वसंत बहरला
वसंत बहरला
ग्रीष्म ऋतूत व्याकूळ
झाली तप्त वसुंधरा
मन ही आसुसलेले
नभाकडे या नजरा
धरणीची लाहीलाही
सूर्य असा तळपतो
रंग केशरी नारंगी
आसमंती उधळतो
लागे वसंत चाहूल
ऋतू मनात फुलला
पाने फुले बहरली
छान *वसंत बहरला*
रानी पळस फुलला
झाली केशरी ही दाटी
बहरल्या वृक्षवल्ली
चित्र सुंदर रेखाटी
सप्तरंगी इंद्रधनू
अलौकिक अपूर्वाई
विविधांगी सुंदरता
निसर्गाची नवलाई
थेंब थेंब पावसाचा
मन आकर्षून जाते
बीज अंकुरे मातीत
नवसृष्टी जन्म घेते
मृदगंध दरवळे
मनोमन उत्कर्षिले
तृप्त होऊनी सरीत
रान अवघे भिजले
कलरव करी पाने
गाणी गोड जणू गाती
सानफुले संगतीने
तालात धुंद नाचती
स्वप्न हिरवेगार हे
नयनांनी बघितले
सुखावला बळीराजा
शेत शिवार फुलले
रुप गोजीरे सृष्टीचे
रोज नवखी सजते
गर्द हिरव्या शालूने
धरा सुंदर नटते
कशी किमया सृष्टीची
चिंब झाली ही धरती
बहरले रानोमाळ
सर्वजण सुखावती

