आई
आई
रात्री वाऱ्यात गारठा नेहमी पेक्षा थोडा जास्तच होता, तिने अंधारात मिचमीचे डोळे करून आजूबाजूला बघितलं, तिची दोन गोंडस मुलं तिच्या बाजूलाच झोपली होती. ह्या मुलांचं एक बरं असत दिवसभर ऊन पावसाची परवा न करता खेळ खेळ खेळायच आणि रात्र झाली कि दमून झोपून जायचं. त्यांना ना उद्याच्या अन्नाची चिंता ना रात्रीच्या झोपेच्या सोईचा विचार, त्यांच्यासाठी त्यांची आईच सगळ काही होती. ती कधीही बाहेरून आली की दोघंही तिला धावत येऊन बिलगायची, कधी कधी तर फक्त माझेच लाड कर त्याचे नाही म्हणून दोघांन मध्ये चढाओढ लागायची. ती त्याच्या कडे बघून विचार करू लगली, मस्तीखोर पण गुणी आहेत दोघं मी बाहेर गेली आणि मला यायला कितीही उशीर झाला तरी कधीच अवार ओलांडून बाहेर नाही गेली. दिसायला ती दोघंही खूप गोंडस होती, कोणालाही भुरळ पडेल अशी, ती दोघं खेळायला लागली की येणारा जाणार दोन सेकंद का होईना त्यांना पाहत उभा राहिचा बऱ्याच वेळा तर तिने "हिच्याकडे बघून वाटत नाहीत हिची मुलं आहेत" अशे लोकांचे हावभाव पाहिले होते" . ती स्वतःशीच हसली आणि तिने दोघांना स्वतः जवळ ओढलं. तिच्या अंगाची ऊब मिळताच ती दोघं तिच्या कुशीत शिरली.
नेहमी प्रमाणे ती सकाळी उठली आणि पोटासाठी काही शोधायला बाहेर पडली.
सकाळची संध्याकाळ झाली पण ती अजुनही दारोदार फिरतच होती, तिला कोणीच काही खायला दिलं नाही, तिला मुलांची चिंता सतावू लागली. ती एक वेळ उपाशी राहिली असती पण तिला मुलांसाठी काही तरी शोधलं पाहिजे होत.
तिने नेहमीच्या गल्या आणि घरं ह्याच्या समोरून दोन तीन फेऱ्या मारल्या पण आज तिच्या कडे कोणाचं लक्ष नव्हत. गावातली जवळजवळ सगळीच दुकान आज बंद होती, का बरं बंद असतील दुकान आज? असा ती विचार करत असतानाच तिच्या कानावर बँड आणि ढोल तश्याचा आवाज पडला, त्या गावा बाहेरच्या ग्राउंड वर कोणाचं तरी लग्न लागलं होत, बहुतेक म्हणूनच सगळी दुकानं बंद असतील. लग्न म्हटलं की जेवणाची चंगळ असते, जाव का आपण पण तिथे, काही ना काही तरी सोय नक्कीच होईल, पण आप
ल्याला तिथे कोणी पाहिलं तर आणि दारातूनच हकलून दिलं तर, पण लग्न म्हणजे जो तो गडबडीत असेल आणि आपण लोकांचा डोळा चुकवून आत शिरू शकलो तर मुलांना आज चांगल काही खायला मिळेल, जावं का तिथे? मुलांचा भुकेने व्याकूळ झालेला चेहरा तिच्या समोर सारखा येत होता आणि मग जे होईल ते बघू म्हणून ती ग्राउंडच्या दिशेने चालू लागली.
ग्राउंड वर खूप गर्दी होती, जेवणाचा सुंदर वास सुटला होता. संधीची वाट बघत ती थोडा वेळ बाहेरच थांबली आणि इतक्यात आकाशात ते रंगीबिरंगी फटाके फुटू लागले आणि सगळे लोकं मान वरती करून ती आतिषबाजी बघण्यात गुंग झाले आणि कोणाचं लक्ष नाही हे बघून ती आत शिरली, वास येत होता त्या दिशेने लपतछपत चालू लागली.
जेवणाच्या तंबूत मोठमोठाली ताट भरून पुऱ्या,पापड,जिलेब्या ठेवल्या होत्या. एका बाईने ताट भरून घेतल आणि काही तरी विसरली म्हणून भरलेले ताट तसचं खुर्ची वर ठेवून निघून गेली. हिने आजूबाजूला बघितलं कोणाचाही तिच्याकडे लक्ष नव्हत, तिने हळूच ताटाटल्या पुऱ्या उचलल्या आणि इतक्यात मागून आवाज आला " अरे ही इथे कशी आली, ही आत शिरलीच कशी, कामचुकार मेले, लक्ष कुठे असत तुमचं, आधी हिला बाहेर काढा" आपली चोरी पकडली गेली ह्यांच्या हातात आलो तर खैर नाही म्हणून तिने तिथून पळ काढली, तिला वाटल आपण नोकरांना चुकवण्यात यशस्वी झालो पण कसा कोण जाणे एक मोठा दगड तिच्या दिशेने आला आणि फटकन तिच्या डोक्यात बसला, तिला गरगरल्या सारखं झालं तोच पाठीत आणि डोक्यावर काठीचा जोरात फटका बसला, डोक्यातून भळाभळा रक्त वाहायल लागलं आणि ती जीवाच्या आकांताने पळू लागली.
तिचा सारखा चालताना तोल जात होता, जखमेतून रक्त पण खूप वाहत होत पण तिला कसलीच परवा नव्हती तिला दिसत होती ती फक्त तिची भुकेने व्याकुळ झालेली मुलं. कशीबशी ती दारात शिरली आणि ती आली त्या बरोबर कुई कुई करत तिची पिल्ल तिच्या कडे धावत आली, तोंडातल्या पुऱ्या तिने त्यांच्या समोर टाकल्या आणि तिची शुध्द हरपली...
कोणाची का असेना आई ती शेवटी आईच असते...