वेडी प्रीत
वेडी प्रीत
मी मीरा तू माझा मोहन
कधी न व्हायचे आपुले मिलन
विष प्याला तो मिरे भाळी
राधा चाखी तव अधरामृतं ....
पारिजात जरी भामे द्वारी
गंधाने रुक्मिणीच तृप्त
का रे मोहना फसविशी
जगावेगळी कसली ही रीत..
जरी फसवीशी साऱ्या जगता
दैव फसविणे तुला न जमले
स्यमंतकाचे निमित्त नुसते
जांबुवंती साठी दिव्य सोसले...
निखळ भक्ती तुझ्याच पायी
कवनाचे तर केवळ निमित्त
येतो म्हणूनी कितीदा फसविले
तरीही तुज वरं वेडी ही प्रीत

