Savita Tupe

Abstract

3  

Savita Tupe

Abstract

आयुष्याचे इंद्रधनू!

आयुष्याचे इंद्रधनू!

6 mins
209


एकटेपण काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव सुरेशराव सध्या अनुभवत होते .निर्मला गेल्यापासून सुरेशराव अगदी एकाकी एकटे झाले होते .पदोपदी त्यांना निर्मलाची कमतरता जाणवत होती ..लग्न झाल्यापासून ४५ वर्षांच्या संसारात त्यांना कधी एकमेकांना सोडून राहिलेलं आठवत नव्हतं .प्रत्येक वस्तू , प्रत्येक जागा त्यांना निर्मला शिवाय अपूर्ण भासत होती .त्यांना सतत ती आजूबाजूला वावरत असल्याचा भास होत रहायचा . असं एकाकी जगणं त्यांना असह्य होवू लागलं होतं.


 कामाच्या व्यापातून ही वेळ काढून ते पत्नी आणि मुलीसाठी असणारे कर्तव्य , जबाबदारी निष्ठेने पार पाडत होते .त्या दोघी म्हणजे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होत्या. मुलगी ४ वर्षापूर्वी लग्न होवून सासरी सुखात होती आणि एक वर्षापूर्वीच परदेशात शिफ्ट झाली होती . जावई पण अगदी मुलासारखा होता .एकंदर मुलीच्या जबाबदारीतून ते खऱ्या अर्थाने मुक्त झाले होते .

  

तीन महिन्यांपूर्वी जेव्हा निर्मला त्यांची साथ अर्ध्यावर सोडून गेली ,तेव्हापासून मात्र ते अगदी खचून गेले होते . मुलीने खुप आग्रह करून सुध्दा ते तिच्या सोबत गेले नाही .घरासोबत असणाऱ्या निर्मलाच्या आठवणींना सोडून जायला त्यांचं मन मानत नव्हतं.त्यांना खात्री होती त्यांची निर्मला शरीराने नसली तरी मनातल्या आठवणी मधून तीच अस्तित्व अजूनही त्यांच्या सोबत , त्यांच्या आसपास होतं.म्हणून त्यांनी इथेच राहायचा निर्णय घेतला होता. पण आताशा त्यांना हे एकटेपण अस्वस्थ करत होतं.


  मागच्या १० वर्षापासून ते मातोश्री वृद्धाश्रम मध्ये तिथल्या अनाथ वृद्धांश्रमासाठी काहीना काही मदत करत होते .त्यामुळे त्यांचे बऱ्याचवेळा तिथे सतत जाणे होत असे . तिथल्या वृध्द , अनाथ व्यक्तींना वयोमानानुसार येणारे एकटेपण ,नैराश्य , वयोवृद्ध हतबलता ते जवळून बघत होते .

 त्याच विचारांनी त्यांना हे एकटेपण सहन होत नव्हते.उतारवयात लागणारी सोबतीची गरज त्यांना प्रकर्षाने जाणवत होती . 

 

 आजही असेच बायकोच्या आठवणींमध्ये ते रमून गेले होते .ती सोबत बसून त्यांना सांगत होती , " कोणाची तरी सोबत घेऊन उर्वरित आयुष्य आनंदाने जगा .तुमच्या सारख्या गरजू , एकाकी जीवन जगणाऱ्या व्यक्तीला शेवटपर्यंत आधार द्या .एकमेकांच्या सहवासात राहून प्रत्येक आनंदी क्षणाचा आनंद घ्या .एकटे राहून ,एकाकी जीवन जगून ह्या जीवनाचे सार्थक नाही होणार .मी अभागी तुम्हाला सात जन्माच्या सोबतीचे वचन देवून , एकट्याला सोडून इहलोकीच्या प्रवासाला निघून आले , मला क्षमा करा . तुम्ही आनंदाने जगा .मी तेव्हाच समाधानी होईल जेव्हा तुमच्यासोबत तुमच्या सुख दुःखात सहभागी कोणीतरी असेल .मी तेव्हाच मुक्त होईल जेव्हा तुम्ही समाधानी व्हाल ".....

  

सुरेशराव दचकून जागे झाले . मावळतीचे किरण खिडकीतून त्यांच्या चेहेऱ्यावर अलगद विसावले होते .एक वेगळीच तरतरी त्यांना जाणवत होती..त्यांनी निर्मलाचा फोटो पाहिल्यावर त्यात तीही समाधानाने हसत असल्यासारखी भासली .

 

त्यांनीही मग मनाशी निश्चय केला आणि दुसऱ्या दिवसापासून ते त्या तयारीला लागले .त्यांना जास्त लांब नाही जावे लागले .वृद्धाश्रमात दोन वर्षापूर्वी विद्या ताई आल्या होत्या . खरं तर आश्रमात फक्त अश्यांनाच आश्रय दिला जायचा ज्यांना बघणारे कोणी नाही .पण विदयाताईंना दोन मुले आणि एक मुलगी होती . नवऱ्याच्या मागे त्यांची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नव्हते .त्या घर सोडून इथे आश्रमात आधाराला आल्या होत्या .पण असे आश्रमाच्या नियमात बसत नव्हते .मग सुरेश रावांनी मध्यस्थी करून त्यांना स्वयंपाक करण्यासाठी विना वेतन राहायला परवानगी मिळवली होती .खुप सालस आणि मनमिळावू होत्या त्या .स्वयंपाक पण अतिशय उत्तम बनवत होत्या . त्यांना खरंच आधार देणाऱ्या एका जोडीदाराची गरज होती . त्यांचाच विचार करून सुरेशरावांनी मुख्य संस्थापकांसोबत चर्चा करून ,विचार विनिमय करून आपला मनसुबा त्यांना सांगितला .तेही अश्या आगळ्या वेगळ्या नात्याला मान्यता द्यायला तयार झाले .


 विदयाताईंच्या मुलांचा मोठा अडसर असणार होता पण त्यांना समजावण्याचे प्रसंगी ,काहीही होईल त्याला तोंड द्यायची तयारी आश्रमातील इतर सदस्यांनी दाखवली .सगळ्यांना ह्या नव्या जुळणाऱ्या नात्याबद्दल खुप आनंद आणि अप्रूप वाटत होते .सगळे उत्साहाने सहभागी व्हायला तयार झाले होते. सगळं व्यवस्थित होईपर्यंत विदया ताईंना न सांगण्याची सुरेशरावांनी सगळ्यांना अट घातली होती. सगळं काही सुरळीत होता होता ८ दिवस गेले. मग सुरेश रावांनी पाठक सरांना विदया ताईंशी बोलायला सांगितले आणि त्यांच्या होकाराची परवानगी घ्यायला सांगितले .


पण हे करताना त्यांनी त्यांचे नाव न सांगण्याच्या अटीवर विद्या ताईंचा होकार मिळतो का नाही हे बघायचे ठरवले .कारण जर त्यांचा नकार असेल तर नंतर त्यांना सुरेशरावांसमोर अवघडलेपण नको यायला म्हणून त्यांची ही इच्छा होती की जर त्या हो म्हणाल्या तर सुरेशराव स्वतः त्यांच्या समोर येवून त्यांना भेटतील. पाठक सर पण ह्या गोष्टीला तयार झाले .

 

पाठक सर सुरेश रावांना म्हणाले ," सुरेशराव तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद आहे . पण तुम्ही विदयाचीच का निवड केलीत?इथे इतरही काही अभागी महिला आहेत ."


"खरंतर मी सुद्धा असे काही ठरवले नव्हते पण जेव्हा मी हा निर्णय घेतला आणि इथे आलो तेव्हा पहिल्यांदा मला विद्याताई समोर दिसल्या आणि मग त्यांचाच मी विचार केला . त्यांचं इथे रहाण आपल्या आश्रमाच्या नियमात बसत नाही .आज त्या स्वयंपाक करतात म्हणून आपण त्यांना ठेवून घेतलं आहे .पण जेव्हा त्यांना काही काम करणे जमणार नाही तेव्हा त्यांना इथून बाहेर पडावे लागेल .मग काय करतील त्या ? कुठे जातील ? हा विचार मनात आला म्हणून मग मी त्यांना एक नवीन आयुष्य देण्यासाठी , नवीन ओळख देण्याचे ठरवले आणि त्यादृष्टीने मग तुमच्या कडे आलो ." 

 पाठक म्हणाले ," तुम्ही तुमच्या नातेवाईक आणि इतर जवळ असणाऱ्यांना ही कल्पना दिली आहे का ? त्यांना हे मान्य आहे का ? " 


"बऱ्याच वर्षांपूर्वी मी जेव्हा एका अनाथ मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता , तेव्हाच माझे सारे नातेवाईक माझ्यासोबत असणारे सारे नातेसंबंध तोडून , माझ्यापासून लांब झालेत , माझ्या मुलीला काही प्रॉब्लेम नाही ,ती आणि जावई दोघेही खूप खुश आहेत माझ्या ह्या निर्णयावर ."

  

पाठक सर अवाक् होवून ऐकत होते . ते बऱ्याच वर्षांपासून सुरेश रावांना ओळखत होते पण त्यांच्या जीवनाचा असाही एक पैलू आहे हे त्यांना आत्ता नव्यानेच कळत होते .

त्यांनी पटकन उभे राहून सुरेश रावांना मनापासुन नमस्कार केला आणि पुढचं सारं मी बघतो असे आश्वासन देवून त्यांना निरोप दिला .

  " खरंच अशी माणसे लाखात एकच असतात . एका नाजूक कळीला शेवटपर्यंत सांभाळून आज पुन्हा नव्याने अजून एका कोमेजनाऱ्या कळीला जीवनदान द्यायला निघाले होते सुरेश राव ."


  पुढची धुरा पाठक सरांनी खुप लवकर मार्गी लावली .विद्याताईंना पण समजावले ,त्या बिचाऱ्या भांबावून गेल्या होत्या .पाठक सरांनी शेवटचा निर्णय त्यांच्यावर जरी सोपवला होता तरी त्यांनी नकार देवू नये अशी समज पण वडिलकीच्या नात्याने त्यांना दिली होती .मुलांचा प्रश्न पण त्यांनी मार्गी लावला होता .सोडून दिलेल्या आईला त्यांना घरात घ्यायचे नव्हते मग तिचे काय होते याची त्यांना पर्वा नव्हती . दोन दिवसांनी त्यांनी होकार सांगितला .  आयुष्याचे सार्थक करणारा तो महान पुरुष बघण्याची त्यांना उत्सुकता लागली होती . 


शेवटी त्यांची ती प्रतीक्षा आज संपणार होती .आश्रमाच्या मागे असणाऱ्या बागेत त्यांना यायला सांगून सुरेशराव ४ वाजता येणार होते . एक अनामिक हुरहुर त्यांना दाटून आली होती , त्या ४ वाजता बागेत पोहोचल्या .नजर सैरभैर होवून त्या व्यक्तीला शोधत होती .नक्की कोण असेल ? पाठक सर म्हणाले होते , मी त्यांना ओळखते , पण काही अंदाज येत नव्हता ,त्या या विचारात मग्न होत्या आणि सुरेशराव सावकाश त्यांच्या समोर जावून उभे राहिले . तसे तर ते विदया ताईंना बऱ्याच वेळा भेटत होते पण अशा प्रकारे भेटताना त्यांनाही अवघडल्या सारखे झाले होते .रस्त्यावर गुलाबाच्या टपरीवर असणारा त्यांचा मित्र त्यांच्या हातात गुलाबाचे फुल देवून म्हणाला , " हल्लीची पिढी हे लाल गुलाब देवून प्रपोज करतात .हे दया त्यांना म्हणजे बाकी काही बोलायची गरज पडणार नाही ." कसं बसं हसत त्यांनी गुलाब घेतला .

पण हात मागे लपवून ते विदया ताईंच्या समोर उभे राहिले .

  

विद्या ताईंनी समोर त्यांना पाहिलं आणि क्षणभर बघतच राहिल्या त्या ! त्यांना काहीच सुचेना काय करू ? त्या तश्याच सुरेशरावांच्या पायावर कोसळल्या आणि आपल्या अश्रूंनी त्यांना जणू अभिषेक घालू लागल्या .त्यांना स्वप्नात सुध्दा वाटले नाही की...

 "असा कधीतरी माझा मलाच हेवा वाटेल ,

दुःखाला सावरून सुख माझ्या पदरी पडेल ! "


 सुरेश रावांनी त्यांना खांद्याला धरून उभे केले आणि काही न बोलता फक्त हातातल्या नुकत्याच उमललेल्या , टवटवीत त्या गुलाबाच्या फुलाला विदया ताईंसमोर धरले . ते पाहून विदया ताई लाजून अगदी गोऱ्यामोऱ्या झाल्या , त्यांना काही समजेना , त्यांना असं छान लाजलेलं पाहून सुरेश राव समाधानाने हसू लागले ..त्यांना हसताना पाहून मग बागेत झाडामागे लपून बसलेले आश्रमातील इतर मंडळीही टाळ्या वाजवत बाहेर आली आणि त्या दोघांच्या हास्यात सामील झाली .

" आयुष्याच्या मावळतीचा रंग जरी शांत शांत "..

सोबतीला असेल भक्कम साथ , नाही उरणार कशाचीच भ्रांत "....

   

जीवनाचा ऊन पाऊस झेलून आता दोघे एकमेकांच्या सहवासात इंद्रधनू रंगाची मुक्त उधळण करण्याचे वचन देवून सर्वांच्या संमतीने अनोख्या आणि अगदी साध्या समारंभाने लग्नबेडीत अडकले. अन् उतरणीच्या आधारासाठी, आयुष्याची सेकंड इनिंग पुन्हा नव्याने सुरू झाली ह्या अनोख्या दाम्पत्याची!

  

निरोगी, दीर्घायुष्य लाभो दोघांना , द्या आशिर्वाद मनापासूनी !!  


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract