Shwetal Deshmukh

Inspirational Tragedy

3  

Shwetal Deshmukh

Inspirational Tragedy

श्रीमंती

श्रीमंती

3 mins
9.1K


हॉस्पिटलमध्ये आज खूप जास्त गर्दी होती. विलासला ३ तास कडेवर घेऊन प्रिया खूप थकली होती. पंकज विलासला मधेमधे घेत होता पण आज विलास पंकज जवळ जास्त वेळ रहात नव्हता. मोठ्या मुश्किलीने विलाससाठी child specialist डॉक्टरची सरकारी हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट मिळाली होती. चार तासांनी प्रिया आणि पंकज डॉक्टरला भेटून केबिन बाहेर आले. डॉक्टरनी विलासचे रिपोर्ट्स बघून सगळं नॉर्मल आहे घाबरण्यासारखं काहीच कारण नाही सांगितलं होत. ह्या एका वाक्यात दोघांचा सगळा त्रास भरून निघाला होता.

बाहेर खूप गरमी होती. तिघेही घामाने भिजले होते आणि दादरसारख्या ठिकाणी हॉस्पिटलजवळ पार्किंग मिळणं अशक्य म्हणून पंकजनी स्कूटर जरा लांब पार्क केली होती. इतक्या उन्हात विलासला कडेवर घेऊन स्कूटर पार्क केली त्याठिकाणी चालत येण्यापेक्षा तू समोरच्या AC हॉटेलमध्ये बस, मी स्कूटर घेऊन येतो सांगून प्रियाला हॉटेलच्या दारात सोडून पंकज तिच्या जवळच सगळं सामान घेऊन चालू लागला.

प्रिया हॉटेलमध्ये शिरली आणि समोरच्या टेबलावर बसली. प्रियाचा अवतार बघून काही लोकांनी तिच्याकडे बघून नाकं मुरडली. रूम गार असल्यामुळे तिला आणि विलासला थोडं बरं वाटलं. वेटरनी पाण्याचा ग्लास तिच्यासमोर ठेवला नी ऑर्डरसाठी उभा राहिला. प्रिया घटाघटा पाणी प्यायली. "काय ऑर्डर आहे" , "अं काही नको. वेटर तिच्याकडे संशयानी बघू लागला" , "काही कोल्ड ड्रिंक वगैरे" " नको". काही सेकंद तिथे थांबून वेटर कॉउंटरवर बसलेल्या मालकाजवळ जाऊन प्रियाकडे हात दाखवून काही सांगू लागला.

तरातरा चालत मालक प्रिया जवळ आला. "काय हवंय तुम्हाला," "खरंच, काही नको, हे पार्किंगमधून स्कूटर घ्यायला गेले आहेत आणि बाहेर बाळाला गरम होत होतं म्हणून मी आत येऊन बसले" "ए, बाई तुला काय ही धर्मशाळा वाटली, आत येऊन बसायला, चल निघ इथून" मालक प्रियावर जवळ-जवळ ओरडलाच. आजूबाजूची लोक खी-खी करून हसली. "शी man look at her clothes, disgusting" " how can doorman allow people like this to enter." प्रियाला रडू आलं तिने बाळाला उचललं आणि ती हॉटेलबाहेर येऊन थांबली. इतक्यात पंकज स्कूटर घेऊन आला, "काय ग, बाहेर का थांबलीस आत जाऊन बसायचं होतस नं" "नको चल, निघू या" दोघं तिथून निघून गेली.

प्रियाच्या मनाला घडलेला प्रसंग खूप लागला होता, ती पंकजला काही बोलली नाही पण न राहवून ती दुसऱ्या दिवशी ती ज्या ठिकाणी घर कामाला जात होती त्या ताई जवळ खूप रडली. "स्वातीताई मी बाळाला ऊन लागत होत म्हणून आत गेली होती, त्या श्रीमंत हॉटेलमध्ये माणसं येत नाहीत का हो ?"

शनिवारी स्वाती आणि राज आईने सानिकाच्या जन्माच्या वेळी नवस बोलल्या होत्या तो फेडण्यासाठी पालीच्या गणपतीला आली होती. गाडी देवळापासून जरा लांब पार्क केली होती. दर्शन वगैरे व्यवस्थित झालं, पण सानिकाला बहुतेक उन्हचा त्रास झाला होता, ती सारखी चिडचिड करत होती जास्त वेळ न थांबता परत मुंबईला निघायच ठरलं. देवळातून बाहेर पडून "तू इथेच, थांब मी गाडी घेउन येतो", सांगून राज गाडी आणायला गेला आणि सानिका अचानक ओकली. सानिकाचे सगळे कपडे खराब झाले, स्वातीची साडीसुद्धा खराब झाली. रुमालाने ती साडी साफ करत होती इतक्यात सानिका पुन्हा ओकली. आता कसं करायच हा विचार स्वाती करतच होती, तोच बाजूच्या एका झोपडीतून हाक आली "ताई इथे सावलीत स्टुलावर बसा, मी आतून पाणी आणून देते साफ करायला." स्वाती दिलेल्या स्टुलावर बसली, त्या बाईने घरातून तांब्याभर पाणी आणून दिल. "द्या बाळाला माझ्याकडे तुम्ही पाण्याने कपडे साफ करून घ्या." सानिकाला त्या बाईकडे देऊन स्वातीने साडी साफ केली आणि इतक्यात सानिका पुन्हा ओकली ती त्या बाईच्या अंगावर. "सॉरी" "सॉरी" करत स्वाती सानिकाला घेण्यासाठी वाकली "अहो, असू द्या ओ ताई, आमची पोरं नाय ओकत व्हयं, त्यात काय इतकं." राज गाडी घेऊन आला, त्या बाईने आणखी एक तांब्या भर पाणी दिलं, त्या पाण्याने स्वातीने सानिकला साफ केलं आणि त्या बाईचे आभार मानले "ओ ताई पाण्यासाठी कसले आभार, तो जो वर बसला आहे ना तो सगळ्यांना सगळं काही वेळेवर मिळवून देतो"

राज आणि स्वाती गाडीत जाऊन बसले, नी मुंबईच्या परतीच्या प्रवासाला निघाले..

स्वातीच्या मनात प्रियाने सांगितलेला प्रसंग आणि आत्ताचा प्रसंग फिरत होता. खरी श्रीमंती कशात असते? तो जो वर बसला आहे तो सगळ्यांना सगळं वेळेवर देतो मग आपण ते मीच कमावल म्हणून टिमकी मारत कवटाळून का बसतो?

आपल्याला नक्की कशाचा इतका गर्व असतो?

झोपडीत माणुसकी सापडते आणि इमल्यात ती का हरवते?

गरीब हातातल्या एक भाकरीचा तुकडा हसत हसत दुसऱ्या समोर करेल पण काही श्रीमंत अन्न फेकून देतील पण दुसऱ्याला देणार नाहीत, हा नक्की कसला माज?


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational