काळी वर्तुळे (लघु कथा)
काळी वर्तुळे (लघु कथा)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
कोर्टाची पायरी चढून थेट पिंज-यात 'भगवंत्' उभे राहिले.
खाली मान घालून, उपरणं ओघळत चाललेले, शस्त्रांवर तर जप्तीच आली होती त्यांच्या.
चार रिकामे हात पिंज-याच्या चार ठोकळ्यावर ठेऊन पायाच्या चुळबुळीकडे एकटक पाहत होते.
"हाजीर हो"' म्हणत एक गुन्हा दाखल झाला 'नरबळीचा'.
साक्षीदाराच्या नावाखाली साधू-बाबा सगळेच जमले होते.
तृप्त आत्म्याच्या पिंडाला कावळा शिवावा या हव्यासाने.
या कोर्टात अनोळखी असल्या सारखे वाटून उगाच अस्वस्थ झाले भगवंत्.
इतक्यात समोरचं उभी असलेली न्यायदेवता पाहून स्वतःशीच ती गांधारी असल्याची समजूत काढली.
इतक्यात गुन्हा कबूल करण्यासाठी भगवंताची गीता आणली.
रक्ताळलेल्या फडक्यात गुंडाळलेली. जराशी जीर्ण झालेली.
खोट्या वचनांची धूळ झाडत भगवंतानी गीता हातात घेतली.
उगाच आपलेच शब्दांचा डाव लावत भगवंतानी शपथ घेतली.
न्यायाधीशाच्या उजव्या बाजूला गेल्या कितेक वर्षांचा हातावर साठलेला मळ साफ करत जल्लाद उभा होता, तर डावीकडे, दंड म्हणून कुणाला कोणता 'वर' द्यायचा याची गुंडाळी करूनही वाहत चाललेला कागद.
भगवंतांनी अपेक्षेने नजर कोर्टभर फिरवली.
चेहरे बरेच होते पण जामीनासाठी कुणी देखील नव्हते.
मग उगाच खंत वाटली पेंध्या, अर्जुन चिरायू न झाल्याची.
एका साधूने कबुली जबा
ब दिला. भगवंताच्या नावावर चार नरबळी दिल्याचा.
भगवंत् स्तब्ध!
अजूनही तो बरेच काही बोलला. पैशाचा पाऊस न पाडल्याची खंतही न्यायाधीशां समोर मांडली.
भगवंत् स्तब्ध!
पुरावा म्हणून साक्षात्कार झाल्याचे सांगितले त्यातही 'आय' विटनेसच्या नावाखाली चार नास्तिक गोळा केलेले.
भगवंत् स्तब्ध!
शेवटी न्यायाधीशांनी भगवंतांना बोलायला वेळ दिली.
न्यायाधीशः: हा साक्षात्कार खरा आहे?
भगवंत्: अर्जुनानंतर कोणाचे सारथी व्हावे असे कुणी जन्मलेच नाही.
न्यायाधीशः: मग हे साक्षीदार?
भगवंत्: साहेब, पिंडाला शिवलेल्या कावळ्याला साक्षीदार म्हणून पिंज-यात उभे करून मरणाचा पुरावा देत का कुणी?
ते फक्त दोन घासांचे भुकेले असतात.
साधू असमर्थ!
न्यायाधीश असमर्थ!
आणि गुन्हा?
तो सिध्द झालाच नाही.
कुणीतरी पर्याय म्हणून भगवंतालाच पाण्यात ठेवण्याची शक्कल लढवली, पण ती ही असमर्थ!
भगवंत् पिंजर्यातून बाहेर आले.
हळूवार कोर्टाची एक-एक पायरी उतरू लागले.
चित्रगुप्त केव्हाशी त्या बळी गेलेल्यांना न्याय देण्यासाठी दारातच उभा होता!
आता पुन्हा तीच 'केस' केसं जाईपर्यंत सोडवत बसायचे या विचाराने भगवंतांच्या डोळ्याभोवती काळ्या वर्तुळांनी आकार घेतलेला.
कोण जाणे ही वर्तुळ कधी संपणार ते?