व्याख्या प्रेमाची
व्याख्या प्रेमाची


प्रेम म्हणजे नसतं, नुसतं उमळून येणं,
किंवा नसतं एकमेकात, सतत विरघळून जाणं
प्रेम म्हणजे प्रणयाचा, नसतो फक्त आवेग ,
प्रेमात नसते कुठेही, आखायची भोज्जाची रेघ
प्रेम म्हणजे असतं, समजून घेणं दुसऱ्याला,
तोंड मिटून शिकायचं, मनापासून ऐकायला
प्रेमाला पुरतो दोघांचा, फक्त निर्मळ सहवास,
'मी आहे' हा डोळ्यातून मिळणारा विश्वास
प्रेमाला नसावी अल्पही, भीती परस्परांची,
न यावी संवादा, अडखळ कधीही शब्दांची
धांडोळा घ्यावा मनाच्या, सुखात रमल्या प्रेमाचा,
सापडेल मग खचित सूर तो, घरातल्या त्या नात्यांचा
अखेर प्रेम म्हणजे सांभाळून, घेणं असतं दुसऱ्याला,
थोडं तुझं थोडं माझं, मग कुणीच नको रुसायाला
सांभाळा इतकं, अलवार मग प्रेम लागेल रुजायाला
प्रेमाच्या वर्षावात सज्ज होऊया, चिंब चिंब भिजायाला