वाऱ्यावर घर बांधायचे आहे तिला
वाऱ्यावर घर बांधायचे आहे तिला
वाऱ्यावर घर बांधायचे आहे तिला..
गगनचुंबी विचारांच्या त्या झाडावर विसंबुन
सुगरणीने बांधला होता आपल्या स्वप्नांचा खोपा..
मुक्त भासणाऱ्या त्याच्या विशाल झावळाखाली
चौकटीतल्या मृगजळी परिघात घेत होती मजेत झोका..!!
वृक्षाच्याही उंच उडणारी ती सुगरण आपल्या पिल्लांसाठी
त्या झाडाच्या खोडातच घट्ट नख्या रुतवून होती..
खोडात रेंगणाऱ्या किड्या मुंग्यात
कधी क्वचित वाट्यास येणाऱ्या फुलपाखरात
आशेच्या हिंदोळ्यावर वेडे मन गुंतवून होती..!!
काहीशी निश्चिंत झालेली ती मोकळा श्वास घेते न घेते तोच,
कुठूनसा वारा आला जन्म देत नव्या वादळाला..
हेलकावला तिचा खोपा क्षणात धुळीने झाकोळला
कावरी बावरी सुगरण अवचित बिलगली खोप्याला..!!
झुंजत होती लढत होती पडत होती उडत होती
मधेच झाडास बिलगत ती परतवत होती वादळाला..
शमले एकदाचे वादळ निवळला वारा वाटले जिंकली सुगरण
पण खिळखिळ्या झाडानेच मान टाकली
अन् तिचा खोपा उध्वस्त झाला..!!
आता पेंटून उठलीय सुगरण न विसंबणार कोणा झाडावर
नको त्या झावळयांचा आधार, ना बधणार पुन्हा कोणाला..
नको तो चौकटीतला झूला
नको रेंगणाऱ्या त्याच किड्यांची शृंखला
हवे मोकळे विस्तीर्ण आकाश
कारण आता वाऱ्यावर घर बांधायचे आहे तिला..!!
