Untitled (शौर्यगाथा हिरकणीची)
Untitled (शौर्यगाथा हिरकणीची)
रायगड, राजधानी,
स्वराज्याची शिवबांची!
वाळुसरे गावी होती,
हिरा एक ती नावाची!
रोज येती गडावर,
गवळणी दूध घेऊन!
सांजवेळी परतती,
घरी,दूध ते विकून!
मास आश्विन,पौर्णिमा
कोजागिरी या दिवशी!
झाला उशीर हिरास,
नाही गेली ती घराशी!
आज्ञा राजांची मानून,
दरवाजे बंद झाले!
केल्या विनवण्या तिने,
घरी माझे हो तान्हुले!
जीव झाला कासावीस,
माया, ममतेची मुर्ती!
वात्सल्याचा फुटे पान्हा,
शूर माता तिची कीर्ती!
तान्ह्या,छकुल्या बाळाचा,
आला मनात विचार!
रस्ता कुठेच दिसेना,
केला क्षणात निर्धार!
मार्ग कठीण,काटेरी
वन्य प्राण्यांचा संचार!
नाही घाबरली ममता
शूर,धाडसी ती फार!
उतरून अवघड,
कडा धाव घेई घरा!
घेता कुशीत लेकरा,
गाली अश्रूंच्या धारा!
कळे शिवबांस सारे
अशी धीट माता हिरा!
केला सन्मान राजांनी,
आई धाडसी ती विरा!
तिचे लेकरू पाडस,
आई जणू ती हरिणी!
तिथे बांधला बुरूज
नाव त्याचे हिरकणी!
