त्या शापित वळणावर
त्या शापित वळणावर
जिथे पसरले हृदयाचे घाव सारे
पेटलेल्या जीवाचे तप्त ओले अंगारे
कोण साथ द्यावी या धगधगत्या वाटेवर
उभी मी एकटी त्या शापित वळणावर...
कृतघ्न झाली सरींशी जिथे ही धरणी
लोटून चांदणे उरली कलंकित रजनी
रुजवली जिथे माझ्या स्वप्नांची काचकोर
उभी मी एकटी त्या शापित वळणावर...
मागे किर्र अरण्य पुढे गर्द राण
अंधकार चहुदीशी जीवन सारं भयाण
विसावली छाया माझी निष्ठुर अंत:करणाच्या उशीवर
उभी मी एकटी विरहाच्या त्या शापित वळणावर...
मनात उठला विचारांचा भयंकर भोवरा
वादळाला पारखा झाला सागरी किनारा
नष्ट झाला भासकिल्ला भरतीच्या एका लाटेवर
उभी मी एकटी विरहाच्या त्या शापित वळणावर...
