संस्कार
संस्कार
1 min
228
मातीच्या आकारहीन गोळ्यांमधून
एक मडकं येतं आकाराला
संस्कार होतात भाजून ठोकून
कच्च नको कुठे राहायला
वापर कोण घेणार कसा करून
हे त्याच्या नशिबावर असतं
मर्तिकाजवळ की शरीर रंगवून
ते अजून ठरलेलं नसतं
शिलाची कपची अलवार जपायची
तर लागतो सांभाळून ठेवायला तोल
भक्कम बैठक हवी तळाची
त्यावर स्वच्छ पाण्याची सुरई सखोल
अगदी त्याच गोळ्यातून तुला घडवतात
सुंदर सगुण रूपाने सजवतात
जगाचा म्हणतात तुला निर्माता
मातीच्याच पायाचा तुझा , कर्ता करविता
विसर्जनानंतर सारच बदलतं
भग्नावशेष एवढंच रूप रहातं
मातीच्या भांड्याशेजारी पडलेला आशीर्वादाचा हात
पाण्याबरोबर किनाऱ्यावर आलेला वहात.
