी. नवर्यासमोर लाजणारी पिढी हा इतिहास झाला.). बेडरूममध्ये आपल्या नवर्याकडे गेली आता हे सगळ माहित असायला ‘स्वयपाकघर’ नावाच्या गुहेत याने कधी साधे डोकावलेही नव्हते.
बेडरूममध्ये हा निवांत फेसबुकवर लग्नाच्या फोटोवर कुणाची लाईक आणि कुणाची कमेंट आलीय ते बघण्यात दंग होता.(मुख्यतः जिने आगोदर त्याला नकार दिला होता तिची लाईक, कमेंट आलीय की नाही ते बघण्यात दंग होता – कंसाव्यतिरीक्तचे सगळी वाक्य पत्नी/महिलांसाठी)
तिला अचानक बेडरूममध्ये आलेले पाहून तो दचकला. पण त्याही भूमिकेत स्वतःला सावरून घेत (पुरुषांच्या आयुष्यात अभिनयाला इथूनच सुरुवात होत असावी) त्याने तिच्यासमोर जाऊन ओठ आणि भुवई यांचे वाकडे तिकडे आकार करून रोमेंटिक झाल्याचा आव आणला.. मग तिनेही लडिवाळपणे हलकीच लगावून (पुढे याचे लाटणे वैगरे शस्त्रांमध्ये रुपांतर होते) त्याला भानावर आणत जिर्याचा पत्ता विचारला.
मग हा तोच प्रश्न घेऊन नुकतेच सासूबाई म्हणून प्रमोशन झालेल्या आईकडे गेला.
सासूबाई मिशेरी मंडळापैकी कुणाशीतरी ‘आमकीच्या लग्नात आमचा मानपान केलाच नाही मग मी त्यांना माझ्या मुलाच्या लग्नात कसा धडा शिकवला’ या विषयावर कुणालातरी फोनवर सविस्तर वृत्त देत होत्या.
मुलाला ‘होल्ड’ वर ठेवून त्यांनी तोंडातले वाक्य पूर्ण केले. आणि पिचकारी मारता-मारता ‘त्याला जीर्याचे उत्तर देत पुन्हा ‘ब्रेक के बाद आपका स्वागत है’ प्रमाणे फोनवर रुजू झाल्या.
स्वयंपाक घराकडे जाता-जाता
“सूनबाई काही नवीन बनवत आहे का रे?” असा प्रश्न पेपरातल्या कोड्यातून डोके काढत सासरेबुवांनी विचारला. “नाही म्हणजे खूप दिवस ‘तीच-ती’ चव खावून कंटाळा आलाय म्हणून विचारले”
असे विचारतात – न विचारतात तोच सासूबाईंनी फोनवर बोलता-बोलताच सासर्यांकडे पाहून डोळे वटारले आणि सासर्यांचे डोळे पुन्हा ‘कोड्यात’ पडले.
सासूबाईचे उत्तर स्वयंपाक घरात पोहचते न पोहचते तोवर दुसरा प्रश्न तयार... “जिरे शोधले आहे मी फक्त मसाला सापडत नाही आहे”
पुन्हा त्याची वारी स्वयंपाकघरातून बैठक खोलीत वळाली. प्रकरण मसाल्यावर येऊन आडले... आणि सासूबाईनी उत्तर द्यायला पुढच्या पिचकरीची वाट पहावी लागत होती.
अखेर उत्तर आले... पण ते उत्तर स्वयंपाकघरात जाई पर्यंत फोडणी करपली. अर्थात भडका उडला (फोडणीचा नव्हे नववधूचा!)...
हे सर्व प्रकरण सावरण्यासाठी मग त्याने, बाहेरून ऑर्डर करू असे आश्वासन दिले. पण तरीही नववधूची गाडी अडून राहिली होती.
मग शेवटी त्याने, “आपण गुपचूप मागवू आणि तूच केले असे सांगू मग तर झाले?”
असे हमीपत्र दिल्यावरच प्रकरण निवळले.
बाहेर जाऊन त्याने गुपचूप पार्सल आणून ठेवले. रात्री सगळे जेवायला बसले तेव्हा सासरे म्हणाले,
“व्वा पोरीच्या हाताला काय चव आहे म्हणून सांगू? उभ्या जन्मात असा घरचा स्वयंपाक मी खाला नसेल” एवढे बोलून त्यांनी कुणाकडेही (विशेषतः सासूबाई) न बघता सरळ ताटलीवर लक्ष केंद्रित केले.
यापुढे लगेच छोट्या नणंदेने सूर ओढला, “वाहिनी जेवण डिक्टो त्या समोरच्या ‘तर्ररी’ हॉटेल सारखे लागत आहे” या वाक्याने नववधूला ‘तरतरी’ आली.
पण मगर पाण्यात राहून सुद्धा वैर घेणार नाही अशी सासू अजून पैदा झालेली नव्हती. त्यामुळे पुढचे शस्त्र त्यांनी फेकलेच,
“छे: ग मोने, ‘तर्ररी’ ची चवच वेगळी, आजच्या पोरीना कसली जमतेय?? मी खाल्ले आहे ना पुष्कळदा तिथे..”
सासूबाईचे वाक्य संपते न संपते तोच सासर्यांनी जरा धाडसाने सासूकडे पहिले(उभ्या संसारात तिच्याकडे असे पाहण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती.). आजवर घरात दिलेल्या पैशाचा हिशोब का लागत नव्हता याचे उत्तर सासर्यांना मिळाले होते. ‘तर्ररी’ घोटाळा प्रकरण प्रकरण मुळापासून हाणून पडण्याचे त्यांनी मनापासून ठरवले मग, मनोमन सुनेचे आभार मानले आणि पुन्हा ताटलीवर लक्ष केंद्रित केले.
एव्हाना सुनेने मनोमन ‘तर्ररीचे’ चालेन्ज घेतले होते. पण तो मात्र निमूट पणे हा सगळा प्रकार शांतपणे पाहत होता. कारण, त्याचा अजून ‘हनिमून’ झालेला नव्हता.
पहिल्याच दिवशी दिलेला लाल सिग्नल पाहून पाठराखिणीला दुसर्याच दिवशी माघारी पाठवून दिले होते. आता संसाराला जेमतेम सुरवात झाली होती. स्वयंपाकघरात जळल्याचा वास आला की सासरेबुवा ‘तर्ररी’ सारखे काहीतरी खायला मिळणार म्हणून खुश व्हायचे आणि सासूबाई या खुश होण्यावर जळायच्या.
पुष्कळदा ‘पुलाव’ नावाचा फोडणीचा भात, पनीरची ग्रेविच्या नावाखाली ‘कालवण’ वैगरे सारखे पदार्थांचा शोधही या स्वयंपाकघरात लागू लागला.
एकदा या वधूने छान आवडीने चिकनची ‘ग्रेवी’(अर्थात तो पातळ पदार्थ होता हे काही सांगायला नको) केली होती. दुपारच्या जेवणासाठी खास दीर ऑफिसवरून घरी आला होता. नववधूच्या स्वयंपाकघरातील संशोधन कार्याची त्याला थोडीफार माहिती होती. तो जेवायला बसला तेव्हा त्याने थेट सांगितले,
“वाहिनी, ‘पातळ’ सोडून वाढा”
घरातली एकटी दुकटी बाई बघून असे काहीसे बोलल्यावर तिचा पारा चढला. त्यानंतर काय झाले ते तिच्या दिराला या जन्मात आठवणे शक्य नाही. पण यानंतर तो कधीही घरी जेवला नाही.
नवीन लग्न झाल्यावर प्रत्येक सणाला माहेरी पाठवावे लागते अशी एक प्रथा आहे. शाळेत आणि कामावर सुट्टी मिळते म्हणून या सणांविषयी आपल्याला फारच अभिमान असतो. पण तो अभिमान यावेळी मात्र गळून पडला. त्याला पहिल्यांदाच आपल्या देव-देवतांच्या पराक्रमाची नव्याने जाणीव झाली.
प्रत्येक सणाला घरी आराम न करता, पाठीवर (बाईकच्या हं!) बायकोला घेऊन माहेर वारी करून यायला लागायची. अखेर तो सुट्टीच्या दिवशीही कामाचे नाव सांगून मित्रांसोबत कागोवा करू लागला.
पण यावर उपाय म्हणून नववधूच्या आईने अखेर एक तोडगा शोधून काढला.
‘मुलीला नसेल जमत तर आपण तिच्याकडे जाण्यास काय हरकत आहे? तसेही ‘जावईबापू’ काही नाही बोलायचे नाहीत आपल्याला!’
असे मनोमन ठरवून अखेर नागपंचमीला त्यांनी मुलीच्या सासरी जायचे ठरवले. त्याप्रमाणे त्या घरून निघाल्या आणि स्टेशनावर उतरल्यावर त्यांनी जावयाला फोन केला.
“जावईबापू, मी कुशी(कौसल्या)ची आई बोलत आहे. अहो उद्या ‘नागपंचमी’ आपल्याला यायला काही जमत नाही म्हणून मीच यायचे म्हंटले. बर स्टेशनावर पोहचली आहे. इथे घ्यायला यायला किती वेळ लागेल तुम्हाला?”
जावईबापूचे नाग डसल्यासारखे तोंड झाले. तरीही शक्य तितक्या शांत आवाजात तो म्हणाला,
“हे हातातले काम उरकले की लगेच येतो साधारण २०-२५ मिनिटे लागतील.”
फोन ठेवतो-न ठेवतो तोच बायकोचा फोन,
“अहो, आई आली आहे. लवकर जा तिला घ्यायला. बिचारी किती उशीर उन्हात उभी आहे तिथे”
पस्तीस सेकंद ही वेळ माहेरच्यांना आणण्यासाठीची उशिराची वेळ असू शकते.
आता लगेच निघालो नाहीतर काही खरे नाही म्हणून ऑफिसातून,
‘बायकोची तब्येत अचानक बिघडली आहे’ या कारणा अंतर्गत(‘करणे द्या’ या प्रात्यक्षिकाची इथूनच सुरुवात होते) तातडीची अर्धी सुट्टी घेतली. नागपंचमीची सुट्टी द्यायला काही ते प्राणी संग्रालय नव्हते.
नवीनच लग्न म्हणून दोन-चार जणांनी “काही गडबड तर नाही ना” असे हसून टिंगलसुद्धा केली. याने मात्र दात विचकून हसल्याचे आविर्भाव आणले.
‘आता सासूला आणायला जातो आहे.’ असे सांगितले असते तर, जी टिंगल झाली असती त्यपेक्षा हे कित्येक पट्टीने बरे होते. एवढ्या वेळात त्याला बायकोचे ‘तीन’ आणि सासूचे अडीच(शेवटची रिंग वाजण्याआधीच कट झाली होती.) मिस्कॅल येऊन गेले होते.
या ‘मिस्कॅल’ नावाच्या सदरावर दर ‘माहेरच्या’ गप्पा अंतर्गत सविस्तर चर्चा होणार होती हे त्याने तेव्हाच ताडले. शेवटी ‘फोन + पुण्यातले लघु रस्ते(बोळ) + खड्डे’ हे सगळे मिळून पोहचायला एकूण ४५ मिनिटांचा कालावधी लागला. १ ते ४ या वेळेत पुणेकर काय करत असावेत याचा थोडासा अंदाजही त्याला ट्राफिक कडे बघून आला.
आता सासूबाईच घरी आल्यामुळे तिच्या माहेरी होणारा खाण्याच्या आग्रहातून आपण सुटलो असे त्याला वाटले. पण(हा ‘पण’ लग्न झाल्यावर जन्माला येतो तो पूर्ण संसारी आयुष्यात सोबत असतो) सासुबाईने आणलेले फराळाचे बोचके बघून त्याला अजूनच धडकी भरली.
वर, “अहो आईला तो शनिवार वाडा दाखवून आणा ना, आणि हो सिंहगडावर पण नेवूया हं, त्या मालुसर्यांना तरी पाहता येईल”
मालुसरे म्हणजे तिच्या माहेरचा कुणीतरी पराक्रमी माणूस असल्यासारखीच ती बोलत होती.
तेव्हाच त्याला “आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे” हे उद्गार का काढले गेले असावेत याची अचानक जाणीव झाली.
या काळात ‘तर्ररी’चे चालेन्ज आईच्या सोबतीने तिने पार पाडले. सासरेबुवा तर्ररी चे पुरावे गोळा करण्यात व्यस्त होते. दिराने ‘पातळ’ पदार्थ खाणे सोडून दिले. आणि ‘जावईबापू’ आमंत्रण असो व नसो प्रत्येक सणाला बायकोला घेऊन तिच्या माहेरी जाऊ लागले.
नाहीतर, असले पर्यटक बघून शाहिस्तखानाने आपले दोन्ही हात स्वतःहून कलम करून त्याच्या सासूबाईच्या हातात दिले असते.
सय...!!