विषमता भासते
विषमता भासते
रक्तामधे नसतो फरक, का मग विषमता भासते?
प्रेमामधे नसतो फरक, का मग विषमता भासते?
जे खेळले होते बरे अभिमान त्यांचा वाटला
खेळामधे नसतो फरक, का मग विषमता भासते?
गीतेतली शिकवण असो, शिकवण कुराणाची असो
ज्ञानामधे नसतो फरक, का मग विषमता भासते?
डोळ्यांतुनी अश्रू पहा पाण्या प्रमाणे वाहती
दुःखामधे नसतो फरक, का मग विषमता भासते?
अल्ला म्हणा कृष्णा म्हणा, तो देव आहे सारखा
देवामधे नसतो फरक, का मग विषमता भासते?
छकुली म्हणा मुन्ना म्हणा, मायेस आई सारखी
दोघामधे नसतो फरक, का मग विषमता भासते?
सण ईद या दीपावली आनंद सगळ्यांचा खरा
हर्षामधे नसतो फरक, का मग विषमता भासते?