व्यक्ती तेवढे स्वभाव
व्यक्ती तेवढे स्वभाव
'श्रीराम जयराम काळे'
"आपण दुसर्यांच्या कार्याला गेलो तर लोकं आपल्या कार्याला येतील"
हे यांच्या वस्तीतलं जगप्रसिध्द वाक्य...
आपल्या मयतीला गर्दी जमावी म्हणून ही लोकं सर्वांच्या मयत/अंत्यविधी, शोकसभा ला आवर्जून हजर राहतात.
परवा म्युन्सिपालटीची गाडी सिग्नलला मेलेल्या भिकार्याला न्यायला आली तेव्हा हे तिथे हजर राहून त्या आधीच वैतागलेल्या सरकारी कामगारांना सुचना देत होते.
नंतर कळले त्या भिकार्याजवळच्या पुचंडीत या सर्वांनी वारसा हक्क दाखवला होता.
सर्वसाधारणपणे, हा नमुना प्रत्येक कुटुंबाच्या जवळच्या नातेवाईकामध्ये पाहीला मिळतो.
ढेरीचा सुटलेला घेर ते सरकारी नोकरीत असल्याचे दर्शवतात. यांना लाॅटरी लागावी तशी सरकारी नोकरी अगदी काहीही मेहनत न करता लागलेली असते. त्यामुळे नोकरी व्यतिरिक्त यांचे अनेक जोडधंदे असतात.
पांढरा पोशाख हा यांचा आवडीचा असतो(वेळ पडली तर कामावरून देखील थेट मयतीला जाता यावे यासाठी असावा बहुतेक...) पोटावर पॅट घालायची यांची सवय त्यांची वैचारिक क्षमता दाखवते.
दररोज चार्लीचा पर्फ्यूमने आंघोळ करून ही लोकं सर्वसाधारणपणे जेवन/नाश्ता करून ऑफिसात झोप काढण्यासाठी जातात.
यांच्या चेहर्यावर कोणत्याही प्रकारची चिंता दिसत नसली तरी काम करून थकल्याचा हे बायकोसमोर हुबेहूब अभिनय करू शकतात.
यांना वाजवीपेक्षा जास्त बोलण्याची सवय असली तरी या लोकांच्या तोंडाला फेस येत नाही कारण समोर असलेल्या माणसाला ते आपल्या थुंकीचे फवारे करून वेळोवेळी जागे ठेवतात.
देव चुकेल पण यांचे कधीही चुकत नसते. चुकलेच तरी, ती चुक बघणार्याचा त्यात हात असतो असे त्यांचे पुरव्यानिशी म्हणे असते.
साधारणतः यांना कुठलेही व्यसन नसते. पण 'चहा' हा त्यांच्यासाठी अमृताचा प्याला असतो. त्यामुळे शेजारच्याच मित्राला चुकवून चहा कसा प्यावा ही कला त्यांना अवगत झालेली असते.
बायको यांना कमीत कमी वेळ घरात ठेवते कारण,
'अधिक बोलण्याची सवय + अधिक बोलण्याची सवय = वादळ/भांडण'
हे समीकरण त्यांच्या घरात फिट बसत असते.
तर... हा नमुना म्हणजे बाबांचा मित्र!
गेल्याच आठवड्यात बाबांच्या सहकर्यांचे वडिल वारले त्यांच्या शोकसभेत भेटले होते.
माईकवर बोलताना ते इतके ओक्साबोक्शी रडले की मलाच गहिवरून आले.... यापूर्वी इतकी सहानभुती 'अलका कुबल'च्या माहेरच्या साडीवरही दाखविली नव्हती मी!
सहजच म्हणून मी बाबांना विचारले, तर अधिक चौकशी नंतर कळले, तो मयत व्यक्ती 'काळेचा' कुणीही लागत नव्हता... बाबांबरोबर म्हणून ते या शोकसभेत आले होते.
शोकसभेपूर्वीच त्यांच्या जवळच्या नातेवाईकाला गाठून त्यांनी भाषण(रडणं?) यासाठी पैसे घेतले होते.
शोकसभा संपली तसे ते आमच्याजवळ आले.
मी न राहवून बोललेचं,
"काका अलका कुबलला टफ दिलीत हं तुम्ही"
यावर ते हसले आणि माझ्या हातावर एक विझिटींग कार्ड ठेवलं!
"हे काय आहे?" मी न वाचताच थेट प्रश्न केला.
"माझं कार्ड आहे. असल्या शोकसभा, शोकसभेची गाणी, अंत्यविधीचे सामान वैगरे करतो मी त्याचे कार्ड आहे हे... राहूदे तुझ्याकडे"
इतक्यात अशी कार्ड ठेवायची वेळ नाही आली माझ्यावर असं स्वगत म्हणून
"पण मी घेऊन काय करू??" एवढचं वाक्य त्यांच्यासमोर ठेवलं.
"अगं तुम्ही पत्रकार लोकं आत्महत्या करायच्या आत तुम्हाला 'सुसाईड नोट' पोहचते... म्हणून राहूदे! वेळ पडली की देत जा माझा वशिला... आपल्या माणसांना आपणच मदत करणार ना?"
शेवटच्या वाक्यानंतर प्रश्नचिन्ह असलं तरी ती आज्ञा होती.
"पण गेल्या आठवड्यात तर तुम्ही टाॅवेल टोपीचा धंदा करत होतात असे बाबा म्हणत होते"
"हो, अगं गेल्या चार-पाच महिन्यात इतके अंत्यविधींचे पोशाख जमले की, तो ही सिजनल बिझनेस म्हणून सुरू केला होता मध्यंतरी..लग्नसराईत लगेच खपले... आता पुढच्या चार-पाच महिने निवांत"
"अच्छा" म्हणत मी पुढचा प्रश्न केला.
"आणि हे शोकसभेत गाणारे कुठून मिळाले तुम्हाला?"
स्वतःच्या मुलिच्या लग्नात ऑर्केस्ट्रा ठेवण्यासाठी बाबांना कुठून-कुठून गायक शोधून आणायला लावले होते यांनी... आणि आता अचानक शोकसभेत गाणार्यांची टीमच यांच्याजवळ होती म्हणजे भारतातलं आठवं नसले तरी थोडं आश्चर्यच ना!
"अगं ते होय... आपल्या गाण्याची इच्छा 'मोरी' पर्यंतच सिमित ठेवणार्यांच्या कलेला वाव देण्याची एक छोटशी समाजसेवा करतो मी"
"अहो पण त्यांचे सुर??"
"गाणे ऐकेपर्यंत सगळेच रडून भागून दमलेले असतात... कोण रडतयं की गाणं चाललयं याचा काही मेळ त्यांना बसत नसतो त्यामुळे चालत सगळं..."
सगळचं किती सहजतेने बोलत होते ते...
कावळ्यांशी काही डील केले आहे का हे जाणून घेण्यासाठी मी गमतीने विचारले,
"काका पिंडाला शिवायला कावळे पण पुरवता का हो तुम्ही?
"कावळे डॅबिस झालेत आताचे... लवकर येत नाहीत. माशाचा एक तुकडा खिशात ठेवून पिंडाभोवती थोडं फिरल की मग कुठे येतो... पण मी या कानाचं त्या कानाला कळू देत नाही"
"तुम्हाला बरं जमत सगळं हॅडल करायला"
"मग काय? करावं लागतं. एकदा मयत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाने विचारले, "तुम्ही आल्यावर लगेच कावळा शिवला.. कावळ्याला काही इच्छा बोललात का?"
"मग??"
"मग काय? सांगितलं त्याच्या नावाने सोनेरी व्हिस्की वाटेन अशी इच्छा बोललो म्हणून... तरूण मुलगा त्यात व्यसनाने मेला होता!"
"मग वाटली का त्यांनी?"
"न वाटून सांगेन कुणाला? ही लोकं जिवंतपणी देवावर विश्वास ठेवणार नाहीत पण भूतांचं यांना भारी भय वाटतं!"
"मज्जा ब्वा काका तुमची"
"कसली मज्जा? त्यांनी कुठून गोव्यावरून व्हिस्की आणून आम्हाला पाजली आणि आमचे आत्मे तृप्त होऊन जे निवांत पडले त्यात तीन विधींचे कार्य हातून गेले"
इतक्यात बाबा सगळ्यांना भेटून आले आणि काकांनी आमचा निरोप घेतला.
मी त्या कार्डाकडे एकदा एकटक पाहिलं आणि मनात म्हंटल देव करो आणि यांना भेटण्याची वेळ कोणत्याही कुटूंबावर न येवो।