वृद्धत्व
वृद्धत्व
वृद्धत्व.. जणू पडक्या वाड्यागत खंगार
ज्याचे आधारस्तंभ कोलमडलेले..
मायेच्या भिंतीही उध्वस्त झालेल्या,
आदराचे छप्परही कुजलेले, जणू पडण्यासाठी अधीर झालेले
असा हा वृद्ध वाडा,झेलितो मरण यातना
जेव्हा नवीन घर सजवायला...याच्या स्वप्नांचा,
ज्यांना जीवनभर डोळ्यापुढे ठेवून
हा देत आला सावली, होतो त्याचा वारा.
हिरावले जाते डोळ्यापुढे.. भिंती, छप्पर
अगदी सुरक्षिततेच प्रतिक,दरवाजाही,
मग राहतं काय अस्तित्व या खंगार वाड्याच?
याचं प्रेम/माया कुणाला वाटावस का नाही वाटलं ?
नव्या घराच्या कौतुकात, जसं त्यावर धुकं दाटलं,
तिरस्कार करण्याआधी कुणी..
दिलेल्या सावलीचा विचार केला का ?
मनी असुरक्षिततेचे अंकुर फुटण्याआधी
छायेखालची सुरक्षितता आठवते का?
'नवं ते हवं' असले तरी,'जुनं ते सोनं' विसरु नये,
नव्या जगाच्या निर्मितीला,इतिहासाला मिटवू नये,
नवे ही कधी जुने होईल,नवे होते जे जुने आहे
करावी पुर्तता प्रयत्नांनी,प्रेम ज्याचे उणे आहे,
आधाराची गरज ज्याला...
देता आधार सुख होईल त्याला,
कधीतरी हा वाडा पडणारचं आहे,पण..
आधारस्तंभानेच पाडण्याची वेळ यावर यावी का ?
वृद्धत्व... जणू म्हाताऱ्या 'वटवृक्षागत',
फांदी नि फांदी जर्जर,
जणू भयंकर वृद्धत्वाने पिडल्यागत..
अशक्त तरीही काहीसा आत्मनिर्भर,
तोडण्याअगोदर याच्या मायेच्या फांद्या
सर्रास करण्याआधी आदराची कत्तल..
विचार करावा !
हाच तो महामुनी,जो उन असो वा पाऊस
कि असो भले संकटांचे वादळ,
विषम परिस्थितीतही जगाला सावली द्यायचा,
याच्या सशक्त पारंब्यावर मुले..
आनंदाने झोका घ्यायची,
पक्षीही खोपा करुन इथे, सुरक्षित रहायची
त्यांनीच पंख फुटल्यावर, निर्दयपणे झेप घ्यावी ?
माया-ममतेची किंमत याच्या, एकटं सोडून याला द्यावी ?
मला वाटतं पिलांनो यांच्या...
परिस्थिती ही समजून घ्यावी.
