हीच का ती कातरवेळ?
हीच का ती कातरवेळ?
मनाने चालवलाय आठवणींचा हा नवीनच खेळ
कळेल का मला सख्या हीच का ती कातरवेळ??
अलगद चाळून बघता मनातील पुस्तकाच्या पानांना
तुझीच छवी दिसते रे साजणा माझ्याकडे बघताना
हळूच लपून भेटते मी आपल्या भेटीच्या गोड क्षणांना
डोळे मिटून जगून घेते त्या भावविश्वातील स्वप्नांना
एकांतात मी एकटीच मनाशी द्वंद्व खेळत असते
रीत्या ओंजळीत माझ्या, हळव्या आठवणी वेचत असते
गत स्मृतींत रमताना चोरपावली येते तुझी आठवण
अलगद नजरेत तरळतात गाठीभेटीचे ते सुमधुर क्षण
बरेच काही सांगायचे तुला सख्या भेट ना एकदा तरी
नकळत हरवून बसते मी ही मज, ही वाट आहे कुठवरी?
स्मरते का रे तुला सख्या ती सांज प्रीतीची
हातात होता हात आणि भेट आपल्या नजरेची
अश्याच एका संध्याकाळी वीज निकामी असताना
दिली होतीस कबुली प्रेमाची हलकेच मिठीत घेतांना
मनाचे जणू फुलपाखरू होऊन साधत होतं फुलांशी मेळ
स्वप्नांच्या त्या विश्वामधली हीच का ती कातरवेळ।।

