जगायला शिका
जगायला शिका
सकाळी सकाळी एक वाईट स्वप्न बघितलं. मला दिसलं, मी कोणत्या तरी धबधब्यावरून खाली पडलीये. आजूबाजूला गर्दी जमली आहे पण मला उचलायला कोणी पुढे येत नाही आणि इतक्यात डॉक्टर आले, डॉक्टर आले म्हणून लोक बाजूला होतात. एक थोडासा जाडा आणि वयस्कर माणूस माझ्याजवळ येतो, (बहुतेक हा डॉक्टर असावा) जवळ येऊन तो माझी pulse तपासतो, (बाई किती गरम हात आहे ह्याचा माझ्यापेक्षा, ह्यालाच ताप भरलाय नी डॉक्टरची गरज आहे), मला हसू येतं पण त्याच्या त्रासिक चेहऱ्याकडे बघून मी गप्प बसते. तो आता stethoscope कानाला लावून heart beats ऐकू लागतो आणि का कोणास ठाउक मला "जिया धडक धडक जाए" ओळी आठवल्या मात्र काही केल्याने पुढच गाणं काही आठवत नव्हतं (मी थोडीशी स्वतःवरच चिडली, मला ओळी आठवल्या नी नेमकं गाणं नाही आठवलं कि माझी गाणं आठवेपर्यंत चिडचिड होते), असो तोपर्यंत साहेबांनी pocket torch काढली नी माझ्या pupils ची तपासणी करू लागले. "अहो डॉक्टर बंद करा ती, light चा त्रास होतोय मला, मला काहीही झालेलं नाही, मला कुठेही दुखत नाही आहे, आवरा आवरा लवकर" अगदी ओठांवर आलं होत, पण मी देखील डॉ असल्याने स्वतःला आवर घातला.
इतक्यात ambulance आली आणि stretcher घेऊन दोन wardboy आले. मला खरंच कुठेही लागलं नाही किंवा दुखत देखील नाही, मला stretcher नको असं बोलावसं वाटलं पण जाऊ देना कशाला risk. मला उचलून त्यांनी stretcher वर आपटलं, (खरंच सांगते आपटलंच, वरतून पडून मला काही लागलं नसेल, पण ह्या आपटण्यामुळे एखाद fracture नक्कीच झालं असेल ). त्यांनी stretcher उचलून ambulance मध्ये ढकललं आणि ते करताना माझं डोक आतल्या bench ला लागलं. आता मात्र हद्द झाली मी त्या wardboy वर जवळजवळ खेकसलीच "ओ लागलं मला जोरात, जरा हळू ठेवता येत नाही का" तर हा पठ्ठ्या मला sorry बोलायच्या जागी "कसली कटकट मागे लागली नुसती" म्हणत वळला. बस this is too much, I am going to report this behavior to hospital authority असं काहीसं मी बड्बडले. इतक्यात तो मगासचा डॉक्टर ambulance जवळ आला आणि wardboy ला म्हणाला "लगेच postmortem साठी घेउन जा body", " अरे ऐ मठ्ठा मी जिवंत आहे, admission साठी घेऊन जा patient ला बोल, अरे ए मूर्ख बावळट माणसा" मी जोरात जोरात ओरडत होती पण कोणाच माझ्याकडे लक्षच जात नव्हतं, इतके हातवारे करतेय पण कोणी बघत का नाही? मी पुन्हा जोरात किंचाळली आणि किंचाळतच होती तेव्हा मंदारनी मला झोपेतून जागी के
ली.
कसलं बेकार स्वप्न होत, श्शी. पुन्हा काही केल्याने मला झोप काही आली नाही आणि मग डोक्यात विचारांच थैमान सुरु झालं. खरंच असं होत असेल का? म्हणजे शेवटचा तो धागा तुटल्यावर नक्की काय होत असेल? जसं मला स्वप्नात दिसलं तसं प्रत्येकाला आपल्या भोवतालीच दिसतं असेल का? कळतं असेल का? आणि सगळं जर दिसत असेल तर त्याची अवस्था नक्की कशी होईल?
म्हणजे बघा ना आज पर्यंत तो ज्या वक्तीन पासून चार हात लांब राहिला, कधीच त्यांच्यांत जाऊन बसला नाही, आज तेच त्याच्या घरी जमले आहेत; त्याला, त्यांना Thank you म्हणायचय पण म्हणता येत नाही आहे. तिला मोठेपणा हवा असतो सारखा, मला नाही जमणार सारखं सारखं असं खाली वाकायला म्हणून त्याने पाठ फिरवलेली बहीण तिथे जीव तोडून रडत आहे, त्याला, तिला ताई माझं चुकलं म्हणून मिठी मारायची आहे. एका छोट्याश्या गैरसमजातून त्याने संबध तोडलेला मित्र तिथे भिंतीला टेकून एकटाच रडत आहेत, त्याला, त्या मित्राला sorry म्हणायचय. तो आधी ज्या चाळीत रहात होता आणि त्याची परिस्थिती चांगली झाल्यावर जिथे तो कधीही फिरकला नाही तिथले मित्र त्याच्या घरातल्यानं धीर देत आहेत, त्याला पुन्हा त्या चाळीला भेट द्यायची आहे. मला नाही आवडत नातेवाईकांना भेटायला असं म्हणून पाठ फिरवलेले सगळे नातेवाईक तिथे जमा झाले आहेत, त्याला त्याच्याशी पुन्हा संबध जोडायचे आहेत. "राजा, थोडा वेळ आहे का? थोड बोलायच होत" म्हणून गेले आठ दिवस मागे लागलेल्या बाबांना बाजूला घेऊन त्याला आज बोलायच आहे. "अहो, ऐका ना माझं म्हणून रोज विनवणी करण्याऱ्या बायकोला, "अगं किती रडत आहेस मी आहे, सांग तुला काय सांगायच ते म्हणात घट्ट मिठी मारायची आहे". "पप्पा आपण फिरायला कधी जायच" म्हणून मागे फिरणाऱ्या आणि आज भेदरून बसलेल्या मुलाला जवळ घ्यायचय, आणखी खूप काही करायच आहे आणि त्याला ते आता जमत नाही आहे, कशी असाह्या अवस्था होत असेल ना?
त्याला तेव्हा किती जरी इच्छा असली तरी करता येणार नाही. पण थोडा विचार करा आपल्याला आता हे जमण्यासारखं आहे ना?
आपला उद्याचा दिवस कसा असेल कोणास ठाउक पण आताचा क्षण तरी आपल्या हातात आहे ना, मग का आपण तो असा वाया घालवतो. का आपण असलेल्या आणि आलेला क्षण उद्याच्या भरवश्यावर निसटून देत आहोत. का आपण आपल्या मायेच्या माणसांना दूर ठेवतो. आज मिळणार आनंद आणि वेळ का आपण उद्यावर ढकलतो. जमलं तर थोडा विचार करा आणि आज मध्ये होईल तेवढ जगायला शिका.....