विवाह - सोहळा
विवाह - सोहळा
विवाह- सोहळा
क्षितीजाच्या मंडपी अनोख्या लग्नाचा थाट।
नववधू सजली वसुधा, पाहते वराची वाट॥
दंवबिंदूच्या मुंडावळी शोभती तिच्या भाळी।
रविकिरणांची चाहूल लागून गाली उमटली लाली॥
सप्त अश्वांच्या रथात बैसुनी नवरदेव आला।
" शुभ मंगल सावधान" नभांतरी जयघोष जाहला॥
लाजलाजली वसुधा लेऊन लालचुटूक शेला ।
काळ्या कुंतली सुवर्णचंपक गजरा माळियला॥
सृष्टीचे सौंदर्य पाहण्या अरुण गगनी आला।
प्रसन्न होऊन दयाघनाने तेजकुंभ अर्पिला॥
किलबिल करुनी जागविती हे सृष्टीचे भाट।
सुगंध लहरी आणिती वार्ता, " झाली बघा पहाट"