विवाहितेचा छळ
विवाहितेचा छळ
आज सांगते तुम्हा सर्वांना
ऐका एका स्त्रीची कहाणी
पाहत होती स्वप्न बापुडी
संसार करणार होऊन राणी ||
स्वप्न भंगले पडता बेडी
हातामध्ये लग्नाची
केली मागणी आईवडिलांना
सासरच्यांनी हुंडयाची ||
तयार होता हुंडयासाठी
माप ओलांडले सासरी
वर्षाव झाला धमक्यांचा
नाही हुंडा तर जा माहेरी ||
भुकेने ती झाली व्याकूळ
ओठी लागेना थेंब पाण्याचा
नवरादेखील झाला हतबल
रंग बघून त्याच्या आईचा ||
मार, चटके सोसते दिवसभर
डोळ्यातून तरी अश्रू ढळेना
सांगे कौतुक सासरकडचे
दु:ख माहेरी ती कळवेना ||
कसा गेला काळ वर्षाचा
घरात आली पाऊले लक्ष्मीची
मुलगी दिसता समोर झाली
घाई मुलाच्या दुसऱ्या लग्नाची ||
उजाडला तो दिवस भयानक
माय लेकरा होती पाजत
पेट घेतला त्या खोलीने
दोन जीव संपले अकस्मात ||
