Surarna Sayepure

Others Comedy

4  

Surarna Sayepure

Others Comedy

संकल्प

संकल्प

3 mins
15.5K


हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरावा या दिमाखात तो माझ्याकडे पाहत होता...

काहीजण संकल्प करण्याऐवजी त्याच नियोजन करण्यातच आपल्याकडे असलेल्या अर्धवट मेंदूपैकी एक चतुर्थांश भागाची झीज करतात! त्यातलाच हा एक नमुना....

वर्षभर कुठे गायब असतो देव जाणे! पण वर्षाच्या सुरवातीला मात्र शुभेच्छा द्यायला आणि संकल्प सांगण्यासाठी मात्र हमखास भेटतो.

काटकसर म्हणून सरकारने सुध्दा 'नियोजन आयोग' चे नाव बदलून 'निती' आयोग केले. पण याचे मात्र नवीन वर्षाचे नियोजन 'पंचवार्षिक योजने' एवढे होते.

संकल्पाचा विषय होता 'खबरदारी'!

या एका शब्दासाठी अख्खी डिक्शनरी तयार केली होती याने!

एक 'फर्स्ट एड' बॅगच या बहाद्दराने तयार केली होती. त्यात कटर, गोळ्या, खाण्याचे सामान आदी वस्तू होत्या.

मी सहजच विचारले, "याचा नेमका उपयोग काय?"

तर त्यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला 'गीता' सांगावी अशा रुबाबात मला सांगू लागला, "हे बघ आपण बाहेर पडलो की, बाॅम्बस्फोट, पुर, वादळ, दरोडेखोरांचा हल्ला यापैकी काहीही घडू शकते. त्याची ही पूर्वतयारी!"

"पण हे सगळं नाहीच घडलं तर?"

"नाही घडलं तर उत्तमच! पुढच्या वेळी उपयोगी पडेल"

'26/11' होणार आहे हे एक महिना आधी माहित असूनही जळत्या गोठ्यात दावणीला गुरं बांधावीत अशी वेळ आणली आपल्यावर त्या देशात हा हे 'फर्स्ट एड' बॅग घेऊन हिंडणार होता! म्हणून न राहवून मी त्याला विचारलेच, "जर पुर आला आणि तुझ्याआधी तुझीही 'फर्स्ट एड' बॅग वाहून गेली तर?"

त्यावर तो म्हणाला, "बॅग नाही जाणार वाहून कारण त्याचेही माझ्याकडे नियोजन आहे. एवढंच नाही तर पुढच्या दिडशे वर्ष आणि त्यांच्या संकल्पांच प्लॅनिंग आहे माझ्याकडे"

इथे 'उद्याची' खात्री नसताना हा दिडशे वर्षांचे प्लॅनिंग पाहून मी थक्क झाले. मग मी बोललेच!

"मित्रा तुला एक सल्ला देते. 'शेवटचा दिस गोड व्हावा' असे कुणीतरी म्हंटले आहे. त्यामुळे सोबत चार खांदेकरीही घेऊन फिरत जा"

"सय, तू ना कधी सुधारणार असं दिसत नाही. आणि हो मी मेलोच तर तू मुंडण करायला विसरू नकोस" यावर मात्र आम्ही दोघेही खळखळून हसलो.

हसू का रडू अशी स्थिती झाल्यावर तो माझ्या संकल्पा विषयी विचारण्या आधीच मी तिथून काढता पाय घेतला.

त्याच्या सुदैवाने पुर आला नाही. पण दुर्दैवाने साखळी बाॅम्बस्फोट मात्र झाला!

या बाॅम्बस्फोटात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नव्हती. ते एक प्रकारे बरेच झाले!

पण हा बहाद्दर त्यावेळी तिथेच उभा होता अशी बातमी मला कळाली.

आता तो त्याच्या 'फर्स्ट एड' बाॅक्सबद्दल फुशारक्या मारल्या शिवाय राहणार नाही. यात तिळमात्रही शंका नव्हती.

मी त्याच्या फुशारक्या ऐकायला त्याच्याजवळ गेली खरी पण, त्याच्या नावाची, त्याच्याच कानाजवळ दिवंडी पेटवूनही त्याला ती ऐकू गेली नाही.

त्या बाॅम्बस्फोटाच्या आवाजामुळे त्याच्या कानाचा पडदा फाटला गेला होता.

मग मात्र आम्हीच त्याला त्याच्या 'फर्स्ट एड' बॅगेसोबत हाॅस्पीटलमध्ये दाखल केले होते.

या वर्षाच्या सुरवातीला तो पुन्हा मला भेटला. शुभेच्छाही दिल्या आणि तसाच निघून गेला. जाताना एक चिठ्ठी माझ्या हातात ठेवली.

चिठ्ठीत लिहिले होते,

"आता मी संकटाला तोंड देण्यासाठी साधनांचा उपयोग करत नाही. पण मी मात्र सक्षम बनलोय"

त्याच्या त्या डिक्शनरीच्या महाभारताचा अर्थ मला कधी कळला नाही पण या दीड ओळीवरुन त्याला 'कर्मयोग' म्हणजे काय? हे समजल्याची प्रचिती मात्र आली!

चिठ्ठी वाचल्यावर खुप वेळाने लक्षात आले. चिठ्ठी देऊन मी ही बहिरी आहे असे याने सिद्ध केले कि काय?

पण हे विचारण्यासाठी मला आता पुढच्या वर्षाची वाट पहावी लागणार होती....


Rate this content
Log in