वाट अश्रूंची
वाट अश्रूंची
रोज अश्रूंची वाट मुकी
तुझ्या आठवणीत झुरते
वळणा-वळणावरती अखेर
साथ उदासीनच उरते
लाख विनवण्या करूनी
मनाचे बांध अशी आवरते
मुक भावना मुक शब्दांनी
नीत मंदस्मितातुन सावरते
घुसमट उधळूनी अंतरीची
श्वासातही उगाच वावरते
साद तुझी येईल म्हणूनी
मनातून कितीदा बावरते
भिजली पापणी लपवूनी
ओठी हास्य रसिकाही घाबरते
आनंद घन मुक्त कराया
ती पुन्हा-पुन्हा गहिवरते
वाट वेगवेगळी जरी सखया
केवळ प्रीत शब्दांत मोहरते
शब्दगंध दरवळूनी येता
वाट अश्रूंची लोभसवाणी बहरते

