राखी
राखी


तिच्या लग्नाला आता जवळजवळ ८ वर्ष होत आली होती. हया ८ वर्षात तो तिला एकदा हि भेटला नव्हता. इतक्या पटकन विसरून जाण्यासारखं असेल त्यांच नात असं तिला कधीच वाटलं नव्हतं. तिने लग्नाचा घेतलेला निर्णय त्याला मान्य नव्हता. ती घाई करत आहे असं तो म्हणाला देखील होता. पण खरंच का त्याला घरची परिस्थिती माहित नव्हती. तिला आणखी थांबण शक्य नव्हतं पण म्हणून का त्याने तिच्याशी सगळे संबंध तोडणं गरजेच होत?
असा एकहि दिवस गेला नव्हता जेव्हा त्याला तिची आठवण आली नव्हती. तिने त्याला पदोपदी मदत केली होती आणि जेव्हा तिला मदतीची गरज होती तेव्हा तो दुबळा पडला होता. त्याला घरच्यांच्या विरोधात जाणं जमल नाही. पण ते वयच तसं होत. तेव्हा तो लग्नाच्या विषयाबद्दल बोलण्यासाठी खूप लहान होता. त्याने तिला सांगितलं सुद्धा होत 'थोडा वेळ थांब'; पण तिने ऐकलं नव्हतं. ह्या एका चुकीमुळे, ती कायमचे संबंध तोडेल असं त्याला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.
दर वर्षी प्रमाणे तिने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि घरातल्या कृष्णाला राखी बांधली.
दर वर्षी प्रमाणे त्याने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि स्वतःची राखी स्वतः बांधून घेतली.