निरागस प्रेम
निरागस प्रेम
आज पहाटे साखरझोपेत
घेतले अलगद मला कवेत ||
हात फिरवता केसामधूनी
विरघळले मी लाजलाजूनी ||
आठवणीतही दोघे रमलो
एकमेकात कधी कसे गुंतलो ||
होतो अनोळखी वर्षापूर्वी
एक दुसऱ्याचे आज आहोत सर्वस्वी ||
इथवर होता प्रवास खडतर
सुसह्य केला केवळ प्रेमाखातर ||
आडवी आली जात आमची
नाही किंमत इथे माणसाची ||
नकार आला दोन्ही घरातून
वाटले व्हावे मोकळे जगातून ||
त्या क्षणी धरला हात सख्याने
लाभले जीवन खूप भाग्याने ||
आजपर्यंत कधी न सोडला
दोन्ही घरामध्ये दुवा जोडला ||
आसवांनी डोळे पाणावले
घेऊन चुंबन हळूच टिपले ||

